शुद्ध विज्ञानाच्या पुरस्काराकडे दुर्लक्ष नको !
समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रातील मत
इचलकरंजी : प्रतिनिधी
गेली दोन तीन वर्षे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मोठी चर्चा देशभरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर ) स्थापनादिनी दरवर्षी जाहीर केले जाणारे भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार म्हणून ख्याती असलेले आणि तरुण भारतीय शास्त्रज्ञाने देशातच राहून काम करावे यासाठी प्रोत्साहन देणारे डॉ.शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार गेली दोन वर्षे जाहीर करण्यात आलेले नाहीत ही गोष्ट भूषणावह नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी हे पुरस्कार अधिक तर्कसंगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत या केलेल्या विधानाचा नेमका अर्थ काय ? स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षात ज्या वैज्ञानिकांना हे पुरस्कार मिळाले त्यांनी देशाच्या वैज्ञानिक क्रांतीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. नुकतेच चंद्राच्या कक्षात गेलेले चांद्रयान हेही त्याचे द्योतक आहे. शुद्ध विज्ञानाकडे , आणि त्याच्या पुरस्काराकडे दुर्लक्ष केले गेले तर आपण पुन्हा अज्ञानाच्या अंधकारात ढकलले जाण्याची शक्यता आहे , असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात ‘ विज्ञान शासन आणि समाज ‘या विषयावर व्यक्त करण्यात आले.
यावेळी डी.एस. डोणे यांचा रणनीती न्युज चॅनेलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त,रामभाऊ ठीकणे यांना प्रेस मीडियाचा दर्पणकार पुरस्कार मिळाल्याबद्दल ,तसेच मनोहर जोशी यांना
साधना बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ज्येष्ठ नागरिक वृत्तपत्र सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा अशोक केसरकर यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, तुकाराम अपराध, दयानंद लिपारे,शकील मुल्ला, बी.जी. देशमुख,अशोक मगदूम, गजानन पाटील आदींनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रात असेही मत व्यक्त करण्यात आले की, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा पुसट असतात. भारतीय राज्यघटनेने वैज्ञानिक दृष्टिकोन हे कर्तव्यामध्ये सांगितलेले आहे.विज्ञानाचा शब्दशः स्फोट म्हणता येईल अशा युगात आपण आज वावरत आहोत.अगदी पाच,दहा वर्षांपूर्वी आश्चर्यजनक वाटणाऱ्या बाबी आज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत.मात्र अशावेळीच एकीकडे विज्ञानाने दिलेल्या सर्व सुविधांचा वापर करायचा आणि दुसरीकडे समाजाला अज्ञानाच्या खाईत लोटण्याचे पद्धतशीर प्रयत्न होण्याचे प्रमाण वाढताना दिसते आहे.मग कोण गणेशजन्मावेळी प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात होती म्हणतात,कोण गटारीतून गॅस पाईपने काढून पकोडे तळल्याचे किंवा चहा केल्याचे सांगतात.कोण मुलगा व मुलगी कधी व कशी होईल हे सांगतात तर कोणाच्या बागेतील आंबा पुत्रप्राप्ती देणारा असतो.अशी शेकडो उदाहरणे वारंवार पाहायला,ऐकायला मिळणे हे राष्ट्र म्हणून ,उद्याची महाशक्ती म्हणून लाजिरवाणे आहे. देश म्हणून आपण व्यापक अशी वैज्ञानिक दृष्टी स्वीकारली पाहिजे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी गणित, वैद्यकशास्त्र ,रसायनशास्त्र ,पृथ्वी विज्ञान आधी विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल डॉ.शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार दिले जातात. ते पुरस्कार सलग दोन वर्षे जाहीर न होणे हे योग्य नाही. अवैज्ञानिकतेचे चाललेले वाढते प्रकार हे आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या वैचारिक अभावाचे लक्षण आहे. म्हणूनच विवेकवाद स्वीकारला पाहिजे. विवेकवाद ही विज्ञान शाखेतील एक विचारधारा आहे .सर्वोच्च मानवी ज्ञान केवळ विवेक किंवा बुद्धी पासूनच मिळू शकते असे विवेकवाद मानतो. ज्ञान निश्चित आणि संशयातीत असले पाहिजे ही विवेकवादाची भूमिका आहे .एखाद्या बाबीचे आपल्याला ज्ञान असणे आणि त्या बाबतची आपली समजूत असणे यात मोठा फरक असतो. विवेकाधिष्ठित ज्ञान हे निश्चितपणे सत्य असल्यामुळे स्थिर व शाश्वत असते .