*मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे -राज्यपाल हरिभाऊ बागडे*
• ‘भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ ग्रंथाचे प्रकाशन
• राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ग्रंथतुला
लातूर, दि. २८( माध्यम वृत्तसेवा): मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा संपूर्ण इतिहास अजूनही लोकांपर्यंत पोहचलेला नाही. अनेक घटनांवर अद्यापही लेखन झालेले नाही. या लढ्याचा एकत्रित इतिहास जागृतपणे नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. दयानंद सभागृह येथे आयोजित ‘भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्ती प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
आमदार रमेश कराड, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, उमेश कुलकर्णी, ग्रंथाचे लेखक प्रवीण सरदेशमुख यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबीय, विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नवनिर्माण प्रतिष्ठानच्यावतीने यावेळी ग्रंथतुला करण्यात आली. या ग्रंथतुलेतील ‘भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ या ग्रंथांच्या सुमारे दीड हजार प्रतींचे विद्यार्थ्यांना मोफत वितरण केले जाणार आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाला अनेक पैलू आहेत. या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकण्याची गरज आहे. आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर एक वर्ष एक महिना आणि दोन दिवसांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मराठवाड्याच्या मातीतील अनेक शूरवीरांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. हैदराबाद संस्थानाला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळविण्यासाठी निजामाचे प्रयत्न सुरु होते. मात्र मराठवाड्यातील जनतेने दिलेला लढा आणि भारत सरकारने केलेली पोलीस अॅक्शनमुळे निजाम शरण आला. या लढ्यातील अनेक शूरवीरांचे योगदान, अनेक घटनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे या लढ्याचा इतिहास एकत्रितपणे मांडणे गरजेचे आहे. ‘भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ यासारख्या ग्रंथांमुळे मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले.
राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी विविध पदांवर काम करताना मराठवाड्यातील वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केल्याचे सांगून आमदार श्री. कराड यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले.
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी महाराष्ट्र विधानसभेत अध्यक्षपद भूषविताना अतिशय कुशलतेने सभागृहाचे कामकाज चालविले. जे योग्य आहे, त्याच्या बाजूने कौल देण्याची त्यांची भूमिका होती. त्यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त आयोजित ग्रंथतुला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आमदार श्री. पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
*प्रास्ताविकामध्ये ‘भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ ग्रंथाचे लेखक प्रवीण सरदेशमुख यांनी या ग्रंथ लेखनामागील पार्श्वभूमी, तसेच ग्रंथाविषयी माहिती दिली. तसेच उमेश कुलकर्णी यांनी ग्रंथामध्ये समाविष्ट माहितीवर प्रकाश टाकला.*
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या कार्याविषयी माहिती देताना पत्रकार अरुण समुद्रे यांनी १९९३ मध्ये लातूर जिल्ह्यात झालेल्या भूकंपात त्यांनी केलेले मदत कार्य, तसेच विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील कबाले वाटपासाठी घेतलेला पुढाकाराबद्दल माहिती दिली.
मराठवाडा मुक्तिसंग्रामात योगदान दिलेले स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबीय यांचा यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नवनिर्माण प्रतिष्ठान, विविध स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्थांच्यावतीने यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले.
*****