29 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeलेख*येळवस…वेळ आमावस्या..*

*येळवस…वेळ आमावस्या..*


………………..

जगाला हेवा वाटावा असा लातूरचा सण…….!!

मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद यांचा भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक बाज सारखा असल्याच्या अनेक खुणा जागोजागी दिसतात. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक श्रीमंती जपणाऱ्या या जिल्ह्यात येणाऱ्या 23 डिसेंबर रोजी जी येळवस, वेळामावस्या, दर्श वेळा अमावस्या असते. ही येळवस म्हणजे राज्याच्या कोणत्याच भागात होत नाही, पण इथे मात्र या सणाची परंपरा शेकडो वर्षापासून पाळली जाते आहे. कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्ष जुना सण म्हणजे येळवस ….. हा सन हिरवाईचा अपूर्व सोहळा…..

23 डिसेंबर रोजी अख्खा लातूर, उस्मानाबाद जिल्हा शेतात असतो. काही दिवसापासून याची घराघरात जय्यत तयारी सुरु असते.तुरीच्या शेंगा, चवळी,भुइमूग हा सगळा रानमेवा…. हरभरे पिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यात शिजवलेली ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी…… चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेलं हे पेय जे तांब्यावर तांबे रिचवले तरी प्यायची इच्छा होते ते अंबिल ( काही जणांचे तोंडंही सुजतात दुस-या दिवशी जादाचा डोस झाल्यामुळे ). भल्या थोरल्या भाकरी…… गव्हाची खीर एका शेतात २० ते २५ लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजत गाजत घरातून डोक्यावरुन शेतावर निघतो. शेतात झोके बांधुन सज्ज असतात भज्जीवर ताव मारलेला जिरविण्यासाठी….!! विशेष म्हणजे हा दिवस जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक सुट्टी दिली जाते. अशा या आगळ्या वेगळ्या आणि जिल्ह्याची वेगळी ओळख करून देणाऱ्या या सांस्कृतिक वैभवाची ओळख व्हावी म्हणून हा लेख प्रपंच…!!

काय आहे परंपरा …….!!
भारतीय व्दिपकल्पात सिंधु संस्कृती पासून नदीचे जल पुजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा ,यमुना , गोदावरी , सरस्वती ,नर्मदा ,सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या ( सप्त सिंधु ) भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंदु मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरु झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्त सिंधुचे प्रतिक म्हणून पुजल्या जावू लागले. विहरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे तीला मराठवाड्यात आसरा म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तुच आमची राखण करणारी सहारा देणारी ,पाणी पाजणारी. याच आसराची पुजा वेळा आमवस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात मस्त ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्याची कोप करुन भक्ती भावाने केली जाते.आणखी एक प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यात शुभदिवशी स्नान करून त्यानंतर शेतकऱ्याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे. शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध, फुले,धूप, नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे. असाही एक रिवाज चालत आलेला आहे. ह्या सर्व विधी आटोपून सकाळी पुजाकरुन आणि हा सगळा सुग्रास भोजनाचा भोज चढवून मोठी पंगत बसते….. जेवण करताना आपण किती खातोय याचे भान राहत नाही.

प्रत्येकाच्या कोपीला जावून भज्जीचा अस्वाद घेण्याचा आग्रह होतो. तो टाळता येत नाही. पोटाला तडन लागते. जेवणाच्या पात्रावरुन उठून झोक्यावर जावून झोका खेळायचे खालेले जिरवण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढे ….१२ बलुतेदार ,आठरा आलुतेदार यांनाही आग्रहाने हा रानमेवा खावू घातला जायचा. संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करुन रब्बीचा गहू, हरभरा याच्या वावराला तो पेटवून रान ओवाळून काढायचे आणि तोच टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा मोठी आग करुन ती शमली की तीच्या राखेतून विस्तव असतानाच ती ठोकरुन घरी जायचे. असा मनमोहक सण आहे.

त्यानंतर घरातले कर्ते पुरुष माळेगावच्या खंडोबाच्या जत्रेला निघून जायचे….. ही जत्रा देशभरात वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. मोठा घोड्याचा बाजार ( माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचे दैवत त्यांचे घोडे ,मुंडेचे घोडे इथे येत ) ,गाढवांचा बाजार , सगळ्या भटक्या जमातींची पंचायत यावेळी इथे भरते. देशभरातले तृतीय पंथी दर्शनाला येतात ( हिजड्याचे माळेगाव अशीही ओळख ) ,तमाशाचे मोठ मोठे फड….. यामुळे अशा अनेक गोष्टीची उधळण असल्यामुळे या जत्रेला जनमाणसात कमालीचे आकर्षण होते.. ते आता लोप पावत आहे… पण एकूणच येळवस या सणामध्ये.. सांस्कृतिक पर्यटनाचे बीज आहेत.. याचा थोडा बाज बदलून याला नियोजनपूर्वक केले.. तर सारंगखेड्या सारखे स्वरूप येऊ शकते आणि पर्यटनाचे एक वेगळे दालन उभ राहू शकते. काही लोकं, संस्था यासाठी प्रयत्नशील असल्याचे ऐकून आहे. पण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा सण अनुभवावा एक वेगळा आनंद मिळाल्याचा फील घेऊन जाल एवढं मात्र नक्की…!!

@ युवराज पाटील, लातूर

( लेखक हे लातूर जिल्हा माहिती अधिकारी आहेत )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]