विनम्र अभिवादन

0
313

. ||प्रधान मास्तर आणि यशवंतराव चव्हाण||
यशवंतराव कॉग्रेस (इंदिरा) मध्ये परत का गेले?. याबाबत ग. प्र. प्रधान मास्तरांनी सांगितलेली आठवण
. यशवंतराव चव्हाण यांनी 1980 मध्ये इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर, काही दिवसांनी ते मुंबईस आले असताना मी त्यांना भेटलो. त्या वेळी मी म्हणालो, ‘आपण इंदिरा काँग्रेसमध्ये कोणत्याही अपेक्षेने गेला नाहीत ही माझी खात्री आहे. परंतु श्रीमती इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर करावयास नको होती असे आपले मत असताना आपण पुन्हा त्यांच्या पक्षात का गेलात?’

यशवंतराव हसले व म्हणाले, ‘तुम्ही माझ्या हेतूबद्दल शंका घेणार नाही ही मला खात्री आहे. थोडे स्पष्टच सांगतो. इंदिरा काँग्रेस हाच राष्ट्रीय जीवनाचा मुख्य प्रवाह आहे. या प्रवाहापासून बहुजन समाजाने दूर राहू नये हे सांगणे व सांगण्याआधी स्वत: तसे करणे हे माझे कर्तव्य होते. बहुजन समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून मी हे केले. माझ्या वैयक्तिक मानापानापेक्षा मला बहुजन समाजाचे हित महत्त्वाचे वाटते.’ यावर मी म्हणालो, ‘सत्ता म्हणजे राष्ट्रीय जीवनाचा मुख्य प्रवाह असे आपण मानता का?’

यावर यशवंतराव म्हणाले, ‘हो. समाजाची सुधारणा, समाजात बदल करण्याचे प्रमुख साधन सत्ता हेच आहे. बहुजन समाजाची अद्याप खूप सुधाराणा व्हायची आहे. यासाठी हे साधन बहुजन समाजाने प्रभावीपणे वापरले पाहिजे. त्या साधनावर बळकट पकड ठेवली पाहिजे.

यावर मी विचारले, ‘मग एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, श्री. अ. डांगे हे जन्मभर विरोधी पक्षात राहिले. माझ्यासारखे अनेक जण त्यांच्या मागोमाग वाटचाल करीत राहिले हे चुकले काय?’

यशवंतराव म्हणाले ‘हे तुम्हीच अंतर्मुख होऊन तपासले पाहिजे; परंतु विरोधी पक्षातील कामाला मी कमी लेखत नाही. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणे हे लोकशाहीत आवश्यक आहे.’

यावर ‌थोडा रागवून मी म्हणालो, ‘आपले म्हणणे असे की, बहुजन समाजाने सत्तेवर पकड ठेवावी आणि आम्ही विरोधी पक्षातच राहावे? मला हे मान्य नाही.’

यशवंतराव म्हणाले, ‘मी असे का म्हणालो ते समजून घ्या. पांढरपेशा समाजाला 19 व्या शतकापासून शिकायला मिळाले. त्यामुळे त्या समाजातील माणसांना एक शक्ती मिळाली आहे. त्यांना सत्तेचा पाठिंबा नसला तरी ते आपला विकास करून घेऊ शकतात. पांढरपेशा समाजाच्या संस्था व पांढरपेशा समाजातील तरुणांचे कर्तृत्व हे एस. एम. अगर ना. ग. गोरे यांच्या पाठिंब्यावर अवलंबून नाही. बहुजन समाजाचे तसे नाही. आमच्या संस्था व आमची तरुण पिढी यांना आधाराची जरूर आहे. अनेक वर्षे ज्ञानापासून वंचित राहिलेल्या शेतकरी समाजीच अद्याप सुधारणा व्हायची आहे. सत्तेचा आधार दिला तर आमच्या संस्था उत्तम काम करतील व आमच्या मुलांचे कर्तृत्व वाढेल. अद्याप निदान 50 वर्षे तरी सत्तेच्या साहाय्यानेच प्रगतीला खरी गती येईल. कर्मवीर अण्णांचा अपवाद वगळता, अन्य कोणी केवळ स्वसामर्थ्यावर संस्था उभारू शकला नाही. मी बहुजन समाजाचे सामर्थ्य काय आहे ते जाणतो, पण बहुजन समाजच्या कर्तृत्वाला सत्तेची जोड आणखी काही वर्षे मिळालीच पाहिजे, हेही मी जाणतो आणि ते बहुजन समाजाला स्पष्टपणे सांगणे हे मी माझे कर्तव्य मानतो. प्रत्येक समाजाची काही ऐतिहासिक गरज असते. ती ओळखून मी वागतो. मग ते कोणाला पटो वा न पटो.’
(महाराष्ट्र राज्य साहित्य- संस्कृती मंडळाने 1988 मध्ये प्रकाशित केलेल्या, सरोजिनी बाबर यांनी संपादित केलेल्या ‘मी पाहिलेले यशवंतराव’ या पुस्तकातून)
============================
आज ग प प्रधान मास्तरांची जयंती
विनम्र अभिवादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here