निमित्त
◆’तू चाल पुढे तुला रे गड्या भीती कशाची , पर्वा ही कुणाची !’◆
●राजेंद्र शहापूरकर ●
औरंगाबाद : शिवसेना एका निर्णायक वळणावर असतांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज त्यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मनात विविध विचारांचा गोंधळ निर्माण झाला असल्यास नवल नाही.
१९८५ नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववाचा झेंडा हातात घेऊन मुंबई-ठाण्याबाहेर पाऊल टाकले त्याला सर्वात पहिला आणि अतिशय जबरदस्त प्रतिसाद मराठवाडा आणि त्यातही या शहराने दिला. कोणतेही राजकीय-सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी नसलेल्या मावळ्यांना बरोबर घेऊन बाळासाहेबांनी मराठवाड्यातील , औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय संस्थाने उदवस्त करीत इतिहास घडविला असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.
शिवसेना आणि साहेबांचे संभाजीनगर मध्ये आत्मीयतेने नाते होते. साहेब असेपर्यंत या नात्यात कधी फरक पडला नाही. आत्ता परवा युवा नेते आदित्य ठाकरे यांना जिल्हाभर मिळालेला प्रतिसादाचे इंगीत शिवसेनाप्रमुखांनी निर्माण केलेल्या याच आत्मीयतेत आहे.
गेल्या एक-दोन महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राजकारणाने कुशी बदलली आहे. संघटनेत अभूतपूर्व पडझड झालेली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे.
बाळासाहेबांच्या काळातील संकटापेक्षा हे वेगळे आणि मोठे आहे. ज्या जिल्ह्यावर साहेबांनी प्रेम केले त्या आपल्या जिल्ह्यात साहेबांच्या वारसाला अशा प्रकारचा धक्का बसेल अशी शंका सुद्धा येण्याचे कारण नव्हते पण तसे घडले हे खरे. सोडून गेलेली मंडळी तीस -पस्तीस वर्षांपासून शिवसेनेत आहेत … मग असे का व्हावे . आज या कटू विषयावर बोलण्याचे टाळले पाहिजे हे जरी खरे असले तरी त्याशिवाय पुढे जाता येणार नाही . पण आता बस्स झाले …इनफ इज इनफ !
उद्धवजी , आता काय झाले , कसे झाले ते सोडून द्या आणि बरोबर येतील त्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा नव्याने जोमाने पाय रोवून उभे राहा , संघटना बांधण्यासाठी जीवाचे रान करा. आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून काही भव्य-दिव्य घडवून दाखवा. शिवसेनाप्रमुखांची पुण्याई कमी झालेली नाही आणि सर्वसामान्य जनतेच्या ठाकरे प्रेमही अजून आटलेले नाही. उद्धवजी , आपण प्रामाणिकपणे चिंतन केले, काय अधिक-उणे झाले याचा स्वतःच मागोवा घेतला आणि आवश्यक ते बदल घडवून आणले तर चित्र वेगळे दिसू शकेल. आजही आपण आवाज दिला तर त्याचे प्रतिध्वनी आसमंत दणाणून सोडेल यात माझ्या मनात संशय नाही . वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
लेखन : राजेंद्र शहापूरकर
( लेखक हे जेष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक आहेत )