इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील पंचगंगा नदीकाठावर सुरु असलेल्या भव्य १०८ कुंडीय श्री. गणपती महायज्ञ सोहळ्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात योग व ध्यान शिबिराने झाली. आर्ट ऑफ लिव्हींगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र पार पडले. उपस्थित भक्तगण, नागरिकांनी योगाची प्रात्यक्षिके करत ध्यान शिबिराचा लाभ घेतला.
सकाळी आठ वाजता श्री श्री १०८ सीतारामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री 108 गणपती महायज्ञस सुरुवात झाली. दुपारच्या सत्रात संवित कैलासचंद्र जोशी (जोधपूर) यांच्या गणपती महापुराण कथेला महिलांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रवचनाने माणसाची बुद्धी जागृत होते. सत्संग जीवनात खूप महत्त्वाचा असून यामुळे सुखी जीवनाला गती मिळते. श्री गणेशाने आपल्या आई-वडिलांमध्ये चरणाला स्पर्श करत विश्व पाहिले. तसेच प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांमध्ये विश्व पाहल्यास जगण्याची व्यापक दृष्टी मिळेल,असे संवित कैलासचंद्र जोशी यांनी कथेचे निरूपण करताना सांगितले. कथा व्यासपीठाची व्यवस्था महेश हौसिंग सोसायटी महिला मंडळाने केली.तसेच पंडित अक्षय अनंत गौड यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय नानीबाई का मायरा या कार्यक्रमाला सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीवर आधारित या संगीत कथेत भक्तगण रमून गेले.
दरम्यान,या महायज्ञ सोहळ्याला माजी आमदार सुरेश हाळवणकर,माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली.महायज्ञ सोहळ्याची विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला भेट देऊन माहिती घेत श्री श्री १०८ सीतारामदास महाराजांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला. त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक अजित जाधव, दिलीप मुथा, युवराज माळी, मिश्रीलाल जाजू आदींसह इतर मान्यवर व भाविक उपस्थित होते.