चेअरमन डॉ.गोविंदराव माकणे यांच्या निर्णयाचे सर्वत्र होत आहे कौतुक
लातूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमास प्रतिसाद देत विविध उपक्रम व कार्य कुशलतेमुळे महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार मिळवलेल्या लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील विशाल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहन जेष्ठ स्वातंत्र्य सैनानी बळीराम बापूराव सोनटक्के यांच्या हस्ते करण्याचा ठराव घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. सोसायटीचे चेअरमन तथा सरपंच डॉ.गोविंदराव माकणे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या अमुल्य योगदानाचा यथोचित सन्मान करण्याच्या भावनेने हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे पत्र क्रमांक / संकीर्ण ८८२२/प्र.कृ.१८९/साका-४ दि.२३/०६/२२ नुसार शुक्रवारी (दि.२९) विशाल विविध सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाने मासिक बैठक विषय क्रमांक १० नुसार घेतला आहे. या निर्णयाची प्रत तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे व सहाय्यक निबंधक यांना देण्यात आली आहे. चेअरमन डॉ.गोविंदराव माकणे यांनी स्वतःच्या हाताने ध्वजारोहण न करता स्वातंत्र्य सैनिकाचा गौरव व्हावा या भावनेने दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वातंत्र्य संग्रामातील योगदान
निजाम सरकारच्या पोलीस ठाण्यातील शिपायाला आपलंसं करून सहकारी स्वातंत्र्य सैनिकांच्या मदतीने ठाण्यातील बंदुका, दारुगोळा व इतर शस्त्रसाठा लुटला. निजामाचे खबरे, सैनिक व हस्तक अशा २० ते २५ व्यक्तींना ठार केले. बळीरामजी स्वतः पैलवान असल्यामुळे त्यांच्याकडे तालमीतील मित्रमंडळी मोठ्या संख्येने होती. याचा उपयोग त्यांनी निजाम राजवटीविरुद्ध आंदोलन उभे करण्यासाठी केला. या कार्याची दखल लक्ष्मण पेंटर लिखित ‘मी पाहिलेला हैद्राबाद मुक्तीसंग्राम’ या ग्रंथात घेण्यात आली आहे. अशा विविध स्वातंत्र्य संग्रामातील योगदानामुळे जवळपास सहा महिन्यांचा कारावास त्यांना भोगावा लागला.