जसजसा काळ उलटत आहे, तसतसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या पत्रकारितेतून मांडलेले विषय,नवे विचार किती मूलगामी, महत्वाचे आहेत,हे स्पष्ट होत आहे.त्यामुळे त्यांची पत्रकारिता आजही प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन माध्यमकर्मी श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले.ते सावरकर जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र मंडळ , शिकागोच्या ‘साहित्य कट्टा’ आणि ‘इतिहास मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ या विषयावर
आयोजित खास व्याख्यानात बोलत होते.हे व्याख्यान झूमवर आणि महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या युट्युब वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले गेले.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक, द्रष्टे विचारवंत, कवी, साहित्यिक, भाषा सुधारक म्हणून सुपरिचित आहेत. पण
श्री देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या व्याख्यानात सावरकरांनी शाळेत असल्यापासून ते पुणे, मुंबई, लंडन येथे शिकत असताना व नंतर अंदमानच्या कारागृहातून व पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर केलेली जाज्वल्य पत्रकारिता या त्यांच्या चरित्रातील अल्पपरिचित अशा पैलूवर आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकला.त्यांचे हे व्याख्यान अभ्यासपूर्ण होते. हा विषय अतिशय विस्तृत असला तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्रकारितेचा समर्पक आढावा त्यांनी थोड्या वेळात घेतला. हे व्याख्यान ऐकतांना अनेक श्रोते नतमस्तक आणि निःशब्द झाले होते.
ज्येष्ठ इतिहास संशोधक,लेखक श्री श्रीधर दामले यांच्यासह सहभागी श्रोत्यांनी व्याख्यानोत्तर चर्चेत उत्साहाने भाग घेऊन सावरकरांच्या पत्रकारितेसह इतरही अनेक पैलूंवर सखोल चर्चा केली. क्रांतिकार्य, स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यातील त्यांचे अमोल योगदान, मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहिलेल्या कथा, नाटके आणि काव्य, जाती आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी केलेले प्रेरणादायी कार्य, भाषाशुद्धी, राजकीय व सामाजिक विषयांवर त्यांची भाषणे, लेख आणि ऐतिहासिक विषयांवरील त्यांचे लेखन यावर आणि कार्यपूर्तीनंतर आत्मार्पण या विषयावर त्यांनी लिहिलेला लेख अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.
वक्ते श्री. देवेंद्र भुजबळ यांनी आवर्जून मराठी आणि भारतीय संस्कृतीच्या विकास व प्रचाराच्या कार्यात महाराष्ट्र मंडळ , शिकागोने गेल्या अनेक दशके केलेल्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव गोगावले व चेतन रेगे यांनी केले. इतर आयोजकांबरोबर मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अथणीकर, श्रद्धा भट, आणि अश्विनी कुंटे यांनी तांत्रिक बाबी सांभाळल्या. आणि इतर आयोजकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली.
साहित्य कट्टा – अल्प परिचय
अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या कार्यकारिणीने कोव्हिड काळामध्ये महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या अध्यक्षा सौ उल्का नगरकर यांच्या पुढाकाराने अनेक उपक्रम सुरू केले, त्याचा श्री गणेशा ‘साहित्य कट्टा’ या ग्रुपने झाला.
शिकागो विद्यापीठातील मराठीच्या प्राध्यापिका व नामवंत साहित्यिक डॉ. सुजाता महाजन व रश्मी चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘साहित्य कट्टा’ व ‘बोलका कट्टा’ ही रोपे लावली गेली. आजही ‘साहित्य कट्टा’चे आयोजक तो यशस्वीरीत्या चालवीत आहेत.
‘साहित्य कट्टा’ मागचे उद्दिष्ट प्रामुख्याने अमेरिकेत मराठी भाषेची जोपासना करून वाचन-लेखनाद्वारे ती वृद्धिंगत करणे, सभासदांच्या मनात मराठी साहित्याविषयी गोडी निर्माण करणे, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या साहित्याच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ देणे, ज्यांच्यात साहित्यिक दडला आहे त्याला जागृत करणे आणि अर्थातच उत्तम कार्यक्रम आयोजित करून श्रोत्यांचे मनोरंजन करणे हे आहेत. ‘साहित्य कट्टा’ वरील बरेच सभासद ‘रचना’ या अंकात आपले साहित्य प्रसिद्ध करतात.
मंगळवारी रात्री आठ वाजता ‘साहित्य कट्टा’ चा आभासी कार्यक्रम असतो. यात ‘महाराष्ट्र मंडळ शिकागो ‘चे सभासद किंवा आमंत्रित पाहुणे मराठी साहित्य अथवा साहित्यविषयक कार्यक्रम सादर करतात. अनेक सभासद या आभासी कार्यक्रमाचा फायदा घेत आहेत. ‘साहित्य कट्टा’ च्या बहुतेक कार्यक्रमांचे ध्वनिचित्रमुद्रण केले जाते. मंडळाच्या वेबसाईटवर किंवा युट्यूब वाहिनीवर लोकांसाठी उपलब्ध केले जातात. त्यांचा आस्वाद आपल्या वेळेनुसार श्रोते घेऊ शकतात.
ह्यावर्षी ‘साहित्य कट्टा’ चे आयोजक माधव गोगावले, श्रद्धा भट, समीर कुलकर्णी, अश्विनी कुंटे, मिलिंद साळी आणि मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अथणीकर हे आहेत.
ते ‘साहित्य कट्टा’ वर विविथ कार्यक्रम आयोजित करतात.
महिन्यातील पहिल्या मंगळवारी सभासद स्वरचित कविता, लेख किंवा आपल्याला आवडलेले साहित्य वाचतात. दुसऱ्या मंगळवारी एखादा प्रसिद्ध मराठी साहित्यिक वा कवी निवडून त्यांच्या साहित्यावर कार्यक्रम सादर केला जातो. तिसऱ्या मंगळवारी ह्या वर्षी नवीन सुरू केलेला कार्यक्रम ‘दुमडलेले पान’ या सदरात सभासद आपल्याला आवडलेले पुस्तक, कथासंग्रह, चरित्र, काव्यसंग्रह, कादंबरी याविषयी बोलतात. चौथ्या मंगळवारी ‘साहित्य कट्टा नसतो पण त्याऐवजी महिन्यातील चौथ्या रविवारी ‘बोलका कट्टा’ हा कार्यक्रम होतो. त्यासाठी भारतातून प्रसिद्ध लेखक-लेखिका, कवी-कवयित्री, नाटककार, गीतकार, पटकथाकार, पत्रकार, किंवा प्रसिद्धी माध्यमांवरील कलाकार यांना आमंत्रित केले जाते. या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या क्षेत्राविषयी, त्यांच्या अनुभवांबद्दल जाणून घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला जातो. महिन्यात जर पाच मंगळवार असतील तर त्यादिवशी ह्या वर्षापासून एखादा खास कार्यक्रम आयोजित केला जातो.
इतिहास मंच – अल्प परिचय
‘इतिहास मंच’ ची कल्पना चेतन रेगे यांना जानेवारी २०२१ मथ्ये सुचली, ती त्यांनी मंडळाच्या त्यावेळच्या अध्यक्षा उल्का नगरकर यांच्याकडे मांडली.
‘इतिहास मंच’ वर व्याखान आणि इतर उपक्रम कोरोना काळात करणे कठीण होते. परंतु यावर तोडगा काढत चेतन यांनी झूमवरून हे कार्यक्रम सुरू करायचा आणि जशी परिस्थिती अनुकूल होईल तसे समक्ष व्याखानांचे आयोजन करायचा निर्णय घेतला. ‘इतिहास मंच’ ची भूमिका देखील तेव्हाच ठरवली. उल्का नगरकर यांनी ही कल्पना आवडली आणि इतिहास मंचाचे संचालन आणि संयोजनाची जबाबदारी त्यांनी चेतनवर सोपवली. मंडळाकडून लागेल ती मदत मिळेल अशी खात्री मिळताच चेतन रेगे यांनी शिवजयंतीसह काही व्याख्याने आयोजित करून ‘इतिहास मंच’ सुरू केला. या व्याखानांना इतिहासकार व लेखक श्रीधर दामले आवर्जून उपस्थित राहतात. त्यांना हे उपक्रम नेहमीच कौतुकास्पद वाटत आले आहेत.
शिकागोतील अनेक इतिहास प्रेमी गेली अडीच वर्षे या कार्यक्रमांचा लाभ घेत आहेत. शिकागो परिसरातील अनेक इतिहास प्रेमी व तज्ञांची व्याख्याने या मंचावर झाली आहेत. तसेच भारतातून सुद्धा उत्तमोत्तम वक्ते मिळाले आहेत.
दर शुक्रवारी रात्री आठ वाजता ‘इतिहास मंच’ वर आभासी कार्यक्रम असतो. यावर ‘महाराष्ट्र मंडळ शिकागो’ चे सभासद किंवा आमंत्रित पाहुणे, इतिहास संशोधक, इतिहासाचे प्राध्यापक, लेखक आणि इतिहासविषयक क्षेत्रातील तज्ञ इत्यादींची व्याख्याने ठेवली जातात. मानवाचा इतिहास, अन्नाचा इतिहास, सिंधू संस्कृतीचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मराठ्यांचा इतिहास, पेशव्यांचा इतिहास, संत परंपरेचा कालपट आणि इतिहासातील अनेक व्यक्तींचा, इतर संस्कृतींचा, तसेच भारतातील विविध शहरांचा इतिहासही ह्या व्याख्यानात सादर केला जातो.
ह्यावर्षी ‘इतिहास मंच’ चे आयोजक, चेतन रेगे, माधव गोगावले, विशाल नवलकर, शलाका रेगे, अनुराधा केळकर आणि मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अथणीकर हे आहेत. ते ”इतिहास मंच’ वर विविथ कार्यक्रम आयोजित करतात.