एक महिण्याच्या आत प्रश्नांची सोडवणूक होणार
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,संबंधित मंत्र्यांसोबत मुंबईत बैठक घेण्यात येणार
लातूर – माझं लातूरच्या वतीने माझं लातूर माझी जबाबदारी हा नारा देत लातूरच्या जिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी गोवंश केंद्र या मागण्यांसाठी २ ऑक्टोंबर २०२३ पासून शहरातील गांधी चौकात साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. हे उपोषण स्थगीत करण्यात आले आहे. एक महिण्याच्या आत या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येणार आहे तसेच या संदर्भात मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
माझं लातूरच्या वतीने लातूरकरांच्या जिव्हाळयाच्या, न्याय मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरु करण्यात आलेले होते. जिल्हा रुग्णालयाचा प्रलंंंबीत प्रश्न सोडवण्यात यावा आणि तातडीने हे रुग्णालय सुरु करण्यात यावे, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे. लातूर येथे सोयाबीन संशाोधन केंद्र आणि देवणी गोवंश संवर्धन केंद्र करावे या मागणीसाठी हे उपोषण सुरु होते. सहा दिवस अहोरात्र सुरु असणार्या या उपोषणाला सर्वच राजकीय पक्षांनी आपला पाठींबा दर्शवलेला होता. तर जिल्ह्यातील तब्बल ५६ पेक्षा अधिक संघटनांनी पाठींबा देत आंदोलनात रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवलेली होती.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लिखीत स्वरुपात पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून आठ दिवसात या संदर्भात मुंबई येथे बैठक लावण्याचे अश्वासन दिलेले होते. तर सहाव्या दिवशी माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन राज्याचे मुख्यसचिव यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करुन हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात सूचना केल्याचे सांगीतले.
शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड.बळवंत जाधव आणि आमदार अभिमन्यू पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपण माझं लातूरच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आमदारांना एकत्र करुन या सर्वच विषयावर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यासोबत माझं लातूरच्या शिष्टमंडळासह मुंबईत बैठक घेऊ. एक महिण्याच्या आत सर्व प्रश्नांची सोडवणूक करु. जर हे प्रश्न सुटले नाहीत तर आपण स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करु अशी ग्वाही दिली.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनीही हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगीतले. लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सोमवारी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात माझं लातूरच्या शिष्टमंडळासोबत बैठक लावण्यात आली असल्याचे सांगून उपोषण स्थगीत करण्याचे अवाहन केले.
या नुसार माझं लातूरच्या वतीने सुरु असलेले साखळी उपोषण स्थगीत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी सतिष तांदळे, दिपरत्न निलंगेकर, अभय मिरजकर, प्रा.डॉ.सितम सोनवणे, संजय स्वामी, संजय जेवरीकर, उमेश कांबळे, संतोष साबदे, काशीनाथ बळवंते, रत्नाकर निलंगेकर, सतीश सावरीकर, अरुण समुद्रे, राजेश तांदळे, सोमनाथ मेदगे, प्रशांत साळुंके, के.वाय. पटवेकर, सुनिल गवळी, अरुण हांडे, विनोद चव्हाण, विवेक बेंबडे, राहूल मातोळकर, सलिम शेख, मासूम खान, मोहसीन खान, अजय कल्याणी, शशीकांत पाटील, नारायण पावले, विजय स्वामी, अरविंद रेड्डी, प्रशांत साळूंके, नामदेव तेलंग, मच्छिंद्र आम्ले, प्रमोद गुडे, प्रदिप मोरे, गोपाळ झंवर, प्रशांत दुधमांडे, सुपर्ण जगताप, अॅड.सुनिल गायकवाड, डॉ.बी.आर.पाटील,प्रा.भीम दुनगावे, सचिन अंकुलगे, नितीन बनसोडे, प्रदिप नणंदकर, महेंद्र जोधळे, निशांत भद्रेश्वर, त्रिंबक स्वामी,शिलरत्न सोनवणे आणि इतरांनी या साखळी उपोषणात सक्रीय सहभाग नोेंदवला.