लातूर : लातूर आयएमएच्या वतीने रविवारी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या विश्व सुपर मार्केट आयएमए हाफ मॅराथॉन स्पर्धेचे विजेतेपद रितेश धोत्रे नामक युवकाने पटकावले. रितेशने २१ किलोमीटर्सचे अंतर अवघ्या १ तास १६ मिनिटे ४८ सेकंदात पार केले. या हाफ मॅराथॉन स्पर्धेत ३ वर्षांपासून ते ८८ वर्ष वयोगटातील तब्बल १३०० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. विजेत्यांना लातूरचे माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी साडेपाच वाजता पार पडले. यावेळी आ. संजय बनसोडे, आ. अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, औरंगाबाद विभागाचे सेल्स टॅक्स कमिशनर तथा लातूरचे माजी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, अजितसिंह पाटील कव्हेकर, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे , लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकुंद भिसे, लातूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, डॉ. रमेश भराटे, गुरुनाथ मगे , प्रा. शिवराज मोटेगावकर, उद्योजक तुकाराम पाटील, उद्योजक धर्मवीर भारती, डॉ. अजय जाधव, डॉ. सुधीर फत्तेपूरकर, डॉ. चांद पटेल, डॉ. ब्रिज झंवर, डॉ. आरती झंवर, डॉ. वैशाली टेकाळे, डॉ. कांचन जाधव, डॉ. शुभांगी राऊत, डॉ श्वेता काटकर व डॉ. विमल डोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी पावणे सहा वाजता २१ किमी अंतरासाठीची स्पर्धा सुरु झाली. त्यानंतर प्रत्येक १५ मिनिटांच्या अंतराने इतर गटांची स्पर्धा सुरु करण्यात आली. ३ किमी, ५ किमी, १० किमी व २१ किमी अशा गटात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत सहभागीझालेल्याधावपटूंना आंतराराष्ट्रीय मापदंडानुसार इलेक्ट्रॉनिक टाईमिंग चिप्स असलेले बिब उपलब्ध देण्यात आले होते.

या स्पर्धेचे प्रायोजक भारती आणि गित्ते ग्रुप, लातूर ऑफिसर्स क्लब, सनरीच ऍक्वा ,कीर्ती गोल्ड, प्रा. मोटेगावकर यांचे आरसीसी क्लासेस हे होते. स्पर्धेच्या मार्गावर शहरातील ग्लोबल नॉलेज, झी लिटेरा , संत तुकाराम यासारख्या विविध शाळांनी स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी ठिकठिकाणी ढोलपथके तैनात करून ठेवली होती. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित होण्यास मोलाची मदत झाली. त्याचप्रमाणे संयोजकांच्या वतीने प्रत्येक किलोमीटरवर स्पर्धकांसाठी लिमलेटच्या गोळ्या, पाणी, केळी , बिस्किट्स, फळे उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच चार अँब्युलन्स व खाजगी रुग्णालयातील २० बेड्सही सुरक्षिततेचा उपाय म्हणून आरक्षित करून ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे हे २१ किमी. अंतर धावले. माजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. ,विक्रांत गोजमगुंडे व अजितसिंह पाटील कव्हेकर हे प्रत्येकी १० किमी. अंतर धावले. ३ वर्ष ते ८८ वर्ष वयोगटात पार पडलेल्या या स्पर्धेत ८८ वर्ष वयोगटात लातूर पॅटर्नचे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला हे विशेष.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी बोलताना माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख यांनी लातूर आयएमएच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आयएमएथॉन २०२३ ही संकल्पना सगळ्यांच्या सहकार्याने साकारण्यात आल्याचे सांगून ही स्पर्धा अक्षरशः दृष्ट लागण्याजोगी झाल्याचे सांगितले. या स्पर्धेच्या माध्यमातून लातूरचा नावलौकिक वाढण्यास मोलाची मदत होणार आहे. या स्पर्धेत केवळ लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील स्पर्धकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत, ही बाब निश्चितच आयोजकांचा उत्साह द्विगुणित करणारी आहे. प्रत्येकाचे स्वास्थ सुदृढ राहण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांची नितांत आवश्यकता आहे. आपण सर्वजण इथे लातूरकर म्हणून एकत्रित आलो आहोत. ऑफिसर्स क्लब लातूरचे माजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून साकारला . श्रीकांत यांची हीच संकल्पना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. नेटाने पुढे नेट आहेत, ही बाबही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. या स्पर्धेत लहानांपासून वृध्दांचाही सहभाग दिसून आल्याबद्दल आ. देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या प्रायोजकांचे कौतुक करून देशमुख यांनी चांगल्या कामासाठी लातूरकर नेहमी मदतीसाठी तत्पर असतात, असे सांगितले. या स्पर्धेचे विजेतेपद २१ किमी अंतर अवघ्या १ तास १६ मिनिट १६ सेकंदात पूर्ण करून रितेश धोत्रे याने पटकावले. महिला गटात ज्योती शंकरराव गवते यांनी १ तास ३० मिनिटे २८ सेकंदात हे अंतर पार केले.

या स्पर्धेत द्वितीय स्थान गणेश शिवाजी सुरवसे ( १ तास १९ मिनिट ०८ सेकंद ), तृतीय वैभव राम कांबळे ( १ तास २२ मिनिट ५२ सेकंद ) यांनी मिळवले. महिला गटात द्वितीय स्थान अश्विनी मदन जाधव ( १ तास ३० मिनिट ३१ सेकंद ), तृतीय आंचल ( २ तास ०९ मिनिट ३४ सेकंद ) यांनी मिळवले. १० किमी गटात शुभम भोसले यांनी ३६ मिनिटे ५५ सेकंदात हे अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक मल्हारी सावते ( ३७ मिनिट ०६ सेकंड ), तृतीय शेख समीर मुख्तार ( ४२ मिनिटे ). महिला गटात निकिता विठ्ठल मात्रे हिने ४५ मिनिटे १९ सेकंदात हे अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय ममता जाखोटिया ( १ तास ०१ मिनिट ४६ सेकंद ), तृतीय सोनाली गुडले ( १ तास २ मिनिट ५७ सेकंद ).
आयएमएच्या मॅरेथॉन स्पर्धेत महापौर गोजमगुंडे यांचा सहभाग

लातूर/प्रतिनिधी:इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सपत्निक सहभाग नोंदवला.पत्नी सौ.वर्षा यांच्या समवेत त्यांनी १० किलोमीटरची ही मॅरेथॉन पूर्ण केली. रविवार दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.शहरातील नागरिक,डॉक्टर्स,तरूण- तरुणी आणि विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.नियोजित रस्त्यावरून ही मॅरेथॉन पूर्ण झाली. गुलाबी थंडीत समस्त लातुरकरांसमवेत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सपत्निक यात सहभाग नोंदवला.पत्नी सौ.वर्षा याही मॅरेथॉन मध्ये सहभागी झाल्या होत्या.दोघांचाही सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य Aठरले.विक्रांत गोजमगुंडे यांचा सहभाग नागरिकांसाठी उत्साहवर्धक ठरला.

श्रीकांत आणि विक्रांत यांनी धरला ठेका .…
या मॅरेथॉन स्पर्धेत लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारे आणि आता विक्रीकर उपायुक्त असणारे जी. श्रीकांत यांनीही सहभाग नोंदवला.मॅरेथॉन नंतर आयोजकांच्या वतीने झालेल्या नृत्याच्या कार्यक्रमात जी.श्रीकांत यांनी विक्रांत गोजमगुंडे यांच्या समवेत सहभाग घेतला.लोकप्रिय गाण्यांवर या दोघांनीही ठेका धरला.लातुरकरांच्या मनात वेगळी छाप पाडणाऱ्या या जोडगोळीने धरलेला ठेका लातुरकर नागरिकांनी चांगलाच एंजॉय केला.नागरिकांसह तरुणांनी यावेळी जल्लोष केला.