निमित्त -३
◆ते लढवय्ये होते आणि हे आहेत रडवय्ये !◆
औरंगाबाद : आक्रमकता आणि विरोधकांना थेट भिडणे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा स्थायीभाव होता. स्वभाव होता.ओळख होती.आत्मा होता.हाच आत्मा पक्षप्रमुखांच्या काळात हरवला असे वातावरण निर्माण झाले आहे आणि आत्म्या नसणे हे जिवंतपणाचे लक्षण निश्चितच म्हणता येणार नाही. रडूबाईसारखे मुळूमुळू रडत बसणे बाळासाहेबांच्या शिवसेनेला मंजूर नव्हते. ‘अंगावर याला तर शिंगावरच घेऊ’ असा त्यांचा रोखठोक बाणा होता. पण म्हणून एकाच वेळी सर्वांच्या अंगावर जाण्याची चूक त्यांच्या काळात कधी झाल्याचे दिसत नाही. कारण नसतांना मित्रांना , हितचिंतकांना खाजवण्याचा प्रयत्न साहेबांच्या काळात झाला असे उदाहरण कुणी देऊ शकणार नाही उलट हितचिंतकांकडून काही आगळीक झाली तरी त्यांना सांभाळून घेण्यात आल्याचे शेकडो उदाहरणे देता येतील. आपला माणूस आहे, चुकला असेल ..पण म्हणून त्याच्यावर विरोधकासारखे तुटून पडायचे नाही हे भान साहेबांना होते म्हणूनच ‘कमळाबाई’ अशी हेटाळणी करूनसुद्धा भाजपच्या मोठ्या नेत्यांबरोबर त्यांचे स्नेहसंबंध कायम होते, इतके की भाजप मधील गुजरात क्रायसेस बद्दल अडवाणी सारखा मोठ्या रेशनल नेत्याने बाळासाहेबांचा सल्ला घेण्यात कमीपणा मानला नाही. राज्यातील ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनासुद्धा मनमोकळ करण्यासाठी साहेबांच्या खांद्याचा आधार घ्यावा वाटावा यातच सर्व आले . मित्र आणि शत्रू बद्दलच्या व्याख्या स्पष्ट होत्या.मित्राना शत्रू आणि शत्रूला मित्र समजण्याची गल्लत केली तर काय होऊ शकतं याचे उदाहरण म्हणून ‘पक्षप्रमुखांच्या शिवसेने’कडे पाहावे लागेल !
बाळासाहेबांना परस्परविरोधी विचारसरणीची राजकीय सामाजिक मंडळी भेटायला येत असत.जॉर्ज फर्नांडिस , डॉ. दत्ता सामंत, शरद पवार, बॅ. रजनी पटेल,’नवाकाळ’चे निळकंठ खाडिलकर येत तसेच ‘मदर इंडिया’चे बाबुराव पटेलही …वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक स्तरातील मंडळींचाही ‘मातोश्री’वर राबता असे. बहुश्रुत साहेबांना राजकारणातील घडामोडींची बारीक-सारीक माहिती असे. कोणत्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना काय ‘गिफ्ट’ मिळाले याची सुद्धा खबर ते ठेवीत… आणि पक्षप्रमुखांना त्यांच्या पक्षात काय चालू आहे याबद्दल काहीही माहिती नसते. आपल्या पक्षातील ४०-४२ आमदार नाराज आहेत , राष्ट्रवादीने राज्यात पक्षाची कबर खोदण्यास सुरवात केली, जनतेमध्ये आपल्या विषयी असंतोष आहे याची साधी चाहुलही पक्षप्रमुखाला लागत नसेल तर त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लागणे अटळ प्रक्रिया आहे.
साहेबांच्या काळातही मनोहर जोशी,दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक,प्रमोद नवलकर,सुधीर जोशी, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, दत्ताजी नलावडे, लीलाधर डाके, सुभाष देसाई आदी नेतेमंडळींमध्ये शह-काटशहाचे राजकारण चालत असे. परंतू या अंतर्गत वादाचा फटका पक्षाला कधी बसला नाही कारण नेत्यांमध्ये काय चालले याची खडानखडा माहिती ‘मातोश्री’ ला असे. वेळच्यावेळी साहेबां हस्तक्षेप करून प्रकरण पेटण्यापूर्वीच थंड करीत. मनोहर जोशी साहेबांच्या खूप जवळचे होते. संघटनेतील सर्व सत्ता त्यांनी भोगली.पण ते शिवसेना चालवतात असे दृष्य कधी दिसले नाही. ‘शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेनेचे नेते ‘ हे अंतर कधी कमी झाले असे वाटले नाही. सरांना ‘चाणक्य’ म्हणत असत पण या चाणक्याला कुठपर्यंत डोक्यावर घ्यायचे याचे गणित साहेबांच्या डोक्यात फिट्ट होते.
पक्षप्रमुख आणि प्रवक्ते यांच्याबद्दल असे म्हणता येईल का ? सकाळपासून रात्रीपर्यंत शरद पवारांच्या नावाची जपमाळ ओढत उद्धव ठाकरे यांच्या मिठाला हे प्रवक्ते जागतात का असा प्रश्न निर्माण होतो. ‘या बोटांची थुंकी त्या बोटावर ‘ अशा प्रकारच्या दैनंदिन शिवीगाळी आणि अर्थहीन वक्तव्य करून ‘चाणक्य’ बनायला निघालेल्या मंडळीमुळे अशी दयनीय अवस्था झाली हे खरे असले तरी कमकुवत नेतृत्व हेच खरे कारण असल्याच्या सत्याकडे डोळेझाक करता येणार नाही, हेसुद्धा तेवढेच खरे !
लेखन : राजेंद्र शहापूरकर
( लेखक हे जेष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक आहेत )