इस्कॉन मंदिरातील नयनरम्य श्रीराम जन्मोत्सवात भाविक भक्तीरसात दंग
लातूर ; ( प्रतिनिधी ) -मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव लातूर मधील इस्कॉन नव जगन्नाथपूरी मंदिरामध्ये भक्ती भावाने व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी हजारो भाविकांनी या नयनरम्य सोहळ्यात सहभागी होत आनंदोत्सव साजरा केला.
लातूरातील औसा रोड रिंग रोड स्थित असलेले इस्कॉन NJPT मंदिर मध्ये सतत धार्मिक उत्सव साजरे केले जातात. श्रीकृष्ण जन्मोत्सव व श्रीराम जन्मोत्सव या दोन उत्सवाला इस्कॉन मध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते. यामध्ये लातूरकर मोठ्या भक्ती भावाने सहभागी होत असतात . श्री प्रभुपाद लोक नगर मधील जगन्नाथ पुरीच्या श्री जगन्नाथ भगवनाचे भव्य डौलदार मंदिर उभारण्याचे काम लातूरच्या इस्कॉन एनजीपीटी संस्थेने सुरू केले असून एकेवीस हजार स्क्वेअर फुट पेक्षा जास्त क्षेत्रावर बांधकाम चालू असलेल्या आणि वीस कोटी रुपयाहून अधिक बजेट असलेल्या या प्रकल्पाचे नेतृत्व सुंदर कृष्ण प्रभुजी करत आहेत. या मंदिराचे उभारणीचे काम लोकाश्रयातून चालत आहे .
या मंदिरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुंदर कृष्ण प्रभुजी यांची रामकथा चालू आहे. आपल्या अमोघ वाणीने ते रामकथा सांगून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध करीत आहेत .श्री राम जन्मोत्सवानिमित्त शेवटच्या दिवशी त्यांनी भगवान श्रीरामाची जन्मकथा सांगून हजारो भाविक भक्तांना भक्ती रसामध्ये तल्लीन केले. 'हरे कृष्ण हरे राम..' च्या जयघोषात तसेच राम रामाचा जयघोष करीत हजारो भाविकांनी राम जन्मोत्सव साजरा केला .यावेळी विविध यजमान व प्रभुजींच्या हस्ते श्री च्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला .सायंकाळी रामलीला, नाटिका सादर करण्यात आली .
हा रामनवमीचा पवित्र व देखणा उत्सव यशस्वी करण्यासाठी सुंदर कृष्ण प्रभुजी यांच्या नेतृत्वाखाली लेखक व विधिज्ञ योगानंद कुलकर्णी पाटील , नरहरी सरकार दास , सुदामा साखा दास , भावानंदराय दास , माऊली, शांतीपूर आचार्य दास आदीनी परिश्रम घेतले. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसाद व चरणाम्तचा लाभ घेतला.