■जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून प्रशासन व मंदिर समितीने कार्तिकी वारीला स्वच्छतेचे स्वरूप मिळवून दिले■
◆प्रशासनाच्या वतीने यात्रा कालावधीत दररोज 70 ते 100 टन कचरा उचलला, तेराशे सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती◆
■दर्शन रांगेत अन्य भाविकांची घुसखोरी होऊ नये म्हणून डबल बॅरेकेडींग तर विसावा केंद्रामुळे भाविक समाधानी■
◆कार्तिकी वारीसाठी पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी व भाविकांकडून स्वच्छतेबद्दल समाधान व्यक्त, शासन व प्रशासनाचे मानले आभार◆
सोलापूर, दिनांक 25( वृत्तसेवा):- कार्तिकी शुद्ध एकादशी दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. दिनांक 14 नोव्हेंबर 2023 पासून ते 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत किमान सात ते दहा लाख भाविक पंढरपूर शहरात येणार असल्याने त्या पद्धतीने जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने भाविकांना अन्य सोयीसुविधा बरोबरच स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊन त्या पद्धतीने उपाय योजना केलेल्या होत्या. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना दर्जेदार स्वच्छतेचा सुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुरुवातीपासूनच पंढरपूर शहर यात्रा कालावधीत स्वच्छ राहावे यासाठी स्थानिक प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. सर्व स्थानिक शासकीय यंत्रणा व मंदिर समिती यांची वेळोवेळी संयुक्त बैठका घेऊन मार्गदर्शन केले. व स्वच्छतेसाठी आवश्यक ते बदल घडवून आणले. यात्रा कालावधीत येथे येणाऱ्या वारकरी, भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे .
त्याप्रमाणेच शहराची स्वच्छता सर्वात महत्त्वाची असून शहर स्वच्छ राहिले तर साथीचे आजार पसरणार नाहीत, याबाबत सर्व यंत्रणांना सुचित करून त्या अनुषंगाने पंढरपूर शहरात ज्या ठिकाणी भाविकांची जास्त गर्दी राहील त्या ठिकाणी स्वच्छता कशा पद्धतीने राहील याबाबत नियोजन केले. तसेच अन्य ठिकाणी कचरा उचलण्यापासून ते कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यापर्यंत सूक्ष्म नियोजन नगरपालिका प्रशासनाने कशा पद्धतीने केले पाहिजे याविषयी निर्देशित केले. मंदिर परिसर व दर्शन रांगेमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देऊन वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले.
यामध्ये प्रमुख्याने 65 एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी, पत्राशेड, गोपाळपुर रोड, मंदिर परिसर या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने या ठिकाणी स्वच्छता अधिक चांगले कशा पद्धतीने राहील याबाबत नगरपरिषद व मंदिर समितीला काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश दिलेले होते त्यानुसार शेकडो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वेळोवेळी साफसफाई करून या ठिकाणासह संपूर्ण शहरात स्वच्छता राखण्याबाबत चांगले प्रयत्न करण्यात आले व त्यामुळे शहरात येणाऱ्या भाविकांना ही स्वच्छता पाहून एक प्रकारचे समाधान वाटले असेल.
शहरात सुलभ शौचालय, नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेले कायमस्वरूपी शौचालय व मुख्य गर्दीच्या ठिकाणी, मंदिराकडे प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर तात्पुरती शौचालय ठेवण्यात आली. या सर्व शौचालयाच्या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्याप्रमाणेच हे शौचालय भरल्यानंतर त्यातून मैला उचलून घेऊन जाण्यासाठी नगरपालिकेने वाहनाची व्यवस्था ठेवलेली होती. तसेच प्रत्येक शौचालयाच्या ठिकाणी साफसफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने वेळोवेळी शौचालये स्वच्छ केली जात असल्याने खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता झालेली दिसून येत आहे. येथे आलेल्या भाविकांना अशा प्रकारचे स्वच्छ मुबलक पाण्यासह 2 हजार 611 शौचालये उपलब्ध झाल्याने भाविकांनी या शौचालयाचा मोठ्या प्रमाणात वापर केला.
कार्तिकी एकादशीच्या रात्रीपासुनच 24 तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले असुन याकामी शहरासह 65 एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी 1300 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, यामध्ये 350 कायम तर 950 हंगामी कर्मचारी तसेच इतर नगर पालिकेकडून ही स्वच्छतेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
65 एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तसेच 41 घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालु आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील 4 टिपर, 2 कॉम्पॅक्टर, 1 डंपरप्लेसर, 4 डंपिंग ट्रॉलिने व जेसीबीच्या सहाय्याने दररोज 70 ते 100 टन कचरा उचलण्यात येत आहे. यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी प्रशासनास आतापर्यंत चांगले सहकार्य केले आहे व ते यात्रा कलावधीपर्यंत सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.
स्थानिक नागरिक व संपूर्ण राज्यासह परराज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांनी यात्रा कालावधीत स्वच्छतेच्या दृष्टीने प्रशासनाला चांगले सहकार्य केलेले असून प्रशासनाच्या वतीने शहर स्वच्छ राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधांचा वापर भाविकामार्फत चांगल्या पद्धतीने झालेला आहे.
त्यामुळे यावर्षीची कार्तिकी वारी ही खऱ्या अर्थाने स्वच्छतेची वारी ठरली आहे असेच म्हणावे लागेल.
ही कार्तिकी यात्रा स्वच्छता चांगल्या पद्धतीने ठेवली गेल्याने व प्रशासनाच्या प्रयत्नांना भाविकांनी व स्थानिक लोकांनी तेवढ्याच ताकदीने सहकार्य केल्याने यशस्वी झालेली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण यात्रा कालावधीत शहर कशा पद्धतीने स्वच्छ राहील याबाबत दिलेल्या सूचनांना व त्यांनी प्रत्यक्ष ठिकठिकाणी जाऊन स्वच्छतेची केलेली पाहणी यामुळे वारी कालावधीत स्वच्छतेला खूप अधिक महत्त्व दिले गेले व लाखो भाविकांनी स्वच्छता ला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्यात ही कार्तिकी वारी यशस्वी झाल्याचे दिसून येते.
जिल्हा प्रशासनाने दर्शन रांगेत होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी यावर्षी चांगली उपायोजना केलेली होती. दर्शन रांगेत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी तासनतास थांबलेल्या भाविकासमोर अन्य भाविकांनी घुसखोरी करू नये म्हणून ठीक ठिकाणी होऊ डबल बॅरिकेडींग केलेले होते. अशा ठिकाणी पोलिसा सोबतच मंदिर प्रशासनाचे कर्मचारी नियुक्त केलेले होते, जे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. त्यामुळे यावर्षीच्या कार्तिकी यात्रेत कोठेही दर्शन रांगेत घुसखोरी झालेली नाही. दर्शनासाठी लागणारा कालावधी ही यामुळे कमी झाला असल्याने वारकरी, भाविक यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. त्याप्रमाणे यावर्षी प्रथमच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी खूप वेळ भाविकांना थांबावे लागत असल्याने मंदिर ते पत्रा शेड गोपाळपूर या दर्शन रांगेत चार ठिकाणी विसावा केंद्र निर्माण केलेले होते. ज्यामुळे भाविकांना थकवा आल्यास ते या विसावा केंद्रात आराम करत होते. दर्शन रांगेतील या सुविधामुळे तासंतास दर्शनासाठी थांबावे लागत असले तरी विसावा केंद्रामुळे त्यांचा थकवा निघून जात होता. दर्शन रांगेतील विसावा केंद्र ही संकल्पना भाविकांसाठी खूपच लाभदायी ठरलेले दिसून येत आहे.
संपूर्ण कार्तिकी यात्रा यशस्वी होण्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वेळोवेळी प्रशासनाला दिलेल्या सूचनामुळे भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन यशस्वी झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासन, मंदिर समिती प्रशासन व पोलीस प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन यात्रा यशस्वी होण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले. व संपूर्ण शहरात ठेवलेल्या स्वच्छते बद्दल समाधान व्यक्त केले.
सर्व वाऱ्यामध्येही अशीच स्वच्छता राहावी -दुधभाते
यावर्षीच्या कार्तिकी वारीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी आम्ही पंढरपूर शहरात एसटीने आलो. एसटी स्टँड पासून ते मंदिर परिसर, वाळवंट घाट नामदेव पायरी व शहरात विविध ठिकाणी आम्ही फिरलो. सर्व ठिकाणी स्वच्छतेची चांगली व्यवस्था केलेली होती. दर्शन रांगेत ही स्वच्छतेला प्राधान्य दिल्याचे दिसून येत होते. तसेच चहापाणी, नाश्ता सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या होत्या. पोलिसांचा बंदोबस्त ही ठिकठिकाणी दिसून येत होता. विशेष म्हणजे शौचालयाच्या ठिकाणी मुबलक पाणी होते व सफाई कर्मचारीही होते व शौचालयाची स्वच्छता ही पूर्वीपेक्षा खूपच चांगली होती व पुढे येणाऱ्या सर्व वाऱ्यामध्येही अशीच स्वच्छता राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा बद्दल समाधान आहे.
महादेव दुधभाते, भाविक, सोलापूर