राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्याकडून
ओबीसी समाज बांधवाचा अवमान
शिक्षा मान्य करण्याऐवजी आंदोलनाचे नाटक भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड
लातूर दि.२४ – राहूल गांधी आणि कॉग्रेस नेत्याकडून ओबीसी समाजाला अपमानीत केल्याने राज्यात सर्वत्र भाजपाच्या वतीने आंदोलने करण्यात येत असून न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड आश्चर्य व्यक्त केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ”मोदी ” या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाज बांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे.
सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते, असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते. मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी नमूद केले आहे.