28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसंगीतस्वर्गीय स्वरमाधुर्याचा अस्त

स्वर्गीय स्वरमाधुर्याचा अस्त

 सातहून अधिक दशकात गायिलेली हजारो गाणी...देशविदेशातून केलेले अनेक जाहिर कार्यक्रम... शेकडो पुरस्कार मानसन्मान... तीन पिढ्यांच्या भारतीय रसिकांच उदंड प्रेम... सामान्य रसिकांपासून जाणकारांपर्यंत सर्वांना रिझवणार स्वर... अविरत परिश्रमाने साकारलेली भारतरत्न लता दिदींची वैभवशाली कारकिर्द... यांचा आलेख मांडायचा तरी कसा? दिव्य स्वरांचे वर्णन करायचे तरी कसे? हे सारं शब्दांच्या पलीकडले आहे. तरीही त्यांच्या गाण्यातून झालेल्या परिचयातून त्यांच्या सांगीतिक कार्याचा हा आढावा...

२) जन्म व बालपण:

ईश्वरी देणगी लाभलेल्या लता मंगेशकरांचा जन्म २८ सप्टेबर, १९२९ रोजी इंदोर येथे झाला. वडिलांचे नाव मा.दीनानाथ मंगेशकर तर आईचे नावशुद्धमती. आशा, उषा, मीना व हृदयनाथ ही लतादीदीची भावंडे. मा.दीनानाथ हे मराठी नाट्य सृष्टीतील लोकप्रिय गायक नट होते. बालपणापासूनच लतादीदींच्या
हाती तंबोरा आला. त्यांनी झगमगत्या रंगमंचावरील नाटके पाहिली. त्याहीपेक्षा
वडिलांचे तेजस्वी संगीत कानात साठवले. मा.दीनानाथांनी दीदींची कुशाग्र बुद्धिमत्ता
व स्मरणशक्ती पाहून संगीताची मेहनत अत्यंत गांभिर्याने करून घेतली. वयाच्या
दहाव्याच वर्षी दीदींनी दीडशे चिजा तोंडपाठ केल्या. वडील नट, गायक व
सारंगीवादक होते. त्यांच्याकडे असलेले संगीतरूपी धन, वारसा हक्कान
लतादीर्दीकडे आले. त्यांनीही ते अल्पावधीत आपलेसे करून घेतले.

३) बलवंत संगीत मंडळीत प्रवेश :

त्या काळात मा.दीनानाथांची ‘बलवंत संगीत मंडळी’ ही नाट्य संस्थानावा-रूपाला आली होती. सौभद्र नाटकात वडिलांबरोबर छोट्या नारदाची भूमिका त्यांनी केली. याच नाटकात ‘पावना वामना’ या गाण्याला बाबांना सांगून पैजेवर मोअर घेतला. तेव्हाच बाबांनी भाकीत केले, “लताच्या रूपाने मला उद्याचा सूर्योदय दिसत आहे.” “पुण्य प्रभाव’ नाटकात युवराजाची भूमिका केली तर ‘नाटकात श्रीकृष्णाची भूमिका त्यांनी साकार केली. ‘त्राटिक’ नाटकात
‘बागेतलं गोड पाखरू’ ही लावणी त्यांनी म्हटली. ‘खंजाची’ ह्या चित्रपट गीताच्या स्पर्धेत लतादीदीला पहिले बक्षिस मिळाले.
बक्षिस म्हणून सोबत दिलरुबाही मिळाला. दिलरूबा घेऊन दिवसभर आनंदाने उड्या मारणाऱ्या कन्येला मा.दीनानाथांनी बजावले, यशानं हूरळून जाऊ नकोस. तुला पुढच्या आयुष्यात खूप झेलायचं आहे. यशाच्या शिखरावर पोहंचलं तरी पाय जमीनीवरच हवेत.’ अशी शिकवण वडिलांनी दिली.

४) लतादीदींवरील पहिला आघात :

हसत-खेळत बागडणाऱ्या या सुखी कुटुंबावर काळाने झडप घातली.
अन् ऐन तारुण्यात मा.दीनानाथांची जीवनज्योत विझली. दीदींच्या साडेबाराव्या
वर्षी तिचे बाबा तिला सोडून गेले. २४ एप्रिल, १९४२ या उष्ण तप्त दिवशी त्यांनी
अखेरचा निरोप घेतला. त्याच दिवशी तिचे बालपण संपले. कोवळ्या आवाजाची,
मुग्ध, सतत गुणगुणणारी मुलगी कर्तव्यकठोर झाली. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या जेष्ठ कन्येवर येऊन पडली. आलेल्या संकटांना, झालेल्या आघाताला कुरवाळीत न बसता त्यांनी शांतपणे, धीराने व संयमाने पुढे मार्गक्रमण केले. स्वतःबरोबरच त्यांनी भावंडांचेही नाव संगीत क्षेत्रात अजरामर केले.

५) चित्रपट सृष्टीत पदार्पण:

वडिलांच्या निधनानंतर लतादीदींना कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी
नौकरीची आवश्यकता होती. मा. दीनानाथांचे मित्र मा.विनायकांनी मंगेशकर
कुटुंबीयांना पुण्याहून कोल्हापूरला नेले. मा.विनायकांनी प्रफुल्ल या आपल्या
फिल्म कंपनीत लतादीदींना प्रथम काम दिले. त्यानंतर नवयुग स्टुडिओमध्ये दत्ता
डावजेकर यांनी त्यांची ऑडीशन घेतली. दीदींनी मा.दीनानाथांचे पद म्हणून
दाखविले. ते ऐकूण दत्ता डावजेकर खुश झाले व त्यांनी दीदींना बाल कलाकार
म्हणून नोकरी दिली. पहिली मंगळागौर’ या चित्रपटात त्यांनी काम केले. त्यानंतर
‘माझे बाळ’, ‘गजाभाऊ किती हसाल’ इ.चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.

६) घेतलेले परिश्रम :

बालपणापासूनच लतादीदींना कठोर परिश्रम करावे लागले. मा.दीनानाथांच्या मृत्यूनंतर हातात तंबोरा, चिजांची वही आणि हृदयात अदम्य आत्मविश्वास घेऊन त्या बाहेरच्या जगाशी सामना करण्यासाठी तयार झाल्या. बाबांचा फोटो समोर ठेऊन एकलव्याप्रमाणे रियाज सुरू झाला. दिवसभर कामासाठी स्टुडिओत वेळ जायचा. संपूर्ण शालेय शिक्षण घेण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही असे असले तरी त्यांनी वि.स. खांडेकर, साने गुरुजी, आचार्य अत्रे अशा श्रेष्ठ साहित्यिकांच्या साहित्याचा अभ्यास केला. “तुम्हारे हिंदी को दाल-भात की बु आती है” असे म्हणणाऱ्या दिलीपकुमारांना अस्सल उर्दूचा अभ्यास करून जवाब दिला. याचबरोबरच गीतांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांनी हिंदी, बंगाली, संस्कृत, तेलगू, कन्नड इ. भाषा आत्मसात केल्या. त्यांनी आजपर्यंत जवळपास २२ भाषांत गीतगायन केले.
आयुष्यात संघर्ष व धावपळच नशिबी आली. म्हणून तर दूरदर्शनवरील
प्रीतीश नंदी शोमध्ये पुन्हा जन्म मिळाला तर काय व्हायला आवडेल? या प्रश्नावर
स्वतः लतादीदी म्हणाल्या, “काहीही पण लता मंगेशकर नाही.’ यावरून त्यांनी
किती परिश्रम घेतले असतील याची आपणांस कल्पना येते.

७) गुरू आणि शिक्षण:

लता दीदीचे प्राथमिक शिक्षण वडील मा.दीनानाथांकडेच झाले. लहानपणी बाबांनी त्यांना ‘एक, दोन, तीन’ ऐवजी ‘सारेगमप’ म्हणायला शिकविले. पहाटे उठवून त्यांनी ‘भैरव बहार’ रागातील ‘हे मान्दे महू …’ ही चीज शिकविली. दीदींनीही त्यांचे स्वर कानात साठवले. मा.विनायकांनी मुंबईला आल्यानंतर दीदींच्या संगीत शिकवणीची व्यवस्था केली. दि.११ जून, १९४५ रोजी दीदी भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अलीखाँ यांच्या गंडाबंद शागीर्द झाल्या. त्यानंतर अमान अलीखाँ हे मुंबई सोडून गेल्यामुळे देवासचे उस्ताद अमानत
खाँ यांनी दीदींना उत्तम तालीम दिली. याच सुमारास पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडूनही त्यांनी मार्गदर्शन घेतले. पागे या नृत्य शिक्षकाकडून त्यांनी काही दिवस नृत्याचे धडे घेतले होते. बाबांच्या तालमीत तयार झालेल्या गळ्याला सारं साध्य होत होते.

८) यशस्वी युगाची वाटचाल:

१९ ऑगष्ट, १९४७ रोजी दीदींवर पितृवत प्रेम करणारे मा.विनायक
यांचे अचानक निधन झाले. हा त्यांच्या आयुष्यातला दुसरा आघात. परंतु याही
आघातातून त्या सावरल्या. १९४७ साली दत्ता डावजेकरांनी ‘आपकी सेवा में’ या चित्रपटासाठी त्यांच्याकडून एक ठुमरीवजा गाणे गाऊन घेतले. ‘पा लागू शाम करी जोरी रे…’आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या पहिल्या पार्श्वगीताची
नोंद झाली. परंतु दीदींना खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘मजबूर’ या चित्रपटातल्या
गीतापासून. गुलाम हैदरांनी मजबूरसाठी त्यांच्याकडून गाऊन घेतले व ग्वाही
दिली की, “ह्या मुलीच्या पायावर चित्रपट सृष्टी लोळण घेईल.” त्यांचे शब्द खरे
ठरले. याच काळात पार्श्वगायन हा प्रकार चित्रपटात रूढ होऊ लागला. याचा
फायदा लता दीदींना झाला. अनेक संगीतकारांशी त्यांचा परिचय होत गेला.
मदन मोहन, खेमचंद शामसुंदर, नौशादजी, सी रामचंद्र, शंकर जयकिशन, चित्रगुप्त, जयदेव, सलील चौधरी, अनिल विश्वास इ. संगीतकारांनी लतादीदींच्या आवाजाला पारखून त्यांच्या आवाजाचा पार्श्वगायनासाठी उपयोग करून घेतला.
सुधीर फडके, वसंत देसाई, वसंत प्रभू, वसंत पवार, श्रीनिवास खळे इ. मराठी
संगीतकारांनी लतादीदींकडून गाणी गाऊन घेतली. अशा प्रकारे यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करीत असताना लतादीदींनी मागे कधी वळून पाहिलेच नाही.

९) गायकी:

मा.दीनानाथांच्या जन्मशताब्दीनिमित्त २००० साली पुणे येथील एस.पी.
महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘मेरी आवाज सुनो’ हा कार्यक्रम झाला होता. या
कार्यक्रमात निवेदक हरिष भीमाणी यांनी लतादीदींना तुमचे वय किती असा
प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी सांगितले ७१ वर्षे. त्यावर हरिष भीमाणी म्हणाले, तुमचे वय ७१ असले तरी ७१ च्या उलट १७ वर्षाच्या मुलीसारखा तुमचा आवाज आहे. यातच त्यांच्या गायकीचे दैवी रूप आपणांस दिसून येते. खानदानी डौल व नावीण्याची भरारी असा विलोभनीय संगम त्यांच्या गायकीत दिसून येतो. त्यांच्या आवाजात संमोहनं शक्ती होती. त्यांनी चित्रपट संगीताला संजीवनी दिली. संगीतकारांना काहीतरी वेगळे करून दाखविण्याची चेतना त्यांच्या स्वरातून मिळायची. लतादीदींच्या आवाजाचा परिसस्पर्श होताच साध्या चालीचे सुंदर गीतात रूपांतर व्हायचे. सांदी-कोपरा उजळून टाकणाऱ्या प्रकाशझोतासारखे त्यांचे स्वर होते.चित्रपट चालो की कोसळोत गाणी मात्र लखलखत्या झुंबरासारखी
असायची. त्यांच्या गाण्याने मराठी मनाची ओंजळ भरली तर भारतीय भाषांमधून
त्यांचा स्वर दरवळला. अमिताभ बच्चन एका ठिकाणी म्हणतात, आम्ही परदेशात
जातो. तेथील लोक आम्हांला म्हणतात, आमच्याकडे सर्व काही आहे. परंतु दोन
गोष्टी नाहीत. एक म्हणजे ताजमहल दुसरी म्हणजे लतादीदींचा स्वर.”

१०) लतादीदी व चित्रपट :

लतादीदींनी ‘आनंदघन’ या टोपन नावाने ‘साधी माणसं’,’मोहित्यांची मंजुळा’, ‘तांबडी माती’, ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन
केले. ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन लता मंगेशकर या नावाने
केले. पार्श्वगायन, संगीत दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी १९८६ मध्ये ‘लेकिन’ चित्रपटाची निर्मिती केली. ज्या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांनी
‘पहिली मंगळागौर’, ‘चिमुकला संसार’, ‘माझं बाळ’ या मराठी चित्रपटात तर
‘छत्रपती शिवाजी’ ‘बडी माँ’ ‘जीवन यात्रा’, ‘सुभद्रा’, ‘मंदीर’ या हिंदी।चित्रपटात भूमिका केल्या.

११) स्वभाव:

भारतरत्नासारखा मुकुट शिरावर विराजमान असतानाही त्या विनम्रपणे
वागायच्या. हजर जवाबीपणा व तीव्र विनोदबुद्धी याही देणग्या त्यांना मिळालेल्या
होत्या. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. साईबाबा, गजानन महाराज यांच्यावर त्यांची गाढ श्रद्धा होती. संत-साहित्यातही त्यांना अभिरुची होती. मीरेची भजने,
ज्ञानदेवांच्या विराण्या, गालीबच्या गझला, खानोलकरांच्या कविता, गुरुवाणी, गीता ही चित्रपटाच्या व्यस्ततेतूनही त्यांनी परमकर्तव्य भावनेने केल्या. छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी आदर्श त्यांच्यासमोर होते. विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर दिसून यायचा. त्याग, दातृत्व, सेवाभावी वृत्ती त्यांच्यात दिसून यायची. वैभवशाली स्टेज शो करून कोट्यवधी रुपयांचा मदतनिधी त्यांनी उभा केला. मा.दीनानाथांच्या नावाने प्रतिष्ठान सुरू केले. रुग्णालय सुरू केले. यातून गोरगरिबांना मदत करण्याचे काम केले.
फोटोग्राफीचा छंदही त्यांनी मनस्वी जोपासला होता. त्या फावल्या वेळात पेंटिंग
करायच्या. राष्ट्राबद्दलचे प्रेमही त्यांच्या मनात होते. ‘फुले वेचिता’ हा त्यांचा
आत्मचरित्रपर ग्रंथ. यात त्या म्हणतात,
देशाच्या सेवेसाठीच या देहाला वीरगती प्राप्त व्हावी. पण हे सर्व घडत असताना माझे संगीतही माझ्याबरोबर असावे.” प्रत्येक गाणे हे गळ्यातून नाही तर आत्म्यातून म्हणायच्या. याची साक्ष
‘ये मेरे वतनके लोगो…’ ह्या गीताने दिली आहे. त्यांचे हे गीत ऐकून पं.नेहरूच
नव्हे तर संपूर्ण भारत रडतो. ‘अल्ला तेरे नाम…’ ‘मिले सूर मेरा तुम्हारा…’ अशी गीते गाऊन त्यांनी सर्वधर्म समभावाची भावना प्रकट केली आहे.

१२) लतादीदी आणि त्यांचे पहिले कार्यक्रम, चित्रपट:

१. रंगमंचावरील पहिले गायन – वयाच्या ९ व्या वर्षी सोलापूर येथे
२. शास्त्रीय संगीताची मैफल- दीनानाथांच्या पहिल्या पुण्यतिथी दिनी कोल्हापूर येथे.
३. नाटकातील पहिली भूमिका – सौभद्र नाटकात नारदाची
४. गायन स्पर्धेतील पहिले बक्षिस – ‘खजांची’ चित्रपट गीताच्या स्पर्धेत
५. रेडिओवरचे पहिले गाणे – ‘मोरी निंदीया’ – १६ डिसेंबर, १९४१
६. चित्रपटातील पहिला स्वतंत्र अभिनय – पहिली मंगळागौर (१९४२)
७. पहिला मराठी चित्रपट – ‘किती हसाल’ (१९४२)
८. पहिले हिंदी चित्रपटातील गाणे – ‘पा लागू शाम करी जोरी रे’
९. स्वतंत्र पहिली मराठी चित्रपट निर्मिती – वादळ (१९५३)
१०. स्वतंत्र पहिली हिंदी चित्रपट निर्मिती – झांझर (१९५३)
११. परदेशातील पहिला कार्यक्रम – रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये (१९७४)

१३) पुरस्कार/मानसन्मानः

लतादीदींना शेकडो पुरस्कार व मानसन्मान मिळाले. त्यांपैकी काही विशेष
पुरस्कारांची यादी खालीलप्रमाणे सांगता येईल.
१. १९५८, १९६२, १९६५ आणि १९६९ – फिल्मफेअर पुरस्कार
२. १९६९ – पद्मभूषण (भारत सरकार)
३. १९८० – जॉर्ज टाऊन नगराची चावी सन्मानपूर्वक अर्पण (द. अमेरिका)
४. १९८० – अमेरिकेचे सन्मानपूर्वक नागरिकत्व प्रदान
५. १९८४ – पासून मध्यप्रदेश सरकारकडून ‘लता मंगेशकर पुरस्काराची’ सुरुवात
६. १९८९ – दादासाहेब फाळके पुरस्कार
७. १९९४ – इंदिरा गांधी पुरस्कार
८. १९९५ – ‘हम आपके हैं कौन’ – या चित्रपटातील ‘दीदी तेरा देवर दिवाना’
या गाण्यासाठी विशेष फिल्मफेअर पुरस्कार
९. १९९७ – राजीव गांधी सद्भावना पुरस्कार
१०. १९९७ – महाराष्ट्र भूषण – (महाराष्ट्र सरकार)
११. १९९९ – पद्मविभूषण (भारत सरकार)
१२. २००१ – ‘भारतरत्न’ – (भारत सरकार)
१३. २००६ – फ्रान्सचे नागरिकत्व सन्मानपूर्वक प्रदान
*या सोबतच त्यांच्या पार्श्वगायनाच्या उज्ज्वल कारकीर्दीबद्दल गिनीजबुकात नोंद.

  • अनेक विद्यापीठांकडून डॉक्टरेट, डी.लिट. इ. पदव्या बहाल करण्यात आल्या.
    *तिरुपती संस्थानाकडून आस्थाना विद्वान ही पदवी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

१४) लता दीदींबद्दलचे गौरवोद्गार :

१. “आकाशात देव आहे की नाही हे मला ठाऊक नाही. पण आकाशात चंद्र
सूर्य आहेत आणि लताचे सूर आहेत.”
-पु.ल.देशपांडे
२. “सूर्य रोज़ उगवतो, तरी जसा तो शिळा होत नाही. चांदणे नेहमी दिसते, तरीही ते कधीच कोमेजत नाही. सकाळ-संध्याकाळचे क्षितिजाच्या काठावरील आकाशसौंदर्य जसे कधी विरत नाही तसे लताबाईच्या स्वरांचे मोहन कधी उणावलेले नाही.”
-प्रा.राम शेवाळकर
३. “स्वर, शब्द, सिद्धी आणि लय ह्या चार गोष्टी एकत्र आल्यानंतर कसा परिणाम
होतो ह्याचं लताचं गाणं हे मूर्तिमंत उदाहरण होय.” – पं.भीमसेन जोशी
४. “ऐकता मी गायकांना वानितो त्यांच्या स्वरांना
ऐकता गाणे लताचे मानितो मी ईश्वराला”

  • मंगेश पाडगावकर
  • लता मंगेशकर यांनी चित्रपट संगीताला एका उच्च अभिजातसंगीताच्यापातळीवर नेले. मधुबाला, नर्गीस, मीनाकुमारीपासून ते आजच्या माधुरी दिक्षीत, ऐश्वर्या रॉयपर्यंत त्यांनी आपला आवाज अनेक नट्यांना दिला. १९४७ पासून त्या अविरतपणे गात होत्या. वयाची ९० व्यावर्षानंतर सुद्धा त्यांचा
    स्वर यौवनात होता. क्रांतिस्वरांचे तारुण्य त्यांनी अखेरपर्यंत जपले.अशा महान लता दिदींनी वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.त्यांच्याआत्म्यास शेती लाभो.भावपूर्ण श्रद्धांजली..!

-प्रा.डॉ.संदीपान जगदाळे
संगीत विभाग
दयानंद कला महाविद्यालय,लातूर
८२७५४५४६९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]