29 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींच्या जयघोषाने दुमदुमला दादरचा आसमंत!*

*स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींच्या जयघोषाने दुमदुमला दादरचा आसमंत!*

पर्यटन विभागाच्या ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’ची ‘प्रकाशोत्सवा’द्वारे सांगता

मुख्यमंत्री शिंदे, पर्यटनमंत्री लोढा, शिक्षणमंत्री केसरकरांसह दिग्गजांची उपस्थिती

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) :

‘आम्ही सारे सावरकर’, ‘राष्ट्रभक्तीचे दुसरे नाव, सावरकर, सावरकर!’, ‘भारतमाता की जय’ अशा जयघोषांनी मुंबईच्या दादरचा आसमंत दुमदुमला आणि असंख्य सावरकरभक्तांनी स्वा. सावरकरांच्या १४० जयंतीदिनी स्वा. सावरकरांना अनोखी मानवंदना दिली. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक व विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तेजोदिन’ या कार्यक्रमात दादरच्या स्वा. सावरकर सदन ते स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक अशी पदयात्रा व सावरकर स्मारक येथे स्वा. सावरकरांच्या पुतळ्यासमोर ध्वज उंचावून प्रकाशोत्सव अशा अभिनव कार्यक्रमास मुंबईच्या कानाकोपऱ्यातून असंख्य सावरकरप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे झालेल्या प्रकाशोत्सवास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, स्वा. सावरकर स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर व विवेक व्यासपीठाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, मुंबईच्या कानाकोपऱ्यातून असंख्य सावरकरभक्त नागरिक, कार्यकर्ते, राष्ट्रीय विचारांच्या संस्था-संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते, विद्यार्थी या पदयात्रेस उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘विवेक व्यासपीठा’चे विशेष अभिनंदन करताना ‘स्वा. सावरकर वीरभूमी परिक्रमा’ हा उपक्रम राज्यातील प्रत्येक व्यक्ती सावरकरवादी होत नाही तोपर्यंत सुरू ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच कौशल्य विकास विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या आयटीआय व अन्य प्रशिक्षण संस्थांमध्येही ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत उपक्रम आयोजित करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. तसेच, यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटन विभागामार्फत स्वा. सावरकरांचे विचार व कार्य महाराष्ट्रभर पोहोचवण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक व अभिनंदन केले. स्वा. सावरकर स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना स्वा. सावरकर ही एक व्यक्ती नसून विचारशक्ती असल्याची भावना व्यक्त केली. विवेक व्यासपीठाच्या वतीने बोलताना निमेश वहाळकर यांनी ‘वीरभूमी परिक्रमा’ या प्रकल्पामागील संकल्पना व भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बेलावडे यांनी केले.

या कार्यक्रमावेळी उपस्थितांनी भगवा ध्वज उंचावून आपापल्या मोबाईलच्या प्रकाशात स्वा. सावरकरांना अनोखी ‘प्रकाशवंदना’ दिली. तत्पूर्वी सावरकरप्रेमींची पदयात्रा ही स्वा. सावरकरांचे अखेरच्या काळात वास्तव्य असलेले सावरकर सदन येथून दिमाखात प्रारंभ झाली. ढोल-ताशांच्या गजरात, सावरकरांच्या जयघोषात ही पदयात्रा बालमोहन विद्यालय, शिवाजी पार्क, स्काउट ग्राऊंडमार्गे स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकापर्यंत नेण्यात आली. या पदयात्रेत पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, स्वा. सावरकर स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर व विवेक व्यासपीठाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर हेदेखील सहभागी झाले होते.

वीरभूमी परिक्रमा’ व ‘सावरकर विचार जागरण सप्ताह

स्वा. सावरकरांचे वास्तव्य लाभलेल्या महाराष्ट्रातील ठिकाणांचे जसे की भगूर [सावरकरांचे जन्मस्थान], नाशिक, पुणे, सांगली, रत्नागिरी व मुंबई येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास करत ‘स्वा. सावरकर टुरिझम सर्किट’ निर्मितीचा संकल्प राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकताच घोषित केला होता. तसेच, या सर्किटला ‘वीरभूमी परिक्रमा’ असे नावही देण्यात आले होते. यासह सावरकरांच्या जीवनकार्याला अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता पर्यटन विभाग व विवेक व्यासपीठाच्या माध्यमातून ‘विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत दि. २१ मे ते २८ मे दरम्यान येथे उल्लेखलेल्या सर्व ठिकाणी मिळून तब्बल ४० हून अधिक कार्यक्रम संपन्न झाले व त्यांना सर्व ठिकाणच्या सावरकरप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]