लातूर/प्रतिनिधी : येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी(दि.७)कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यासभा संयोजक तथा उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे,प्रमुख वक्ते प्रल्हाद माले,पर्यवेक्षक संदीप देशमुख,बबन गायकवाड, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख श्रीमती शैला सांगवीकर, परिपाठ प्रमुख श्रीमती वैशाली फुलसे यांची उपस्थिती होती. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.वक्ते प्रल्हाद माले यांनी शहीद कॅप्टन कृष्णकांत यांचा देशाप्रती असलेला समर्पण भाव, सैनिकांचे कर्तव्य व देशप्रेम याची माहिती सांगितली.कारगिलच्या युद्धात कॅ.कृष्णकांत यांनी केलेला अतुलनीय पराक्रम हा वाखाणण्याजोगा आहे.त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घ्यावी. त्याप्रमाणे आपणही कार्यरत व्हावे.शौर्य,धैर्य,पराक्रम अशा गुणांचा अंगीकार विद्यार्थ्यांनी करावा,असे आवाहन याप्रसंगी माले यांनी केले. अध्यक्षीय समारोपात महेश कस्तुरे यांनी भारत देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी प्राणाचे बलिदान दिले अशा वीरांचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे.शत्रूंशी लढतालढता त्यांना ७ जुलै रोजी वीरमरण आले. म्हणूनच आज बलिदान दिन आहे.भारतभूमीच्या या सुपुत्राला अभिवादन करू,असे मत मांडले. ज्ञानोपासक मंडळांतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय व स्वागत श्रीमती स्मिता मेहकरकर यांनी केले.सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन कल्याणी वाघ व श्रावणी ईश्वरशेटे हिने केले.श्रीमती जान्हवी देशमुख यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानोपासक मंडळ प्रमुख श्रीमतीतेजस्विनीसांजेकर,ज्ञानोपासक मंडळातील सर्व सदस्य , यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
उदगीर येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात कॅ.कृष्णकांत यांचा 24 वा स्मृतिदिन आज संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी कॅ.कृष्णकांत यांच्या वीरमाता ललिताबाई कुलकर्णी तसेच कु. संस्कारिका कुलकर्णी ,अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, प्रमुख वक्ते प्रशालेचे उपमुख्याध्यापक संजयराव कुलकर्णी, पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर ,लालासाहेब गुलभीले माधव मठवाले यांची उपस्थिती होती.
वीरमाता ललिता ताई कुलकर्णी यांनी कॅ. कृष्णकांत अगदी बालवयापासूनच देश प्रेमाने प्रेरित होते असे सांगितले.कारगिल युद्ध वीरता आणि विजय याची प्रतीक असून आपले भारतीय सैनिक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी वीरमरण सहज पत्करतात, शत्रूकडे पाठ फिरवण्याची वृत्ती आपल्या भारतीय सैनिकाची नाही .”देश हाच देव”असे समजून प्रत्येकाने कार्य केले तर देशावर कोणतेही संकट येणार नाही. भारत फक्त महासत्ता न करता भारताला विश्वगुरू कसे करता येईल, याविषयी विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे असे मत उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करत असताना मुख्याध्यापक अंबादास गायकवाड असे म्हणाले जन्माला येणारा प्रत्येक माणूस मरणानंतरही आठवणीत राहील असे नसते, परंतु मरणानंतरही 24 वर्षांनी आजही कॅ. कृष्णकांत आपल्यात जिवंत आहेत.. 7 जुलै 1999 चा दिवस शाळेतील सर्व शिक्षकांनी कशाप्रकारे अनुभवला. कॅ. कृष्णकांत यांच्या अंत्ययात्रेस अफाट जनसागर उसळला होता असे समारोपात अंबादास गायकवाड यांनी सांगितले.
प्रास्ताविक व स्वागत परिचय नीता मोरे, वैयक्तिक पद्य प्रीती शेंडे ,सूत्रसंचालन अंबिका पारसेवार ,आभार ज्योती घोडके यांनी मांडले. कारगिल युद्धाशी निगडित प्रोजेक्टर वर लघुपट दाखवण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभ्यास पूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार ,मीनाक्षी कस्तुरे ,ज्ञानोपासक मंडळ प्रमुख अंबिका पारसेवार ,ज्योती घोडके व पंकज देशमुख यांचे सहकार्य लाभले.