अधिराज जगदाळे व समीक्षा हुरदळे यांचे गायन
लातूर दि. १६ मराठवाड्यातील थोर संगीत तज्ञ स्वर्गीय पंडित शांतारामजी चिगरी गुरुजी यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक शहराबरोबरच लातूर येथे सुरताल संगीत महाविद्यालयात संगीत सभेचे आयोजन करण्यात आले. यात उदयोन्मुख गायक कलावंत अधिराज जगदाळे व समीक्षा हुरदळे यांनी शास्त्रीय गायन व सुगम गायन सादर करून गुरुजींना स्वर सुमनांजली अर्पण केली.

प्रारंभी कु. समीक्षा हुरदळे हिने तिलक कामोद रागातील ‘कोयलिया बोले अंबुवा डाल पर‘ ही बंदीश आलाप व तानांच्या तयारीने सादर केली. त्यानंतर ‘पांडुरंग नामी लागलासी ध्यास‘ व ‘खेळ मांडीयेला वाळवंटी ठाई‘ हे भजन सादर करून श्रोत्यांची दाद मिळविली. तिला हार्मोनियमची साथ महेश काकनाळे यांनी केली तर तबल्याची साथ वेदांत आडसकर यांनी केली.
त्यानंतर अधिराज जगदाळे याने पुरिया धनश्री रागातील ‘अब तो ऋत मान‘ ही बडा ख्यालाची बंदिश सादर केली. आलाप, बेहलावे व तानांनी त्याने राग सजविला.त्यानंतर याच रागातील ‘पायलिया झनकार मोरी‘ ही छोटा ख्यालाची बंदीश सादर केली. हंसध्वनी या रागातील ‘काहे करत गुमान‘ ही छोट्या ख्यालाची बंदिश उत्तम पद्धतीने त्याने पेश केली.

पं.श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले व पं.वसंतराव देशपांडे यांनी गायलेले ‘बगळ्याची माळ फुले‘ हे भावगीत सादर करून रसिकांना भावविभोर केले. ‘ययाती देवयानी‘ या नाटकातील ‘हे सुरांनो चंद्र व्हा‘ हे नाट्यगीत तयारीनिशी सादर करून श्रोत्यांची दाद मिळविली.त्यानंतर ‘अवघे गरजे पंढरपुर‘ हा अभंग सादर करून रसिकांना भक्तीरसात चिंब केले तर ‘स्वामी कृपा कधी करणार‘ या भैरवी रागातील भजनाने संगीत सभेची सांगता केली. त्याला तबल्याची साथसंगत प्रा. डॉ. संदिपान जगदाळे यांनी केली तर हार्मोनियमची साथ महेश काकनाळे यांनी केली.

संगीत सभेचे सूत्रसंचालन प्रा.परमेश्वर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संजय सुवर्णकार यांनी केले. संगीत सभेसाठी प्रा.शशिकांत देशमुख प्रा. हरीसर्वोत्तम जोशी, तेजस धुमाळ, राहुल कांबळे,शरद होळकर यांच्यासह स्व.पंडित शांतारामजी चिगरी गुरुजी यांचे अनेक शिष्य व रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.