रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचा सकारात्मक प्रतिसाद
लातूर/प्रतिनिधी:लातूर-पुणे, कोल्हापूर-जालना,परळी-मुंबई या गाड्या सुरू कराव्यात यासह अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची ५० टक्क्यांची सवलत पूर्ववत करावी,अशी मागणी मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र,मध्यप्रदेश, कर्नाटक झोनल रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी केली आहे.या संदर्भात त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना निवेदन दिले असून या मागण्यांना दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
रेल्वे राज्यमंत्री दानवे पाटील नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.निजाम शेख यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.यावेळी खा.सुधाकर शृंगारे,आ.संभाजीराव पाटील,माजी आमदार पाशा पटेल,गोविंद केंद्रे,गुरुनाथ मगे,दत्ता सुरवसे यांच्यासह रेल्वे अधिकारी उपस्थित होते. नांदेड-पुणे ही जालना व छत्रपती संभाजीनगर मार्गे जाणारी गाडी पुणे येथे १६ तासांपेक्षा अधिक थांबलेली असते.उन्हाळी हंगामातील गर्दी कमी करण्यासाठी लातूर-पुणे इंटरसिटी म्हणून ही गाडी सोडावी.लातूरसह धाराशिव,बीड, परळी,नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांचा यामुळे फायदा होणार आहे.
पंढरपूर,कुर्डूवाडी,लातूर मार्गे कोल्हापूर-जालना ही साप्ताहिक गाडी सुरू करावी अशी मागणी शेख यांनी केली आहे.कोल्हापूर येथे गाडी क्रमांक ११०४५-४६ दोन दिवस थांबलेली असते.ती गाडी या मार्गे चालवता येऊ शकते.कोल्हापूर येथील महालक्ष्मी तसेच पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांना ही गाडी उपयोगी ठरेल.मुंबई – बिदर ही गाडी आठवड्यातून एक दिवस धावते.मुंबईत ही गाडी ३६ तास थांबलेली असते.या गाडीचा तिरुपती पर्यंत विस्तार करावा. पुणे,लातूर.खानापूर,हुमनाबाद, गुलबर्गा,वाडी,गुलकंद या मार्गे ही गाडी चालवल्यास भाविकांचा लाभ होणार आहे.लातूर जिल्ह्यातून जवळपास २ हजार प्रवासी खाजगी वाहनांनी जीव धोक्यात घालून तिरुपती येथे दर्शनाला जातात.ही गाडी सुरू झाली तर भाविकांची मोठी सोय होणार आहे. लातूर,कुर्डूवाडी, पुणे या मार्गे परळी-मुंबई ही गाडी सुरू केली तर मुंबईस जाणाऱ्या प्रवाशांना लाभ होणार आहे.उन्हाळ्याचा विचार करता लातूर-मुंबई उन्हाळी सुट्टी स्पेशल गाडी सुरू करावी,अशी मागणीही निजाम शेख यांनी केली आहे.यातून रेल्वेचाही आर्थिक लाभ होणार आहे.
हरंगुळ येथे रेल्वे कोच कारखाना आहे.याच परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र आहे.यामुळे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेता हरंगुळ येथे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा असणे आवश्यक आहे.या संदर्भात अधिकाऱ्यांनी खा. सुधाकरराव शृंगारे यांना विनंती केलेली आहे.आपण या मागणीचा सकारात्मक विचार करावा,अशी मागणी निजाम शेख यांनी निवेदनात केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी,मध्य रेल्वेचे महाप्रबंधक आणि लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन सादर करण्यात आले आहे.