18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeलेख*स्वामी रामानंद तिर्थ यांचे नेतृत्व ; अनेक मार्गानी लढा पेटला*

*स्वामी रामानंद तिर्थ यांचे नेतृत्व ; अनेक मार्गानी लढा पेटला*

मराठवाडा मुक्ती गाथा ( भाग -10)

लेखमाला

निजामशाहीने स्टेट काँग्रेसला अनेक मार्गानी दाबण्याचा प्रयत्न केला. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाने या लढ्याला धार आली, त्यांच्या नेतृत्वाचा झंझावात सुरु झाला, आणि लढाई अनेक मार्गानी सुरु झाली.
स्टेट काँग्रेसचे पहिले अधिवेशन:-
दि. 16, 17 व 18 जून, 1947 स्टेट काँग्रेसचे पहिले ऐतिहासिक अधिवेशन हैदराबाद व सिकंदराबाद या शहरांमध्ये असलेल्या मुशिराबाद या भागात झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचे कामकाज पार पाडल्यानंतर हैदराबाद संस्थांनचे गृहमंत्री अलियावरजंग यांनी स्वामीजींना बोलावून घेतले व दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनात सरकारच्या दृष्टीने आक्षेपार्ह असलेला मजूकर वगळून टाकावा असे बजावले. तसेच संस्थांनाबाहेरून आलेल्या पाहुण्यांची भाषणे होऊ देऊ नयेत असेही सांगितले. स्वामीजींनी क्षणाचाही विलंब न लावता असे उत्तर दिले, आम्ही आदरणीय पाहुण्यांना कमलादेवी चट्टापोध्याय व अन्य पाहुण्यांवर काही बंधने घालणार नाही. सरकारने जे करायचे ते करावे.


हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणे ही तारेवरची कसरत होती. सातवे निजाम मीर उस्मानअली हे पुराणमतवादी व राजेशाहीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी हैदराबाद संस्थांनात आपले राज्य टिकवण्यासाठी अनियंत्रित व अन्यायी मार्गाचा सर्रास वापर केला. रझाकारासारखी जातीयवादी संघटना जोपासली. अशा राजवटीशी धर्मनिरपेक्ष वृत्तीने, मानवतावादी मूल्ये उराशी बाळगून प्रखरपणे संघर्ष करणे अत्यंत अवघड होते. स्वामी रामानंद तीर्थांची गांधीप्रणीत मार्गावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे हा लढा धर्मनिरपेक्ष राहील आणि अहिंसक मार्गानेच चालेल, असा त्यांनी निश्चय केला होता.
या अधिवेशनात शेवटी त्यांनी अत्यंत सडेतोड भाषण केले. ते म्हणाले की, ‘बंधुनों, आपल्याला फार मोठी कामगिरी पार पाडायची आहे. त्यासाठी आपणांत कमालीची एैक्य भावना असण्याची गरज आहे. तसेच आपल्यात कमालीची शिस्त पाहिजे. या लढ्यात सर्वस्व त्यागासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. त्यासाठी काही जणांचे बलिदानही होईल. तरी उर्वरित लोकांनी स्वातंत्र्यांची ही मशाल पुढे न्यायची आहे. हे कार्य हिमालयाएवढे उत्तुंग आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने या कार्यासाठी स्वत:ला झोकून दिले पाहिजे. हैदराबादच्या जनतेचा हा मुक्तिसंग्राम हा राष्ट्राच्या निकडीचा प्रश्न आहे. मित्रांनो, याप्रसंगी आपले सर्व धैर्य एकवटून स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा निर्धार करू या..
पू. स्वामीजींनी आपल्या भाषणात अत्यंत समतोलपणाने, शांतवृत्तीने परंतु अतिशय खंबीरपणे जबाबदार राज्यपद्धतीचा पुरस्कार केला. भारतीय संघराज्यात हैदराबाद राज्य विलीन झालेच पाहिजे असा आग्रह जाहीर केला. अधिवेशनाचा संदेश घेऊन कार्यकर्ते व प्रतिनिधी आपापल्या गावी परत गेले.
दुहेरी चळवळ चालवण्याची नीती :-
स्वामीजींनी मुक्तीला तीव्र करण्यासाठी एकीकडे सत्याग्रहींच्या या पाठवायच्या तर काही लोकांनी भूमिगत होऊन 1942 च्या चळवळीसारखी चळवळ करायची. याचवेळेस हैदराबाद संस्थानात कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली इलेहादुल मुसलमीन या संघटनेची एक सशस्त्र सेनाच उभी राहिली होती. रझाकार या नावाने ते सर्वत्र प्रसिध्द होते.
रझाकारांना तोंड देण्यासाठी स्टेट काँग्रेसने असेही ठरवले की, संस्थानाला लागून सरहद्दीवर स्टेट काँग्रेसच्या सशस्त्र लढ्याची कार्यालये सुरू करायची. रझाकारांचा प्रतिकार करण्यासाठी निवडक लोकांना शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण देण्याचे ठरले. त्या दृष्टीने मराठवाडा, कर्नाटक व तेलंगणाच्या सरहद्दीवर जवळपास 115 कॅम्पस उघडण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात साधारणत: 15 कॅम्प उभारण्यात आले होते. हे कँम्प प्रत्यक्ष निजामाच्या नियंत्रीत क्षेत्राच्या बाहेर होते. या सर्व आंदोलनाचे मार्गदर्शन करण्यासाठी श्री. दिगंबरराव बिंदू यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती समिती स्थापन करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता होती. त्यांना अटक झाल्यास चळवळ चालवण्याचे सर्व अधिकार कृती समितीला देण्यात आले….

क्रमशः

@युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]