23.1 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeदिन विशेष*सोलापूरची गड्डा यात्रा..*

*सोलापूरची गड्डा यात्रा..*


            ३१ डिसेंबर संपले की, वेध लागतात ते सोलापुरातील प्रसिद्ध अश्या ‘गड्ड्याचे’…! काही भागात दिसायला लागतात त्या चिक्कीच्या, रेवडीच्या गाड्या आणि ‘दिल’ आकारात टांगलेली ती चिक्की..! सुटलं की नाही तोंडाला पाणी…?  पंचकट्ट्याजवळ गड्ड्याचे येते. कित्तेक वर्षापासून मी पहात आलोय सोलापुरातील टेक्स्टाईल कंपनीचे त्यावर श्री सिद्धेश्वराची प्रतिमा असलेले वाँल हंँगिंग…!  सोलापुरातील इंग्रजी माध्यमातील मुलांना नाताळाची सुट्टी आणि मराठी माध्यमातील मुलांना गड्ड्याची सुट्टी… किती उत्साह असायचा. होम मैदानावर प्रशासना मार्फत पाणी मारले जायचे. साधारण ८ ते १० जानेवारी पर्यंत सर्व दुकाने तयार असतात. मी निरीक्षण केले केलंय की, काही दुकानाची जागा ठरलेल्या असतात. तो दुकानदार दरवर्षी आपल्याला त्याच जागेवर पाहायला मिळतो. उदाहरण द्यायचे झाले तर सोलापूरचा प्रसिद्ध असा ‘भाग्यश्री वडा’, रामप्रसाद आणि लक्ष्मिप्रसाद चिवडा तसेच मैसूर ची पितळी भांडी असलेले दुकान. कित्तेक वर्ष मी पाहतोय त्याच जागी असतात.


लक्ष्मी मार्केटकडून पंचकट्ट्याकडे जायच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने लाखेच्या आणि काचेच्या बांगड्या विकत असणाऱ्या महिला मी लहान पणापासून पहात आलोय. पंचकट्ट्यावरून  जाताना नजरेस पडतात ते रांगोळीचे छाप आणि आप्पे पात्र विकण्यास बसलेले लोक असे कितीतरी सांगता येतील. साधारण १५ ते २० वर्षापूर्वी एक गोष्ट खूप प्रसिद्ध होती. किल्लीच्या किचैनवर स्वतःचे किंवा मैत्रिणीचे नाव पंचकरून दिले जायचे. मला अजूनही आठवतंय मी तबल्याच्या आकारात असलेल्या किचैनवर मी माझे नाव कोरून घेतले होते. दोन दुकानांच्या मध्ये असलेल्या जागेतही छोटे छोटे दुकानदार आपला माल विकण्यासाठी येत. त्यामध्ये चकली, शेव तयार करणारी प्लास्टिक चे यंत्र मिळायचे. जी अजून सुद्धा मिळतात. पण त्यावेळी त्याच अप्रूप होतं. तो दुकानदार प्रात्यक्षिक करून दाखवत असे. ते पाहिल्यावर वाटायचं किती सोप्प  आहे. आपल्यालाही जमेल, पण घरी आल्यावर तसं  काही आत्तापर्यंत जमायंच देखील नाही.  कांदा, टोमाटो, गाजर, कोबी कापण्याच यंत्राचा अनुभव असाच काहीसा असायचा. तिथ तो पटापट करायचा पण घरी त्याचे प्रात्यक्षिक करून बघायचे म्हणले तर येत नव्हते. थोडं पुढे गेलं की महिलांसाठी नाकातल्या, कानातल्या आणि डोक्यातल्या सर्व वस्तू मिळायचे ठिकाण..! जगात कुठेही गेलात तरी महिलांना अशा प्रकारचं दुकान दिसलं की त्यांची पावलं गाडीचे स्टेरिंग वळवावी तशी वळतात.  जरी घरात ५० पिनांचा, रबरांचा, टिकलीचा बॉक्स, बांगड्याचा सेट असला तरी नवीन काही मिळत का हे पाहतातच. नंतर पुढे नजरेत पडतात पर्स आणि कप बशी, डिनर सेट चे दुकान. नुसत पहिलं तरी समाधान वाटाव अशी मांडणी करून ठेवलेली असते. रस्त्याच्या मधोमद फुगे विकणारा किंवा पाण्याचे फुगे उडवणारा माणूस मनाला प्रसन्न करायचा. एवढ्या गर्दीत, गोंधळात बासरीचेसुद्धा सूर ऐकू येत होते. त्याच्या आवाजाच्या दिशेने गेल्यावर समजायचे तो एकाच हाताने बासरी कशी काय वाजवतो ? मग समजायचे एका हातात बासरी आणि दुसऱ्या हातात त्याच्या बासरींनी भरलेली काठी असायची. त्या माणसाबद्दल आदर वाटायचा, एवढा कला संपन्न माणूस त्याने एखाद्या स्टेजवर परफॉर्म करायला पाहिजे पण नशिबाचे फेरे असे काही असतात की एखाद्याच्या नशिबी अशाप्रकारची कला पेश करूनच आणि ते वाद्य विकूनच त्याचा चरितार्थ चालवावा लागतो. हे त्यावेळी लक्षात यायचे नाही. होम मैदानाजवळ पोलीस चौकीशेजारी सोलापूरचा सुप्रसिद्ध भाग्यश्री वडा..! त्याच्या दुकानासमोरून पाय पुढे टाकला जायचाच नाही. गरम गरम बटाटेवडा खाल्ल्याशिवाय गड्डा पाहण्याचं सुख मिळतच नव्हतं. दोन बटाटेवडे, एक लिंबाची फोड आणि शेंगाची चटणी वाह… वाह… काय ती लज्जत… भारीच… जाऊदे … आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊ. त्या भाग्यश्री वडा च्या दुकानाशेजारी आणि समोर फोटो स्टुडीओ असायचे. गड्ड्यावर गेलात आणि फोटो काढला नाही म्हणजे काही तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटायचे. आत मध्ये गेल्यावर गाडी, सायकल किंवा नट नट्यांचे कटआउट असायचे. कधी गाडीवर बसून तर कधी नट नट्यांच्या गळ्यात हात टाकून फोटो काढायचा. फोटो प्रिंट मिळाल्यानंतर तो फोटो पहायची आणि दुसऱ्यांना दाखवायची उत्सुकता असायची. आता प्रत्येकजण फोटोग्राफर झाला आहे. प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळे कुठेही आणि कधीही फोटो काढतो. लगेचच मित्रांना सुद्धा दाखवता सुद्धा येतो. काळ बदलत गेल्यामुळे आता ती दुकाने दिसत नाहीत.


सिद्धेश्वर प्रशाले समोर मोठी मोठी दुकानं असायची तिथे आता मोठाली इमारत उभी होत आहे. पण त्यावेळी तिथेही  पावभाजी, मसाला डोसा, चायनीज चे पदार्थ असे अनेक खाद्य पदार्थ पाहायला आणि चाखायला मिळत होते थोडं पुढ गेल्यावर धुमाळ रस पण गृह …! गड्ड्यावर गेल्यावर उसाचा रस पिलाच पाहिजे.  त्या उसाच्या रसाच्या यंत्राला बैलाची घुंघरं लावलेली असायची. त्या आवाजाने हाताला ठेका धरायला भाग पाडायचे. अश्या काही छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद गोळा केला. होम मैदानावर आल्यावर मोठे मोठे पाळणे पाहायला आणि अनुभवायला मिळतात. गड्ड्यावर जाऊन आलात की मित्र कंपनी विचारायची. …” काय बे… पाळण्यात बसला गीसला की नाई..? ” कारण पाळणा हे गड्ड्याचे मुख्य आकर्षण होते नव्हे आहे. पाळण्या बरोबरीने जादूचे प्रयोग, बोलणारी बाहुली तसंच त्यातील एक मौत का कुवाँ.. नावाप्रमाणेच असलेला हा सहसी खेळ आम्ही पहायचो. आत्ताही असे साहसी खेळ खेळतात. अंगाचा थरकाप उडवणारा खेळ..! पण पोटच्या खळगीसाठी हे लोक जीवावर उदार होऊन असा खेळ खेळतात. ह्याला खेळ कसं म्हणावं याचा प्रश्न पडतो.
होममैदानावर अजून एक गोष्ट होती ती म्हणजे बाबा गाडी. त्यावेळी रेल्वे विभागा मार्फत कमी दरामध्ये बाबा गाडी (मिनी ट्रेन) असायची.  त्या गाडीत बसल्यावरही मजा वाटायची. छोट्याशा बोगद्यातून गाडी जाताना आमची शिट्टी आणि गाडीची शिट्टी एकदम वाजायची. नुसता कल्ला असायचा. तीन फे-या मारुन झाल्या की गाडी फ्लॅटफाँर्मला.  आता तशी बाबा गाडी नसते. त्या ठिकाणी शेतक-यांसाठी कृषि प्रदर्शनाचे स्टाँल असतात. आता  तेही तितकेच महत्वाचे आहेत. होममैदानाचे आता रुपच बदललेले आहे. सोलापूर स्मार्ट सिटी मध्ये आल्यामुळे होम मैदान ही स्मार्ट झाले आहे. हे त्याचे बदललेले रुप डोळ्यांना आणि मनाला समाधान देणारं आहे. तिथला केलेला वाँकींग ट्रँक असेल, तिथे लावलेली स्पिकर सिस्टीम असेल,  तिथले दिवे असतील अशा ब-याच सोयी सोलापूर महानगर पालिकेनी  उपलब्ध करुन दिल्या आहेत. याची भर यंदाच्या २०२० च्या गड्डा यात्रेमध्ये पडणार आहे.
गड्ड्यावरचा अजून एक गमतीशीर दुकान म्हणजे फुगे फोडायचे दुकान..!  त्यात त्या लांबसडक बंदुकीने फुगे फोडायचे… काय गंमत असायची त्यात… जेवढे लांबून आणि कोण जास्त फुगे फोडतात याची पैज लागायची. तो फुगे चाकटवणारा माणूस हाताने ते फुग्याचे पँड फिरवायचा आणि मग.. आपण तो नेम धरुन फोडायचा. फुगे फोडल्यावर आपण जणू काही वाघाशी शिकार करुन आलो आहे की काय.. असा आवीर्भाव असायचा. अप्रुपच वाटायचं. 
गड्डायात्रेला भक्तीची झालर असल्यामुळे हा आनंद आपण लुटतो आहोत. ही झालर म्हणजे श्री सिध्देश्वरांचे सात नंदीध्वज..! महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या भागातील भाविक मोठ्या संख्येने येतात. चार दिवस या नंदीध्वजाची सोलापूरातून मिरवणूक निघते.  बरोबरीने श्रीसिध्देश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगाना तैलाभिषेक होतो. यात सात नंदीध्वजाचे मानकरी नंदीध्वज पेलत आकाशाकडे आणि वरच्या गोलाकार भागाकडे पाहत चालत असतात. खरं पाहिलं तर इतकं अवघड काम भक्ति आणि श्रध्देच्या जोरावरच पूर्ण होत असेल यात काही शंका नाही.  चार दिवस चाललेल्या सोहळ्याचा परमोच्च क्षण म्हणजे अक्षता सोहळा..! यावेळेस सिध्देश्वर मंदिराचा परिसर न्हाऊन निघतो.   या नंदीध्वजाचे मानकरी आणि भाविकांच्या  बाराबंदी या पांढऱ्या शुभ्र पारंपारिक परिधान केलेल्या पोषाखाचे दृश्य सागराच्या फिकट निळ्या लाटावरील शुभ्र तुरे  आपोआप पुढे सरकत आहेत असे  वाटते. यावेळी ज्येष्ठ कवि मंगेश पाडगावकर यांच्या ‘शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा’ या गीतातील ओळी आठवतात.   ‘हर्र बोला हर्र’ या जयघोषाने परिसर दुमदुमून निघतो.  हे सात नंदीध्वज डोलकाठीसारखे डोलणारे, हिंदकाळणारे आणि त्याच्या हिंदकाळणा-या नंदीध्वजाला  शोभेसाठी बांधलेले बेटाडी कागदाचे सकाळच्या ऊन्हात चकाकणारे वर्तुळाकार लोलक एका विशिष्ट लयीत हलताना पाहून मनही तसंच डोलू लागतं. अशी अप्रतिम शोभा डोळ्यात आणि ह्रदयात कित्येक वर्षापासून आम्ही साठवली आहे. यापुढेही साठवणारच आहोत.
अशी ही गड्डा यात्रा शोभेच्या दारूकामाने संपन्न होत असे. तीच परंपरा आजतागायतही चालू आहे. ही गड्डा यात्रा २६ जानेवारी पर्यंत चालू असते.
काय आणि किती गोष्टी सांगाव्या शब्द अपुरे पडतात. आताची पिढी आणि चाळीशीतले लोक यांच्या नजरेतून ही गड्डा यात्रा ही वेगळी वेगळी आहे. असं मला वाटतं . कारण आताच्या पिढीला कोणतीही गोष्ट इतक्या सहज रितीने उपलब्ध होत आहे की त्यांना त्याचे अप्रुपच वाटत नाही. तरीही आताच्याही पिढीनेही या आपल्या सोलापूरची ही गड्डा यात्रा अनुभवावी.

  • उमेश दत्तात्रय मोहोळकर
    मो. ९६३७९६७७५५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]