जिल्ह्याच्या पुढील पाच वर्षाच्या विकासासाठी तयार होणार आराखडा; तज्ञ व्यक्तींच्या घेतल्या सूचना
लातूर दि. ६ – कृषि,उद्योग,शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील तज्ञ, अनुभवी व्यक्ती यांच्या सूचना लक्षात घेवून जिल्ह्याचा पुढचा पाच वर्षाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवार ६ मे रोजी सकाळी ११ ते ४.३० पर्यंत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचे म्हणणे ऐकून आणि नोंद करून घेतले .
यावेळी त्या त्या विभागाचे प्रमुख , जिल्ह्यातील आणि शहरातील विषय तज्ञ उपस्थित होते.
यावेळी अनेक महत्वाच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या.त्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असलेल्या जिल्ह्यात सोयाबीनचे हब व्हावे,ज्यात अनेक उप पदार्थ निर्माण करणारे उद्योग तसेच सोयाबीन बियाणे मोठ्या प्रमाणात तयार व्हावेत. शेतकऱ्यांच्या गटाला असे बियाणे तयार करण्याचे प्रशिक्षण, ते प्रमाणित करण्याची शासकीय सुविधा उपलब्ध व्हावी. कृषिमाल निर्यात सुविधा उभ्या कराव्यात ज्यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. जिल्ह्यात चंदन ,अश्वगंधा या सुगंध निर्माण करणाऱ्या वनस्पती लावल्या जात आहेत , त्यांना प्रशिक्षण मिळाले तर याचे क्षेत्र वाढून शेती फायद्याची होऊ शकते. लातूर जिल्हा डाळ वर्गीय पिक घेण्यात पण आघाडीवर आहे. पण त्याची प्रक्रिया करणारे गृह उद्योग निर्माण व्हावेत त्यातून अनेकांना नैसर्गिक डाळी हव्या असतात, त्यांना त्या मिळतील. त्यासाठी द्विदल धान्य दिवस असे काही औचित्य ठेवून लातूर मध्ये डाळ महोत्सव ठेवावा.
जिल्ह्याचा आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी पर्यटन हा महत्वाचा घटक ठरू शकतो. त्यात औसा, उदगीर किल्ला ,खरोसा,हत्ती बेट लेण्या तसेच संजीवनी बेट हे अधिक विकसित करून पर्यटकांना आकर्षित करता येऊ शकते. शिक्षण हब आहेच ,त्याला रचनाबद्द पद्दतीने वाढविता येऊ शकते. ह्या आणि अशा अनेक विषयावर तज्ञ लोकांनी सूचना दिल्या. या सर्व सूचना एकत्र करून त्याचा सर्वंकष प्रारूप आराखडा जिल्हा नियोजन विभागाकडून करण्यात येणार असल्याचे पृथ्वीराज बी .पी यांनी यावेळी सांगितले.