औसा ; दि.२६( राम कांबळे यांजकडून )-
हिरेमठ संस्थानचे लिंगैक्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये क्रांती करीत मागील आठ दशकापासून आषाढमासी वार्षिक उत्सवाचे आयोजन करून ईष्टलिंग महापूजा व शिव दीक्षा सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र कर्नाटक राज्यांमध्ये आपला शिष्य समुदाय जमविला.82 व्या शिवदीक्षा सोहळ्यानिमित्त उज्जैन पिठाचे श्रीमद जगद्गुरु श्री श्री 1008 सिद्धलिंग राजदेशीकेंद्र महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात रविवार दिनांक 24 जुलै रोजी हजारो शिवभक्तांनी शिव दीक्षा घेतली. संस्थानच्या माध्यमातून शिवनाम सप्ताह व शिवकथा अशा कार्यक्रमातून अध्यात्मज्ञानाची प्राप्ती होते.ष . ब्र .श्री 108 अमृतेश्वर महाराज जिंतूरकर यांच्या शिवकथा कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

सात दिवस सप्ताह कालावधीमध्ये शिवकथा शिवकिर्तन परमरहस्य ग्रंथाचे पारायण व नित्य महारुद्र अभिषेक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने हिरेमठ संस्थांचे मार्गदर्शक डॉ शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांनी ही परंपरा अखंडपणे कायम राखली. संस्थानचे पिठाधिपती ष. ब्र.108 श्री बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली शिवभक्तांनी शिवदीक्षा घेतली .

ईष्टलिंग महापूजा व शिवदीक्षा सोहळ्यामध्ये हजारो महिला पुरुष शिवभक्त भक्तीभावाने सहभागी झाले होते.संस्थानच्या माध्यमातून अध्यात्म ज्ञान व अन्नदानाची अखंडपणे चालत असलेली परंपरा या कार्याचे उज्जैन पिठाचे श्रीमद जगद्गुरु यांनी कौतुक केले.

अखंड शिवनाम सप्ताह व वार्षिक उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरशैव समाज औसा वीरशैव युवक संघटना औसा यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते.