मुंबई: ; दि.२१ ( प्रतिनिधी) –राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे विभाग आणि समित्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भंग केल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल पटेल यांच्या सहीचे अडीच ओळींचे पत्र सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. शिवसेनेतील फूट, शिंदे गटाचा पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न व त्याला मिळत असलेली केंद्र सरकारची साथ हे सर्व लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला गेला असण्याची शक्यतेची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे.
खरी शिवसेना कोणती, शिवसेना विधीमंडळ पक्षातील दोन तृतीयांश फूट व त्यानंतर त्यांना वेगळा गट म्हणून विधिमंडळात तसेच संसदेत मिळालेली मान्यता यामुळे सगळ्याच पक्षांच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुसरीकडे याबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सावधगिरी म्हणून हा निर्णय घेतला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
घटनेनुसार केवळ आमदार वा खासदारांमधील फूट ही फूट म्हणून ग्राह्य धरता येत नाही. त्याकरिता पक्षातही उभी फूट पडणे गरजेचे असते. पक्षातील सर्व समित्या व विभागांचे प्रमुखही दोन तृतीयांश फुटणे गरजेचे असते. पक्षातील विभाग व समित्या या तात्पुरत्या भंग केल्या असतील, तर त्याच्या पदाधिकाऱ्यांचे पद आपोआपच रद्दबातल होत असल्याने हा धोका टाळला जाऊ शकतो. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे किंवा कसे हे नजीकच्या काळात उघड झाले नाही, तरी स्पष्ट होईल, असे पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळातील एका मोठ्या नेत्याने सांगितले.