सांज- सदानंद डबीर
पुस्तक परिचय- विश्वास सुतार, कोल्हापूर
आठवणींच्या गावावरती सांज उतरली…
किती पाखरे, थव्याथव्याने, घरी परतली! महाराष्ट्रातील एक आघाडीचे गझलकार, कवी सदानंद डबीर यांच्या ‘सांज’ या नव्या-कोऱ्या गझल संग्रहातील या दोन ओळी आहेत. सदानंद डबीर यांची गझलविषयक चौदा पुस्तके प्रकाशित आहेत. त्यापैकी आठ स्वतंत्र गझलसंग्रह आहेत. १९९४ मध्ये त्यांचा ‘लेहरा’ हा पहिला गझलसंग्रह प्रसिद्ध झाला. आता २०२२ मध्ये ‘सांज’ हा आठवा स्वतंत्र गझलसंग्रह प्रकाशित झाला आहे. मराठीतील अग्रगण्य प्रकाशन संस्था ‘ग्रंथाली प्रकाशन’ने हा संग्रह प्रकाशित केलेला आहे. मिलिंद जोशी यांचे अर्थवाही मुखपृष्ठ आणि सूचक मलपृष्ठ बरंचसं काही सांगून जाते.
सदानंद डबीर यांनी २०२० मध्ये आपल्या वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्याची ७५ वर्षे पार करणे ही मोठी उपलब्धी आहे. आयुष्याच्या या संधिकाली डबीर यांची लेखणी आणि प्रतिभा दोन्ही समांतरपणे कागदावर गझल उतरवतात. त्या अनुषंगाने या संग्रहातील गझल म्हणजे आयुष्याच्या सांजवेळच्या भावविश्वाचे आविष्कारण म्हणावे लागेल. म्हणूनच सांजवेळचा ‘मूड’ साधणाऱ्या कविता किंवा गझल यादृष्टीने या कविता वाचक मनाला निश्चितच भावतात.
‘सांज’ या गझलसंग्रहात एकूण ९६ रचनांचा समावेश आहे. सदानंद डबीर यांनी दोन- तीन वर्षात लिहिलेल्या गझलांची मांडणी आशयाच्या अनुषंगाने या संग्रहात केली आहे. एकूण गजलांचा निर्मिती काळ पाहता १३ जून, २०२० रोजी ‘बंदीवास (कोरोना १)’ ही कविता पहिल्या क्रमाने येते. मार्च २०२० मध्ये कोविड- १९ चे संकट संपूर्ण देशावर धावून आले. त्यानंतरच्या दोन-तीन महिन्यांचा संघर्षमय अनुभव लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ‘बंदीवास’ या गझलमध्ये डबीरांनी मांडला आहे.
काळाच्या पटलाचा विचार केला तर या संग्रहातील शेवटची गझल ५ ऑगस्ट, २०२२ रोजी लिहिलेली दिसून येते. ती गझलही विशेष आहे. ‘आयुष्याला रोज नव्याने’ शीर्षकांतर्गत डबीर आपल्या मतल्यामध्ये म्हणतात,
आयुष्याला रोज नव्याने भिडतो आहे,
रोज नव्याने तीच गजल मी, लिहितो आहे!
डबीरांच्या गझल म्हणजे अक्षरश: शब्दप्राजक्तांचा सडा असतो. तो नाकाला सुगंधीत करत नाही; तर मनाला सुगंधीत, आल्हाददायक बनवतो. कधीकधी संवेदनशीलतेने हृदय डचमळतो. ‘स्पर्धेत कधीही नव्हतो’, ‘परिक्रमा’, ‘धुंदीत जीवनाच्या’, ‘अभिमन्यू’ या गझल याचे प्रत्यंतर देतात.
‘पावसाच्या चेहऱ्यावर, आसवांनी लिहीत गेलो’ हा शेर बशीर बद्र यांच्या प्रेरणेतून त्यांनी लिहिल्याचे नमूद केले आहे. ‘मग लिही’, ‘बसून बोलू’, ‘विठ्ठला’, ‘किती माणसे’ या गझला त्यांनी एकाच आठवड्यामध्ये आपल्या प्रतिभासामर्थ्याने निर्मिल्या आहेत. ‘रस्ते फुलाफुलांचे’ ही गझल नवी दृष्टी देते.
‘उस्ताद’ आणि ‘नवे गाणे’ या दोन गझला आयुष्याचे सार सांगणार्या आहेत. ‘उस्ताद’ या गझलेमध्ये डबीर म्हणतात,
अनुभवांनी शिकवला ‘इस्लाह’ मित्रा
जीवनाच्या सारखा ‘उस्ताद’ नाही!
एकही तक्रार वा फिर्याद नाही
जीवनाशी कोणताही वाद नाही!
‘नवे गाणे’ ही गझलही जरूर चिंतन करण्यासारखी आहे. जीवनात डबीर खूप आशावादी आहेत.
वहीची संपली पाने
लिहू वाऱ्यावरी गाणे
असे अष्टाक्षरी गीत लिहून आपल्या गझल लेखनाच्या निरंतरतेबद्दल डबीर आत्मविश्वासाने ठाम राहतात. या संग्रहामध्ये ‘शुभ्र हसू’, ‘सावळ्याशा चेहऱ्यावर’ अशा काही गीतिका समाविष्ट आहेत. ‘डोळे पुसून’, ‘राधा’ या अष्टाक्षरी गझल आहेत, तर एक मुक्तक या संग्रहात दिसून येते.
सदानंद डबीर यांना संगीताचीही चांगली जाण असल्याचे त्यांच्या ‘मारवा’ या गझलमध्ये दिसून येते. खरंतर संगीतात ‘मारवा’ हा राग आहे. विशेष म्हणजे तो सायंकाळी गाण्याचा राग आहे. त्यामुळे राग आणि त्याचा गायनसमय याचा अनुबंध जोडत डबीर लिहितात-
सावल्यांच्या पालखीतुन गात आला
सांजवेळी, मारवा दारात आला
रिषभ, धैवत- दोन भोई पालखीला
षडज् धूसर मात्र भासे हरवलेला…
त्याच षड्जाच्या, जणू शोधात आला!
सांजवेळी, मारवा दारात आला!
सदानंद डबीर यांच्या गझल आणि कवितांना संगीत साथ देऊन अनेक मान्यवर आणि श्रेष्ठ दर्जाच्या कलाकारांनी त्यांचे गायन केले आहे. या संग्रहातील ‘एका हाकेचे अंतर, तरी सरता सरेना’ ही गझल दीपाली राजे या गायिकेने गायलेली आहे. अरुंधती केतकर यांनी या गझलला संगीतबद्ध केले आहे.
माणसं वृद्ध होतात तेव्हा संध्याकाळच्या सावल्यांची त्यांना भीती वाटू लागते. ‘संध्याछाया भिवविती हृदया’ असे त्यामुळेच म्हटले जाते. परंतु सदानंद डबीर यांचं आयुष्य अत्यंत समृद्ध आणि परिपक्व दिसून येते. आपल्या सांज आयुष्याला ते ‘आनंदपर्व’ म्हणतात. म्हणून त्यांचा अंतस्थ भाव ‘संध्याछाया सुखविती हृदया’ असा दिसतो. आपल्या एकंदर आयुष्याबद्दल याच संग्रहात सदानंद डबीर लिहितात,
भोगून संपले रे, सुखदुःख सर्व माझे-
आहे सुरू अता हे… ‘आनंदपर्व’ माझे!
थकली जरी तनू, ही, मन टवटवीत आहे
बघ सार्थ होत आहे, हे ‘सांध्यपर्व’ माझे!
ग्रंथालीने प्रकाशित केलेले हे ‘सांध्यपर्व’ अर्थात ‘सांज’ हा सदानंद डबीर यांचा गझलसंग्रह वाचनीय तर आहेच; परंतु रसिक वाचकांनी तो संग्रही ठेवावा असा नक्की आहे.
- विश्वास सुतार, कोल्हापूर
(९४२०३५३४५२) सांज (गजल- काव्यसंग्रह)
सदानंद डबीर
प्रकाशन: ग्रंथाली, मुंबई
पृष्ठे: ११२
मूल्य: १५० रुपये