18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeलेख*शांताराम गरुड यांची प्रबोधिनी*

*शांताराम गरुड यांची प्रबोधिनी*

समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा शनिवार ता. ३ सप्टेंबर २०२२ रोजी अकरावा स्मृतिदिन आहे.त्या निमित्ताने बापू,प्रबोधिनी व चळवळ याविषयी….
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )

शांताराम बापूंच्या अकराव्या स्मृतिदिना निमित्ताने…
––——————————————-
समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा शनिवार ता. ३ सप्टेंबर २०२२ रोजी अकरावा स्मृतिदिन आहे १५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने शास्त्रीय समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली.

वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि वडील बंधूंच्या प्रेरणेतून बापू बालवीर म्हणून या आंदोलनात उतरले.त्यांना वक्तृत्वाची जन्मजात देणगी होती. त्याला निरीक्षण व अभ्यासाची जोड देण्याची त्यांची स्वयंशिस्त होती. त्यांच्या बोलण्यात ,लिहिण्यात आणि वागण्यात ती शिस्त अखेरपर्यंत होती. विचारांवर अधिष्ठान ठेवून जे सातत्य त्यांनी जपले तो त्यांचा खरा मोठेपणा होता. बापूंना ‘ प्रबोधकांचे प्रबोधक ‘ म्हणून जी लोकमान्यता मिळाली होती ती त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून मिळालेली होती.

विद्यार्थी दशेत राष्ट्र सेवा दल ,काँग्रेसचा १९४२ चा लढा, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष ,मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष अशी राजकीय वाटचाल वयाच्या पन्नाशीपर्यंत त्यांनी केली. आणीबाणीनंतर अपक्ष पातळीवरील ‘ ‘ समाजवादी प्रबोधिनी’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली. आणीबाणी लादली गेल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ होते.त्यांची मने सैरभैर झाली होती.त्याच बरोबर १९६० नंतरच्या काळात राजकीय पक्षांच्या बांधणीतही कमालीचे दोष दिसू लागले होते. ज्यांच्या सहकार्याने राजकारण करायचे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या योग्य प्रबोधनाचा अभाव होता. त्यामुळे समाजजीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती.ही पोकळी भरून काढावी व जिज्ञासू कार्यकर्त्यांचे ,समाजाचे प्रबोधन करावे या हेतूने हे अपक्षीय ज्ञानपीठ तयार झाले.

राष्ट्र सेवा दला पासून प्रबोधिनीपर्यंतच्या सर्व प्रवासात प्रत्येक टप्प्यावर बापूंनी स्वतःची अशी एक अमिट मुद्रा उमटवलेली आहे. पक्की वैचारिक बैठक असलेल्या बापूंच्या उक्ती आणि कृतीत फरक नव्हता. ” विचार पेरा कृती उगवेल ,कृती पेरा सवय उगवेल, सवय पेरा चारित्र्य उगवेल आणि चारित्र्य पेरा भविष्य उगवेल ” असे एक वचन आहे. बापूंचा जीवनपट या वचनाला सार्थ ठरविणारा आहे.

समाजवादी प्रबोधिनीला येत्या मे महिन्यात ४५ वर्षे पूर्ण होतील. १९८५ पासून मी बापूंचा एक तरुण सहकारी, त्यांच्या प्रमाणेच एक पूर्णवेळ कार्यकर्ता आणि सर्वार्थाने त्यांचा मदतनीस म्हणूनही अखेरपर्यंत त्यांच्या अतिशय निकट होतो. आज बापूंना जाऊन अकरा वर्षे झाल्यानंतरही त्यांच्याबरोबरच्या त्या सव्वीस वर्षांच्या वाटचालीतील क्षण न क्षण माझ्या डोळ्यांसमोर उभा आहे.कारण तो माझ्या अखंड तारुण्याचा कालखंड आहे.प्रबोधिनीच्या उभारणीसाठी, विविध उपक्रमांची आखणी करण्यासाठी बापूनी प्रचंड कष्ट घेतले. धावपळ केली. त्या कष्टांचा मी सहकारी साक्षीदार आहे.अर्थात त्या धावपळीने दमछाक न करता नेहमीच अजून गतीने काम केले पाहिजे हेच सांगितले. मी विद्यार्थिदशेत असताना समाजवादी प्रबोधिनीच्या कामात पूर्णवेळ पूर्णतः झोकून देण्याची इच्छा मनात प्रज्वलित करण्यापासून ते गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळण्याच्या अनेक संधी चालत येऊनही ते तथाकथित स्थैर्य नाकारण्याची क्षमता माझ्यात निर्माण करण्यापर्यंत आणि माझ्यातील लेखक, अभ्यासक, वक्ता, संपादक घडवण्यापासून ते त्यांच्या हयातीतच सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने प्रबोधिनीचे काम पुढे चालवण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यापर्यंतच्या प्रत्येक क्षणाचे शिल्पकार शांतारामबापूच होते.

२००२ साली शांतारामबापूंचा अमृतमहोत्सव झाला. त्या दिवसापासून शांतारामबापूंनी समाजवादी प्रबोधिनीची सर्वप्रकारची संपूर्ण धुरा माझ्यावर सोपविली आणि दैनंदिन कामातून ते पूर्णतः बाजूला झाले.आज याही गोष्टीला वीस वर्षे होत आली आहेत.माझी संस्थेच्या एकूण कामातली सदतीस वर्षे, त्यातील सर्व प्रकारच्या संपूर्ण जबाबदारीची वीस वर्षे आणि बापूंशिवायची अकरा वर्षे हा प्रदीर्घ पट उलगडतांना माझे मलाही अचंबित व्हायला होते.आज बापूंचा अकरावा स्मृतिदिन होत असताना ही वाटचाल अधिक ऊर्मीने करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे यात शंका नाही.

अदम्य जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती ही बापूंच्या कणखर व्यक्तिमत्त्वाचा भाग होती. नाहीतर एरवी क्षयापासून चे हृदय विकारापर्यंतच्या रोगांनी आणि अपचनापासून ते धापेच्या तक्रारी शरीरात तब्बल चाळीस वर्षे ठाण मांडून बसलेल्या असतानाही त्यांचे सातत्यपूर्ण काम स्तिमित करणार होते. बापूंनी वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून प्रचंड प्रबोधन केले .एक वचन आहे की, ” विद्वानाची शाई ही हुतात्म्याच्या रक्ताहून अधिक पवित्र असते “.बापूंनी तर स्वातंत्र्य आंदोलनात हुतात्म्यांच्या रक्ताचे महत्व जाणले होते. कष्टकऱ्यांचे पक्षीय आंदोलन करतानाही त्यांनी त्याचे महत्त्व ओळखले होते. आणि त्यांचे लेखन हे एका विद्वानाचे विचारवंतांचे चिंतनशील लेखन होते.

प्रबोधनाच्या कामाला संस्थात्मक रूप देण्यामागे बापूंची पक्की भुमिका होती.समाज प्रबोधन ही समाजजीवनात सातत्याने व नियमित चालवणे आवश्यक असणारी प्रक्रिया आहे.कोणत्याही प्रक्रियेमागे सैद्धांतिक आधार आणि मार्गदर्शन तसेच नियंत्रणे असल्याशिवाय ती उपयुक्त,फलदायी व यशस्वी ठरत नाही. व्यवहारवादाच्या नावाखाली हे नाकारण्याचा प्रयत्न ही दुसऱ्या बाजूला सुरू असतो. अर्थात, विकासप्रक्रियेतील एक अंतर्विरोध असे समजून त्याचेही निराकरण करावे लागते.हे निराकरण करताना ,प्रबोधनाकरता विषयांची व क्षेत्रांची निवड करताना अग्रक्रमांची निवड जेवढी अचूक केली जाते, तेवढे विकासप्रक्रियेचे काम परिणामकारकपणे पार पडते.हे सूत्र आधारभूत धरूनच समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली.त्यानुसार प्रबोधनाची कार्यपद्धती तयार केली.

समाज प्रबोधनामध्ये लोकजागृती ही परिणामाच्या टप्प्यावरील परिणती मानावी लागेल. कार्यकर्त्यांची सैद्धांतिक भूमिकेशी बांधिलकी आणि जनजीवनाच्या प्रत्यक्ष अवस्थेत ती भूमिका पोहोचविणे व रुजविणे यासाठी निवडावयाची व अवलंबावयाची कार्यपद्धती ठरवणे आणि त्यानुसार प्रत्यक्ष कार्यरत राहणे हा संस्थेच्या कार्याचा मुख्य असावा लागतो, असे मानून अशा कार्यकर्त्यांचे व जिज्ञासुंचे संघटन करण्याला अग्रक्रम देण्यात आले.व्यक्तिगत संपर्क,विचार विनिमय आणि सोयीच्या वेळापत्रकानुसार कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. त्यामध्ये व्यक्तिगत गाठीभेटी, चर्चा यांना गरजेप्रमाणे वाव व प्राधान्यही ठेवण्यात आले.त्याचबरोबर साप्ताहिक ,पाक्षिक अशा नियमित बैठका,प्रचलित प्रश्नांवरील सततची व्याख्याने ,परिसंवाद ,चर्चासत्रे, वार्षिक व्याख्यानमाला ,वाचनालयांची उभारणी असे अनेक उपक्रम संस्थात्मक प्रबोधनाला उपयुक्त ठरतात हे गेल्या ४५ वर्षाच्या समाजवादी प्रबोधिनीच्या वाटचालीतून दिसून आले आहे. त्यामागे बापूंचा द्रष्टेपणा महत्वाचा होता.

प्रबोधनाचे एक प्रभावी व परिणामकारक माध्यम म्हणून प्रबोधिनीने पहिल्यापासूनच पुस्तिका ,पुस्तके ‘ मुद्रण खर्चात व पुनर्मुद्रणाचा मुक्त परवाना ‘ या वैशिष्ट्यांसह प्रकाशित केली. या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून जानेवारी १९९० पासून ” प्रबोधन प्रकाशन ज्योती ” हे मासिक सुरू केले.गेली ३३ वर्षे अतिशय नियमितपणे हे मासिक सुरू आहे. गेल्या ४५ वर्षात समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने अंदाजे सव्वीस हजारांहून अधिक छापील पृष्ठांचे प्रबोधन साहित्य, सकस वैचारिक शिदोरी दिली गेली आहे.महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठानी या नियतकालिकाला ‘ मान्यताप्राप्त नियतकालिक ‘ म्हणून मान्यता दिलेली आहे. या मासिकावर मुंबई विद्यापीठात पीएचडी व एम.फिल. हे प्रबंध सादर होऊन त्यांना पदव्याही जाहीर झाल्या आहेत.गेली वीस वर्षे मी या मासिकाचा ‘ संपादक ‘आहे.या काळात मी साडेतीन हजारांवर छापील पृष्ठांचे ‘संपादकीय ‘ लिहिले आहे.अर्थात पहिल्या अंकापासूनच मी यात सक्रिय आहेच.ही माझ्या अभिमानाची बाब आहे. हे शांतारामबापू यांच्यामुळे आहे याची नम्र जाणीव आज त्यांच्या अकराव्या स्मृतिदिनी आहे.

तत्पूर्वी १९८४ साली ‘प्रबोधन वाचनालय ‘ समाजवादी प्रबोधिनीने स्थापन केले. आज या ग्रंथालयात साहित्याच्या सर्व प्रकारची २९ हजार पुस्तके आहेत. त्यामध्ये समृद्ध असा संदर्भ विभाग आहे.तीन हजारावर पुस्तकांचा स्वतंत्र बाल विभाग आहे. शंभरावर दैनिके – नियतकालिके यांनी समृद्ध असा मोफत वाचन विभागही आहे.याचा लाभ दररोज शेकडो वाचक घेत असतात.याशिवाय इतर अनेक सातत्यपूर्ण उपक्रम सुरू असतातच.

भारताचा प्रदिर्घ स्वातंत्र्यलढा समाजवादी समाजरचनेच्या दिशेने वाटचाल करत होता. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतील सरनाम्यात संपूर्ण स्वातंत्र्य ,लोकांचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि संघराज्यीय एकात्मता या पायाभूत संकल्पनांच्या आधारावर समाजवादी समाजरचनेचा इमला उभारण्याचे आपण आग्रहपूर्वक जाहीर केलेले आहे. भारतीय परिस्थितीचे, विशेषतः या समाजजीवनातील विकसनशील व गतिशील अंगोपांगांचे शास्त्रीय व वास्तव मूल्यमापन करून समाजवादी समाजरचनेच्या दिशेने आपले परिवर्तनाचे प्रयत्न जाणीवपूर्वक चालवणे ,हे ते उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग आहे.यासाठी या पायाभूत संकल्पनांची आणि वैज्ञानिक समाजवादाची जाण असलेले आणि तशी मानसिकता तयार झालेले कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी प्रत्येक क्षेत्रात निर्माण करणे हा प्रबोधिनीचा मुख्य उद्देश आहे. ही बापूंची धारणा होती.त्यांच्याबरोबर पाव शतकांहून अधिक काळ एकत्र काम केल्याने बरेच काही शिकता आले.

प्रबोधकांचे प्रबोधक असलेले बापू वयाच्या ८५ व्या वर्षी शनिवार ता. ३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. अनारोग्याने ग्रासलेले आणि कृश झालेले आपले शरीर कोणत्याही कर्मकांडाविना दहन करावे आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून मीच अग्नी द्यावा ही इच्छा त्यांनी अनेकदा व अनेकांशी व्यक्त केली होती.आपण त्या इच्छेचा सन्मान केला.

गेल्या अकरा वर्षाच्या काळावर नजर टाकली तर हा काळ सैद्धांतिक प्रबोधनाच्या अत्यंत गरजेचा आहे यात शंका नाही.पण त्याचवेळी या काळाने फार मोठी आव्हानेही उभी केली आहेत.भारतीय दर्शन परंपरा,भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यलढ्याचा आशय ,राज्यघटनेचे तत्वज्ञान या सगळ्यांवरच अत्यंत वेगाने व तीव्रतेने हल्ले होत आहेत. हे हल्ले करणारे दिवसेंदिवस अधिक संघटित होत आहेत, येन केन प्रकारेण सत्ता मिळवत आहेत, स्थिर व शिरजोर होत आहेत. दुसरीकडे त्यांच्या प्रतिगामीत्वाला विरोध करणारे व स्वतःला पुरोगामी मानणारे आपसातच लढत आहेत.आम्ही सारे एक आहोत म्हणणारेच जेंव्हा व्यक्तिवादाने किंवा व्यक्तिद्वेषाने पछाडलेले असतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या संस्थेवर, संघटनेवर होत नसतो तर संपूर्ण पुरोगामी चळवळीवर होत असतो.समाजाचा विश्वास गमावला जात असतो. याचे भान ठेवणे ही काळाची गरज आहे.

प्रबोधन,परिवर्तन संथपणे पण मूव्हमेंटनेच होत असते.इव्हेंटने नव्हे याचे भान आपण सर्वांनी ठेवले नाही तर खरंच येणारा काळ खरंच माफ करणार नाही. पक्के वैचारिक अधिष्ठान असलेली आकाशाच्या उंचीची माणसे आता कमी होत आहेत.आणि खुज्यांची चलती आहे. हे वेळेस थांबले नाही तर केवळ पूर्वजांच्या जयंत्या आणि मयंत्या साजऱ्या करत राहण्याची आणि दुसरीकडे विचार कमजोर होऊन झालेला पाहण्याची अधिक भयावह वेळ येऊ शकते. पुरोगामी चळवळीने भारतीय संविधानाचे तत्वज्ञान हा विषय प्रबोधनाचा म्हणून अग्रक्रमाने घेतला पाहिजे हे ४५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम ओळखणारे व ते समाजवादी प्रबोधिनीच्या माध्यमातून कृतीत आणणारे शांतारामबापूच होते.आणि दीड दशकांपूर्वी अण्णा हजारे यांचा उदय झालेले व राजकीय पक्षांना नावे ठेवत सुरू केलेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे तद्दन राजकीय आंदोलन आहे, ते अशास्त्रीय आहे, तुमचा अंतस्थ हेतू शुद्ध नाही हे शांतारामबापूंनी त्यावेळी खुद्द अण्णा हजारे यांना सुनावले होते.मी त्याचा साक्षीदार आहे.अण्णांची जाग आणि झोप सोयीनुसार असते हे गेल्या अनेक वर्षात दिसून आले.त्यांची सोयीनुसार भाषा कोणत्या गांधीवादात व नीतिमत्तेत बसते हे त्यांनी सांगितले नाही तरी आपण ओळखले पाहिजे.पुरोगामी ,प्रबोधनाच्या चळवळीतील प्रत्येकाने खऱ्या अर्थाने कृतिशील पद्धतीने विवेकनिष्ठ,विचारनिष्ठ झालेच पाहिजे हा शांतारामबापूंचा आग्रह त्यांच्या अकराव्या स्मृतिदिनी तीव्रतेने पुन्हा पुन्हा ध्यानात घेतला पाहिजे व कृतीत आणला पाहिजे ही काळाची मागणी आहे.शांतारामबापूंच्या निधनानंतर प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण दशकभराची वाटचाल केली.यावर्षी एन.डी.सरही गेले.समाजवादी प्रबोधिनीच्या संस्थापकांतील अखेरचा शिलेदार आपण गमावला आहे.अशावेळी आपले संस्थात्मक लोकप्रबोधनाचे काम आपण सर्वार्थाने विकसित करण्यासाठी आपल्या सर्वांगिण भागीदारीसह कटिबद्ध राहणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

प्रसाद कुलकर्णी

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली तेहत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

////////////////////////////////////////////////////////

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]