‘इंडियन आयडॉल ‘अंजली व नंदिनी गायकवाड 13 ऑगस्टला लातुरात
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माध्यमची बहारदार मैफल
लातूर, प्रतिनिधी
माध्यम या सामाजिक व सांस्कृतिक विचारपीठाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इंडियन आयडॉल फेम अंजली व नंदिनी गायकवाड या भगिनींच्या अनोख्या संगीत मैफलीचे आयोजन 13 ऑगस्ट रोजी शनिवार सायंकाळी 6 वाजता येथील दयानंद सभागृहात करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी पृथ्वीराजजी बी.पी. यांच्या हस्ते या मैफलीचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमास अध्यक्ष या नात्याने दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी आणि प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे उपस्थित राहणार आहे. स्वर्गीय सौ वनमालाताई सोमनाथ रोडे यांच्या द्वितीय स्मृती दिनाचे औचित्य साधून त्यांना यावेळी अभिवादन करण्यात येईल.
अंजली व नंदिनी गायकवाड यांना इंडियन आयडॉल सारेगम लिटल चॅम्प, मी मराठी संगीत सम्राट, क्लासिकल व्हॉईस ऑफ इंडिया आणि यासह अनेक सन्मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. अंजलीच्या सुरावटीवर भाळून प्रख्यात अभिनेत्री रेखा यांनी स्टेजवर जाऊन एका कार्यक्रमात अंजलीची ओवाळून दृष्ट काढली होती हे विशेष. कार्यक्रमास साथ संगत म्हणून अंगद गायकवाड (हार्मोनियम व गायन) प्रशांत थोरात (तबला), अजित गवारे (कीबोर्ड), गौतम गुजर (ऑक्टोपॅड), ओमकार इंगवले (मृदंग व ढोलक) करणार आहेत.
या सुगम गायनाच्या बहारदार मेजवानीचा लाभ लातूरकरांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन माध्यमच्या वतीने अध्यक्ष जयप्रकाश दगडे, उपाध्यक्ष रामानुज रांदड, कोषाध्यक्ष ईश्वरचंद्र बाहेती, डॉ. हंसराज बाहेती, डॉ सोमनाथ रोडे, श्रीकांत करवा, डॉ. दिनकर काळे, डॉ विठ्ठल लहाने, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. साधना शिवणकर, सौ राजश्री इटकर, प्रा. सौ. स्मिता दगडे, डॉ. सौ प्रणिता चाकूरकर, डॉ. हनुमंत कोळेकर, चंद्रकांत झेरिकुंठे, श्यामसुंदर गिल्डा ॲड. अमित रोडे, प्रा.अश्विनी रोडे, लहरीकांत शहा आदींनी केले आहे. कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी प्रवेश खुला राहील असे माध्यमच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.