निधी अथवा ध्वज विकत घेवून संस्था,लोकप्रतिनिधी यांनी विविध संस्थांना आणि गावातील नागरिकांना मदत करावी
–जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन
लातूर,(जिमाका),दि.14:- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारी, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट, 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार “हर घर झेंडा” हा उपक्रम संपूर्ण लातूर जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे.
या उपक्रमातंर्गत प्रत्येक घर, शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये, अंगणवाडी, पतसंस्था, सहकारी संस्था, दवाखाने, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत व अंगणवाडीमध्ये दिनांक 11 ऑगस्ट, 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ध्वज फडकविण्यात येणार आहे.,
तेंव्हा, लातूर जिल्ह्यातील सन्मानीय खासदार, आमदार, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटनाचे नेते, आजी माजी, जिल्हा परिषद सदस्य, सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, म.न.पा. लातूर, नगरपालिका आजी माजी पदाधिकारी, समाजिक संस्था, लोकउपयोगी कामे करणारे दानशुर व्यक्ती, उद्योजक, व्यापारी व व्यावसायिक यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, “हर घर झेंडा” उपक्रम लातूर जिल्ह्यात साजरा करण्यासाठी नागरिकांना अंदाजे 4 लाख राष्ट्रध्वजाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे वरीलप्रमाणे प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी निधी अथवा ध्वज विकत घेवून नागरिकांना व संस्थांना मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले कले आहे.
तसेच ज्या नागरिकांना व संस्थांना ध्वज विकत घेवून मदत करण्याची इच्छा आहे, त्यांनी जिल्हा परिषद पंचायतचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मो. 8788408099, जिल्हाधिकारी कार्यालयातील संकीर्ण नायब तहसीलदार श्रीमती धनश्री स्वामी मो. 9822126947, लातूर महानगरपालिकेच्या उपायुक्त श्रीमती विना पवार मो. 7774003336, नगर परिषद प्रशासन अधिकारी श्री. कोकरे मो. 9823229033 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.