महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्य संमेलनात 14 फेब्रुवारीला परिसंवाद, महाराष्ट्राचे हास्यवीर आणि ‘वऱ्हाड निघालय लंडनला’
• नाट्यगीत महोत्सव आणि नाट्यवाचन महोत्सवाचेही आयोजन
• ‘साखरेचे पाच दाणे’ प्रायोगिक नाटक होणार सादर
• सर्व कार्यक्रमांना खुला प्रवेश; पासेसची आवश्यकता नाही
लातूर, दि. 13 ( वृत्तसेवा ): राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि लातूर जिल्हा प्रश्सानाच्यावतीने आयोजित ‘महासंस्कृती महोत्सव’ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने आयोजित विभागीय 100 वे विभागीय नाट्य संमेलनात आज, 14 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर जिल्ह्यातील रसिकांसाठी परिसंवाद, महाराष्ट्राचे हास्यवीर आणि ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या व्यावसायिक नाटकासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दयानंद महाविद्यालय मैदान येथील नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगपिठावर 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ‘नाटक माझ्या चष्म्यातून’ हा परिसंवाद होईल. यामध्ये आमदार अमित देशमुख, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पत्रकार विलास बडे यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी करणार आहे. तसेच दुपारी 1 वाजता ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ हे विनोदी नाटक सादर होईल. सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक हे नाटक सादर करणार आहेत. सायंकाळी 6 वाजता याच ठिकाणी शाहीर तुकाराम सुवर्णकार व संच शिवगीते व पोवाडा सादर करेल. सायंकाळी 7 वाजता हास्यजत्रामधील कलाकारांचा सहभाग असलेला ‘महाराष्ट्राचे हास्यवीर’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.

दयानंद सभागृह येथे 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नाट्यगीत महोत्सव आणि दुपारी 2 वाजता नाट्यवाचन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच दगडोजीराव देशमुख सभागृह येथे रात्री 8 वाजता ‘साखरेचे पाच दाणे’ हे प्रायोगिक नाटक सादर होणार आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांना मोफत पाहता येणार असून यासाठी कोणत्याही प्रवेशिकेची आवश्यकता नाही. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या लातूर शाखेने केले आहे.
