आपल्या मातीतील विषय शोधून संशोधन केल्यास जगाला खरा भारत कळेल-स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना
लातूर, मार्च 17
आपण आयुष्यात शिक्षण घेऊन कितीही मोठे झालो तरी आपली नाळ आपल्या मातीशी सदैव जुळली पाहिजे. केवळ पाश्चात्य साहित्यावर संशोधन न करता आपल्या समृद्ध मातीतील नवनवीन विषय शोधून संशोधन केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर जगाला भारत देश काय आहे हे कळेल कारण आपल्या मातीतील साहित्य समृद्ध आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे असे मत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनेतून व्यक्त केले.
दयानंद कला महाविद्यालयातून पदव्युत्तर इंग्रजीचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आणि ज्ञानदान, न्यायदान, समाजकारण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्र येऊन जुन्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला आणि अनेक नवीन विषयांवर आपले मत व्यक्त केले या मेळाव्याला 1972 पासून या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. डॉ पांडुरंग शितोळे, धनंजय देवलाळकर, मनोहर जोशी, जयंत दिवाण, शहाजी पवार यांच्या पुढाकारातून ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन मंदिर मध्ये या मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला माजी प्राचार्य डॉ विभाकर मिरजकर, प्रा.गो न मगगीरवार, प्रा. चंद्रकला भार्गव यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे भयभीत झाले होते. परिणामी भेटण्याची आस असतानाही गेली दोन वर्ष कोणाशीही भेटता आले नाही यातच विषाणूंच्या संसर्गाने अनेक मित्र, नातेवाईक गमावल्याची खंत काहींच्या मनामध्ये कायम असताना या स्नेह मेळाव्यात जुन्या मित्रांना भेटून अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे दिसून आले होते. या निमित्ताने जुन्या आठवणी ताज्या झाल्याचा अनुभव सर्व मित्रांनी घेतला. कॉलेज जीवनातील अनेक क्षण कॉलेजचा परिसर इमारत गप्पा गोष्टी गुरुजन आपण कितीही मोठे झाले झालो तरी विसरू शकत नाही हाच धागा धरून सर्व माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या.
खूप वर्षांनी आपल्याला प्रत्यक्ष भेटता आलं. जगणं किती क्षणभंगूर आणि अस्थिर आहे हे कोरोणाने आपल्याला दाखवून दिलंय. अशा वेळी एकमेकांना प्रत्यक्ष भेटणं म्हणजे आयुष्य नुसतं लांबवणं नाही तर समृद्ध करणं आहे. जीवन-मृत्युच्या जीवघेण्या खेळात भेटत राहणं आणि एकमेकांना उत्साह आणि धीर देत राहणं हेच आपल्या हाती आहे. एकत्र येणे म्हणजे घरंगळत जाणार्या आयुष्याला मिळालेला संजीवक थांबा! हे म्हणजे आयुष्याच्या या वळणावर जरा विसावून आठवणींना उजाळा देणं आहे. भले-बूरे विसरुन एकमेकांच्या साथीने जगण्याचा उत्सव साजरा करणं आहे. अनेक जण तर वीस-पंचवीस वर्षांनी भेटले. नुसतं भेटणं सूद्धा किती सुखदायी असतं ना! आपण सगळे भूतकाळात कॉलेज मधील विद्यार्थी दशेत रमून गेलो होतो. सगळ्यांच्या चेहर्यावर उत्साह आणि मनात उमाळा होता. अनेक माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतांमधून त्यांच्या आठवणी ताज्या केल्या, आपल्या भावनांना वाट करुन दिली. ‘सेवितो हा रस वाटितो आणिका’ याशिवाय भेटण्याचा दुसरा उद्देशच काय असतो? हे साध्य केलं.
या प्रसंगी प्रा चंद्रकला भार्गव यांनी मार्गदर्शन करताना समाज कार्यातून भविष्यात आपण काय करायला हवं हे दाखवून दिलं. डॉ. मिरजकर यांनी सर्वांशी संवाद साधून वातावरण चैतन्यमय केलं. त्यांनी साधलेला संवाद जगण्याचं खरं मोल समजावणारा होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ पांडुरंग शितोळे, मनोहर जोशी यांनी केले तर प्रा विनोद चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.