•● जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आदेश●
• ◆प्रमुख मार्गांवरील हॉटेल्स, पेट्रोलपंपांची तपासणी◆
लातूर, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील पेट्रोलपंप, हॉटेल्समध्ये महिलांसाठी स्वतंत्र, सुस्थितीतील स्वच्छतागृहे असणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तपासणीत जवळपास 7 पेट्रोलपंप आणि 31 हॉटेल्समध्ये अशी स्वच्छतागृहे नसल्याचे आढळून आले. या सर्व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर महिलांसाठी उपलब्ध स्वच्छतागृहाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा महिला व बालविकास विभाग, राज्य परिवहन महामंडळ, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, भारतीय स्त्री शक्ती संघटनेचे पदाधिकारी, पेट्रोलपंप चालक व त्यांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील मार्गांवर प्रत्येक दोन तासांच्या अंतरावर महिलांसाठी भारतीय शैली व पाश्चिमात्य शैलीची स्वतंत्र व सुस्थितीतील स्वच्छतागृहे असावीत. त्याठिकाणी महिलांसाठी आवश्यक इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करून त्याबाबतची माहिती स्थानिक भाषेत प्रदर्शित करण्याबाबत स्त्री शक्ती संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाच पथके नेमून जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील पेट्रोलपंप, हॉटेल्समधील महिला स्वच्छतागृहांचा आढावा घेण्यात आला. या पथकांनी लातूर-बार्शी मार्ग, लातूर-अंबाजोगाई मार्ग, औसा मोड-निलंगा मार्ग व उमरगा मार्ग, लातूर-नांदेड मार्ग, लातूर-औसा-तुळजापूर मार्ग या मार्गांवरील 81 हॉटेल्स आणि 56 पेट्रोलपंपांची तपासणी केली. यापैकी 7 पेट्रोलपंप आणि 31 हॉटेल्समध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याचे आढळले. तसेच काही ठिकाणीची स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याचे आढळून आले.
पेट्रोलपंप आणि हॉटेल्समध्ये महिलांसाठी स्वतंत्र, स्वच्छ व सुस्थितीतील स्वच्छतागृहे असणे आवश्यक आहे. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा नसलेल्या पेट्रोलपंप, हॉटेल्सवर संबंधित शासकीय यंत्रणांनी तातडीने दंडात्मक कारवाई करावी. तसेच या आस्थापनांना लवकरात लवकर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याबाबत आदेश द्यावेत. अस्वच्छ स्वच्छतागृहांना नोटीस देवून तातडीने या स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यास सांगावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी सांगितले. लातूर महानगरपालिका क्षेत्रातही अशा प्रकारे तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यात यापुढे नियमितपणे अशाप्रकारची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हॉटेल्स, पेट्रोलपंप तपासणी मोहीम जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार शोभा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या पथकांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार धनश्री स्वामी, परवीन पठाण, औसा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बाळासाहेब कांबळे, प्रवीण अळंदकर, अहमदपूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बबिता आळंदे, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहायक, तसेच भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या सहसचिव संजीवनी सबनीस, अध्यक्ष डॉ. जयंती अंबेगावकर, सदस्य ऋता देशमुख, विद्या बोकील यांचा समावेश होता.