प्रदीप उर्फ गोपी कुलकर्णी, सतीश वैद्य, शैलेंद्र उर्फ बाळू मसलेकर, सचिन वाघमारे, धीरज बिडवे, विद्याधर पुरंदरे आणि असीम चाफळकर या सात सोलापुरी रत्नांचा सत्कार सोहळा काल, रविवारी किर्लोस्कर सभागृहात चांगलाच रंगला. संयोजक जयतीर्थ पडगानूरसह सर्वांचाच प्रचंड उत्साह आणि सत्कारमूर्तींबद्दलच्या जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेला हा कार्यक्रम होता. सोलापूरातून पुण्यात किंवा अन्य मोठ्या शहरात जाऊन नावलौकिक, यश संपादन केलेल्या ‘सोलापूर रत्नां’चं घरगुती अघळपघळ वातावरणात होणारं कौतूक उल्लेखनीय होतं.
सातही रत्नांशी दीप्ती इंगळे-सिद्धमने मारलेल्या गप्पांमधून त्यांची व्यक्तिमत्व उलगडत गेली. शिक्षिका असलेली दीप्ती उत्तम नाट्यकलावंत तर आहेच, पण तिच्या उत्तम सूत्रसंचालनाचंही कौतूक!
विद्याधर पुरंदरे यांनी सॉफ्टवेअर एक्स्पोर्ट्स असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून उत्तम काम केलं आहेच, पण ‘अॅडव्होकसी ’ करताना सोलापूर भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये उत्तम नोकऱ्या लागाव्यात, यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांनी आपल्या कामाची उत्तम माहिती दिली.
तीच गोष्ट धीरज यांची. पुण्यातल्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रोग्रॅम हेड म्हणून काम करताना मिळवलेलं यश उपस्थित सोलापूरकरांना अभिमानास्पद वाटत होतं. जमलेल्या मित्रांच्या गोतावळ्याला किती सांगू असं त्यांना झालं होतं, त्याचाही सर्वांनी आनंद घेतला.
कमी बोलून आणि बासरीच्या सुरावटीतून अधिक चांगला संवाद साधणाऱ्या सचिन वाघमारेचं अलगूज रसिकांना सुखावून गेलं. श्रेया घोषालसह अन्य अनेक नामवंत गायक-गायिकांना सचिन बासरीची साथ करण्यासाठी देशविदेशात फिरत असतो.
सतीश वैद्य हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व. गायन, वादन, चित्रकला, लेखन, पर्यटन, बँकिंग अशा सगळ्या क्षेत्रात सहजतेनं मुशाफिरी करताना मिळालेलं संचित त्याने श्रोत्यांपुढे उलगडून दाखवलं. ‘काय बे, कसं बे’ हे त्यानं लिहिलेलं, गायलेलं आणि संगीत दिलेलं गाणं जगभर पोचलं आहे. सोलापूरविषयी असलेला अभिमान सतीशच्या वाक्यांतून आणि देहबोलीतूनही जाणवत होता.
‘आई-वडिलांनी टाकलेली मुलं आणि मुलांनी टाकलेले आई-वडील यांचा सांभाळ’ तळेगाव-दाभाड्यातल्या ‘केअरिंग हँड्स’ संस्थेत करणाऱ्या शैलेंद्र तथा बाळूने दिलेल्या माहितीने उपस्थित हेलावले. खूप मोठं काम तो आणि त्याचा मित्र अंबादाससह त्यांची टीम करीत आहे. श्री. नाईक यांनी त्यांना त्यासाठी आठ कोटी रुपये किमतीची जमीन दान केल्याचं सांगितलं तेव्हा सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
आधुनिक जीवशास्त्राची साधनांची चर्चा ‘जनुककोश’शास्त्रातून करणाऱ्या असीमचं कौतूक सगळ्यांनाच होतं. दिल्लीत जैवभौतिक शास्त्रात त्यानं पीएचडी केली. तो उत्तम विज्ञानकथा लेखक आहे. शिवाय गायकही. कोणत्याही वाद्याची साथसंगत न घेता संत ज्ञानेश्वरांची रचना त्याने यावेळी उत्तम सादर केली. मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयात तो प्राध्यापक आहे. आर्किटेक्ट अमोल व सीमा चाफळकर यांचा तो मुलगा आहे.
प्रदीप उर्फ गोपीचा सन्मान नाट्य-चित्रपट कलावंत म्हणून झाला, पण बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या अवजड मशीन्सचं विक्रीकौशल्य त्याच्याठायी कसं आहे हे त्याच्याशी झालेल्या संवादातून समजलं. सर्वसामान्यपणे ‘जेसीबी’, ‘पोकलेन’ या ५० लाख रूपयांच्या पुढे किंमत असलेल्या मशीन्सची ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीसाठी तो करतो. त्यानं त्याच्या नाटक-सिनेमाच्या रंजक आठवणी सांगितल्या, नाना पाटेकर, श्रीराम लागू, संजीवकुमार यांचे आवाज काढला. त्याला रसिकांनी जोरदार दाद दिली.
मुंबई नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य आणि निर्माते विजय साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला, तोही औचित्यपूर्णच म्हणावा लागेल, कारण ‘लावण्यखणी’, ‘चौफुला’सारख्या कार्यक्रमातून त्यांनी महाराष्ट्रभर सोलापूरचं नाव गाजवलं आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बाबूराव पडगानूर, अनिल वाघमारे, अशोक मोरे, रवींद्रनाथ शेंडगे, चंद्रकांत पंडित, दिलीप वडापूरकर आणि बाबूराव देसाई यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले गेले. त्यांच्या कुटुंबीयांनीच संबंधित रत्नांचा गौरव केला, ही जयतीर्थची कल्पना वाखाणण्याजोगी होती. शिवाय सत्कार होताना त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनाही मंचावर आमंत्रित करण्याची कल्पना चांगली होती. जोसेफिया जब्बार मुर्शद या छोट्या गायिकेनं आत्मविश्वासानं सादर केलेल्या गाण्यांवर रसिकांनी ताल धरला. गोड गळ्याची देणगी तिला लाभली आहे. मुकुंद लिमये यांनीही गीते सादर केली.
माझ्याशेजारी बसलेले गिरिधर गवई, राजू पाटील, श्री. वैद्य कुटुंबीय वक्त्यांच्या बोलण्याला योग्य तिथे दाद देत होते. सगळ्या सत्कारमूर्तींचे कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतक यावेळी उपस्थित होते. त्यामुळं वातावरण कौटुंबिक झालं होतं. एकूण कार्यक्रम रंगला, पण वेळेचं भानही महत्त्वाचं. प्रशांत देशपांडे, जयप्रकाश कुलकर्णी, शिरीष देखणे, गुरु वठारे, शोभा बोल्ली, प्रशांत बडवे, मिलिंद पटवर्धन, देवदत्त जोशी, शिरीष कुलकर्णी, विजयकुमार व क्षितिजा गाताडे, महांकाळेश्वर शिंदे, संदीप कुलकर्णी, राहूल कोल्हटकर यांच्यासह अनेक नामवंत या समारंभाला उपस्थित होते.
- रजनीश जोशी
- (लेखक हे सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत )
(छायाचित्र – केवल तिवारी)
०००