32.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeसंगीत*मराठवाड्यातील पहिल्या महिला संगीत दिग्दर्शिका, गायिका व सिद्धहस्त कलावंत :आनंदी विकास*

*मराठवाड्यातील पहिल्या महिला संगीत दिग्दर्शिका, गायिका व सिद्धहस्त कलावंत :आनंदी विकास*

ओळख व्यावसायिकांची
महिला दिन विशेष मध्ये आजची व्यावसायिक ओळख
मराठवाड्यातील पहिल्या महिला संगीत दिग्दर्शिका, गायिका व सिद्धहस्त कलावंत

आनंदी विकास

संगीत दिग्दर्शक ही संगीताच्या विविधांगी पैलूंसाठी जबाबदार व्यक्ती असते. यामध्ये कलात्मक दिग्दर्शक आणि सामान्यत: ऑर्केस्ट्रा किंवा कॉन्सर्ट बँडचे मुख्य कंडक्टर म्हणूनही त्यांना ओळखले जाते.या शीर्षकांच्या उत्क्रांतीनंतर २० व्या शतकाच्या मध्यात युनायटेड स्टेट्समध्ये संगीत दिग्दर्शक हा शब्द सामान्य झाला. ऑर्केस्ट्राच्या सुरुवातीच्या व्यक्तीला फक्त कंडक्टर म्हणून नियुक्त केले गेले. तर १९२० आणि १९३० च्या दशकात, संगीत दिग्दर्शक हा शब्द नव्याने वापरला जाऊ लागला, कारण या पदावरील व्यक्ती केवळ आयोजन करण्यापेक्षा बरेच काही कौशल्य सादर करत आहे हे स्पष्ट करण्यासाठी आणि त्यांना फक्त एका विशिष्ट कार्यक्रमाचे किंवा मैफिलीचे नेतृत्व करणाऱ्या अतिथी कंडक्टरपेक्षा वेगळे करण्यासाठी हे नाव प्रदान करण्यात आले, उदाहरणार्थ, जॉर्ज सेझेल यांची १९४६ मध्ये क्लीव्हलँड ऑर्केस्ट्राचे संगीत दिग्दर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि १९७० मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांच्या पदाचे नाव असेच ठेवण्यात आले. त्यांचे उत्तराधिकारी लॉरिन माझेल यांना संगीत दिग्दर्शक ही पदवी देण्यात आली.

इतर प्रमुख अमेरिकन वाद्यवृंदांनी काळानुसार अधिक चालू ठेवले आणि १९५० आणि १९६० च्या दशकात सोपा शब्द वापरण्यास सुरुवात केली.चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक, रेडिओ स्टेशनवरील संगीत दिग्दर्शक,संगीत क्रियाकलापांची प्रभारी व्यक्ती किंवा संगीत विभागाचे प्रमुख यांचा समावेश असेल. शाळा, युनिव्हर्सिटी, कॉलेज किंवा संस्थेतील संगीताच्या समारंभाचा संयोजक, मिलिटरी बँडचा मुख्य बँडमास्टर, चर्चचा मुख्य ऑर्गनिस्ट आणि गायन मास्टर, किंवा ऑर्गनिस्ट आणि गायन वादकांचा मास्टर. वैकल्पिकरित्या, संगीत दिग्दर्शक हा शब्द चित्रपट किंवा संगीत डॉक्युमेंटरीसाठी निवडलेल्या संगीताचे पर्यवेक्षण आणि दिग्दर्शन करण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यावसायिकांच्या चित्रपट क्रेडिट्समध्ये दिसायचा, परंतु आज भारतात, जिथे संगीत म्हणून अनेक चित्रपट तयार केले जातात, तिथे संगीत दिग्दर्शक हा शब्द सामान्यतः चित्रपटातील गाणी आणि स्कोअरच्या संगीतकार आणि संगीत निर्मात्यासाठी वापरला जातो. त्यांच्या भूमिकांमध्ये चित्रपट संगीताच्या ध्वनिमुद्रणाची मांडणी, निपुणता, मिक्सिंग आणि पर्यवेक्षण यासह आयोजन आणि ऑर्केस्ट्रेशन यांचा समावेश होतो. अशा या संगीत दिग्दर्शन क्षेत्रांमध्ये मराठवाड्यातील पहिल्या महिला संगीत दिग्दर्शिका व गायिका म्हणून ख्यातनाम असणाऱ्या सिद्धहस्त कलावंत म्हणजे आनंदी विकास.
आनंदी विकास देशमुख या पूर्वाश्रमीच्या आनंदी वैद्य. मराठवाड्यातील मुदखेड जंक्शन या तालुक्याच्या ठिकाणी आनंदी विकास यांचा जन्म झाला असला तरी त्यांचे माहेर हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे.धाकटे देवघर हे माहेरचे कुलदैवत.माकेगावचा दत्तोबाही कुलदैवत.त्यांचा वैद्यांचा वाडाही तिथे अस्तित्वात होता पण आता तो कुळ वगैरे प्रकारात गेला असावा. त्यामुळे अंबाजोगाईचे साहित्य, संगीत कलेविषयीचे बाल संस्कार अगदी लहानपणापासूनच त्यांच्यावर झाले. हे लहानपणापासून झालेले संस्कार आणि सांस्कृतिक वारसा आजही त्यांनी जपलेला आहे.वडील हरिहरराव वैद्य मुदखेडच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये संस्कृतचे शिक्षक होते. वडील संस्कृत विषयाचे विद्वान पंडित, संस्कृत वांड़मयाचे अभ्यासक, व्यासंगी असे व्यक्तिमत्व होते. आई गोपिकाबाई कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या. आईने त्यांच्या संगीत शिक्षणासाठी सातत्याने केलेल्या तडजोडीमुळे व वडिलांनी केलेल्या हेतुपुरस्सर मेहनतीने तसेच मुदखेड परिसरामध्ये वावरणाऱ्या गोंधळी, मुसाफिर, मसनजोगी,जोगतीण यांच्या माध्यमातून लोकगीतांचा व लोककलांचा अभ्यास लहान वयातच होत गेला. यांच्याकडून जी गीते ऐकली जायची त्यांच्या ज्या चाली ऐकल्या जायच्या याचाही खूप मोठा परिणाम त्यांच्या बालमनावर झाला व याच ठिकाणी त्यांच्यातल्या संगीतकार या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत गेली व ती बीज पेरणी मुदखेड परिसरामध्ये शालेय शिक्षण घेत असताना झाली. मुदखेडला संगीताचे शिक्षण गुरुवर्य माधवराव कांजाळकर यांच्याकडे घेतले. मुदखेडमध्ये शामराव केजकर व शोभा केजकर या दाम्पत्याने त्यांचा संगीताचा रियाज करून घेतला. वडिलांना त्यांच्यातल्या संगीतकलेची चुणूक त्याच वेळी कळाली होती म्हणून वडील पहाटे तीन वाजताही त्यांना रियाजासाठी गुरुजींकडे घेऊन जायचे.


शालेय शिक्षण पूर्ण करत असताना त्याबरोबरीनेच संगीताचेही शिक्षण त्यांचे चालू होते.त्यांनी मराठी विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून संगीत अलंकार ही संगीत क्षेत्रातील पदवी देखील प्राप्त केली आहे. त्यानंतर पुढे अंबाजोगाई येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पं. शिवदास देगलूरकर यांच्याकडे गायनाचे धडे घेतले. पुढे लग्नानंतर नांदेड जवळील मालेगाव या त्यांच्या छोट्या गावी त्यांनी पुढे संगीत आराधना चालूच ठेवली. मालेगाव मधून त्यांनी सलग 7 वर्ष संगीताचे मोठमोठे उपक्रम व कार्यक्रम संपन्न केले व तेथील रसिकांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण होण्यास साहाय्य केले. योगायोगाने आयुष्यामधील जोडीदार सुद्धा संगीतक्षेत्रातील मिळाल्यामुळे संगीत साधना करण्यासाठीचे पाठबळ मिळाले. लग्नानंतर त्यांचे पती विकास देशमुख व यांच्या घरातील सर्व मंडळींनी आनंदी विकास यांना पाठिंबा दिला सहकार्य केले व संगीतकार होण्यासाठी प्रोत्साहन दिले.

जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी करत असताना, संगीतकार म्हणून काम करताना लागणारा वेळ व्यस्त वेळापत्रक यामधूनही त्यांनी कुटुंबासाठी, मुलांसाठी जतन करून ठेवलेला वेळ आपल्या मुलांचे शिक्षण, संस्कार, त्यांचे छंद तसेच करियर यासाठी कटाक्षाने दिलेला आहे. त्याकडे यत्किंचितही दुर्लक्ष होऊ दिलेले नाही. विकास देशमुख हे सुद्धा उत्तम हार्मोनियम वादक व संगीताचे जाणकार आहेत. संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी नावीन्यपूर्ण, इतरांपेक्षा वेगळे करावयाची तीव्र इच्छा असल्यामुळे मुंबई येथे १९९८ मध्ये ख्यातनाम संगीतकार दशरथ पुजारी सरांकडे त्यांनी पुढील शिक्षण घेतले.

आनंदी विकास या ग्रामीण भागातून मुंबईसारख्या पुढारलेल्या शहरांमध्ये नव्यानेच गेलेल्या होत्या. संगीत क्षेत्रातील नावाजलेली मंडळी त्या ठिकाणी यायची, त्या ठिकाणी असणारा इंग्रजी भाषेचा वापर,शहरी वातावरण यामुळे त्या कधीतरी बावरायच्याही परंतु त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास होता त्या आत्मविश्वासाने आनंदीविकास ठामपणे आलेली परिस्थिती उत्तमरीत्या हाताळायच्या. गुरू म्हणून दशरथ पुजारी यांना त्यांचा हा बाणा मनातून आवडायचा. घरचे सर्व कुळाचार कुलधर्म, प्रापंचिक सांसारिक जबाबदाऱ्या, सांभाळून तसेच जिल्हा परिषद मधील नोकरी मध्येही कुठे उणिवा न जाणवू देता प्रचंड कष्ट घेत त्यांनी संगीताचे शिक्षण मुंबईमध्ये घेतले. पुजारी सरांकडे महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतकारांची उठबस असायची त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांबरोबर संगीत रचना ऐकण्याची व निर्मितीची त्यांना संधी प्राप्त झाली. नकळतच आनंदी विकास यांच्या मनावर संगीतकाराचे शिक्षण प्रशिक्षण होत गेले. पुजारी सरांनी त्यांना मैफिली मध्ये कसे गायचे,सुगम संगीत कसे गायचे, बंदिशी कशा गायच्या हे शिकवत असताना त्यांना आनंदीविकास यांच्यातील संगीतकारांसाठी असणारी गुणवैशिष्ट्य जाणवू लागली आणि गुरू म्हणून त्यांनी ती स्पष्टपणे बोलून ही दाखवली.गाणी गाणारे खूप जण आहेत, पण गाणी तयार करणारे कमी असतात तुझ्यात मला ते सारे गुण दिसतात असे बोलून त्यांनी संगीतकार होण्याकडे त्यांचे लक्ष वळवले व तेथूनच संगीतकार होण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला.


आनंदी विकास यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये द्विधा राधा, गाणी ऋतू वेल्हाळ, फुलपाखरांचा गाव, या दृकश्राव्य कार्यक्रमांचे संगीत दिग्दर्शन, विंदा करंदीकर,शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, सुहासिनी इरलेकर, अमृत देशमुख, देविदास फुलारी, भगवान कोठेकर, लक्ष्मीकांत तांबोळी, शंकर वाडेवाले, रेणू पाचपोर, माधव सुकेवाडी, संजीव कोकीळ, प्रभाकर साळेगावकर, योगीराज माने, राजेंद्र अत्रे, व्यंकटेश काब्दे, अमोल देवळेकर, विवेक मुगळीकर, दिलीप पंडित यासह अनेक सुप्रसिद्ध कवींच्या कवितांना व रचनांना त्यांनी स्वरसाज चढविलेला आहे. डिसेंबर २००८ मध्ये सह्याद्री वाहिनीच्या बालचित्रवाणी या राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान पुणे अंतर्गत कार्यक्रमातील सर्व शिक्षा अभियानातील शैक्षणिक गीतांचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. गोदातटी शिवानंद, कल्पतरूची सावली, संचारेश्वर, नाद श्रुती, नरसिंह स्वामी, मंथगाई गाभार, खाकी गुलाब, भक्तिरंग आणि रसरंग, सुखाची ठेव, पाऊस गाणी, झेप, सुगरणीचा खोपा बालगीते, अशा विविध ऑडिओ-व्हिडिओ सिडी निर्मिती आणि त्यांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केलेले आहे.आनंदी विकास यांनी निर्मिती केलेल्या ६४ गाण्यांचे प्रक्षेपण आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून ( महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर )तसेच परदेशामध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ कार्यरत आहे, त्या ठिकाणी सुद्धा नियमित होत असते. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचे गीत, नांदेड येथील राजर्षी शाहू विद्यालय, गुरुकुल विद्यालयाचे प्रार्थनागीत,होट्टल संगीत महोत्सवाचे शिल्पगीत सुद्धा त्यांनी संगीतबद्ध केलेले आहे.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे सादर होणाऱ्या होट्टल महोत्सव,दिवाळी पहाटसह अन्य महोत्सवामधूनही त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो. त्या जिल्हा परिषद विभागांमार्फत घेण्यात येणाऱ्या सांस्कृतीक विभागाच्या कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असतात. अनेक वेळा नियोजनाची सुद्धा जबाबदारी त्या कुशलतेने सांभाळतात. १५ जानेवारी २०१० रोजी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील महाराष्ट्र शासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यातील विद्यार्थ्यांचे समुहगान हा उपक्रम नांदेड येथे संपन्न होणार होता. त्याची संपूर्ण जबाबदारी संगीत दिगदर्शक म्हणून फार कौशल्याने यांनी पार पडली होती. २५००० विद्यार्थी एका सुरात एका तालात गातात हे एक महिला उत्तमरित्या हाताळतेय ही एक कौतुकास्पद व अभिमानास्पद गोष्ट आहे असे महत्वपूर्ण बोल तत्कालीन सांस्कृतिक मंत्री व सध्याचे पालक मंत्री असलेले नांदेडचे भूमिपुत्र मा. अशोकराव चव्हाण यांनी व्यासपीठावरून व्यक्त केले होते.


महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वांड.मयीन पुरस्कार सोहळ्यात गाणी ऋतू वेल्हाळ या त्यांच्या कार्यक्रमाचे अनेक मान्यवरांच्या समोर सादर करून त्यांनी वाहवा मिळविली आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलन, बीड येथे फेब्रुवारी २००९ मध्ये निमंत्रित कार्यक्रमांमध्ये गाणी ऋतू वेल्हाळ चे सादरीकरण केले. तसेच अखिल भारतीय संगीत संमेलन परभणी २००७ मध्ये गाणी ऋतू वेल्हाळचे सादरीकरण, परभणी येथे भरलेल्या १९व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात फुलपाखरांचा गाव हा बालगीतांचा कार्यक्रम तसेच नांदेड येथील संगीत शंकर दरबार या महोत्सवात गीत एक आनंदचे सादरीकरण करत रसिकांना नवनिर्मितीचा आनंद त्यांनी दिला आहे. मराठवाड्यातील विविध संगीत स्पर्धा मध्ये त्या परीक्षक म्हणून कार्यरत असतात. प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या संगीत स्पर्धांचे सलग तीन वर्षे जिल्हास्तरीय परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. श्री क्षेत्र पंढरपूर, दत्त संस्थान कारंजा, अक्कलकोट,गोंदवले, सज्जनगड, कोल्हापूर अशा नामवंत पुण्यक्षेत्री संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर संगीत मैफिलीचे कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. मुंबई दूरदर्शन वर सह्याद्री वाहिनीच्या संगीत उपक्रमातील एम 2 जी 2, कला डायरी, भक्तिरंग, नमस्कार मंडळी, हॅलो सखी या कार्यक्रमातून त्या रसिकांच्या भेटीला आल्या आहेत. दिल्ली,सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे ही महाराष्ट्रीयन संगीत लावणी करिता केंद्र सरकार तर्फे त्यांना निमंत्रित म्हणून पाचारण करण्यात आले होते. ई टिव्ही वरील ७५ भागाच्या भजन स्पर्धेत परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.साम टीव्ही वर गाण्यातही करियर करता येते का ? यासाठी एक तासाच्या चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या समवेत आनंद भाटे, कौशल इनामदार, श्रीरंग भावे, महेश हिरेमठ ,शिल्पा गुजर आदींचा सहभाग होता. झी मराठी या वृत्तवाहिनी वरून लेडीज स्पेशल कार्यक्रमातून महिला संगीतकार म्हणून त्यांची मुलाखत प्रसारित करण्यात आलेली आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांना आजपर्यंत उत्तरा केळकर, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, ऋषिकेश रानडे, प्रियंका बर्वे, मुग्धा वैशंपायन, ज्ञानेश्वर मेश्राम,जसराज जोशी,सौरभ दप्तरदार, प्रियंका बर्वे, सावनी रवींद्र,आशा खाडिलकर,पं.अजित कडकडे,मंगेश बोरगावकर, शेफाली कुलकर्णी, सुरंजन खंडाळकर,अवधूत गांधी,अंकिता जोशी, आसावरी देगलूरकर , संदीप उबाळे , शमिका भिडे,यांच्यासह अनेक नामवंत व नवोदित गायक, कलावंतांनी या संगीतबद्ध रचनांना स्वरसाज दिलेला आहे.आजपर्यंत अनेक आशयगर्भ व चिंतनशील कवितांना आनंदी विकास यांनी संगीतसाज देऊन एका वेगळ्या उंचीवर कोंदणात नेऊन ठेवलेले आहे.
या आनंदीविकास यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक रचना प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावरील गीताला संगीतबद्ध करून ते मातोश्री (कलानगर मुंबई ) येथे प्रकाशित करण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. आज पर्यंत त्यांनी महिला संगीतकार म्हणून पांडुरंगाच्या चरणी सलग एकवीस नवीन गाणी संगीतबद्ध करून आपली सेवा अर्पण केलेली आहे. लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे त्यांचा संगीत रचनांचा बहारदार कार्यक्रम ११ सप्टेंबर २०१९ला पार पडला. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेविक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत दादा आमटे, डॉ दिगंत दादा आमटे, डॉ. समीक्षा आमटे आदी मान्यवर उपस्थित होते.हीच संगीतसेवा त्यांनी आनंदवन येथेही माँ विकास आमटे, डॉ भारती आमटे, व तेथील सर्व रसिकांसाठी केली आहे. काही दिवसांपुर्वी आषाढी एकादशीचे औचित्य साधून आनंदी विकास व भार्गवी या दोघींनी मिळून चिंबाडल्या रानी हा नृत्य,रांगोळी,शिल्पकला यांचा मिलाफ सुंदर पद्धतीने करून एक नाविन्यपूर्ण संगीत व्हिडिओ तयार केला.
आज पर्यंतच्या त्यांच्या सांगितिक प्रवासामध्ये २००४ मध्ये जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने दिला जाणारा संगीत रत्न पुरस्कार (सुवर्णपदक सन्मानपत्र व रोख रक्कम ) त्यांना मिळालेला आहे.गांधर्व महाविद्यालय मुंबई तर्फे २००० सालचा ग्रामीण भागातील उत्कृष्ट संगीत कार्य करणाऱ्या संगीतकारांना दिला जाणारा गांधर्व विशेष संगीत पुरस्कार त्यांना देऊन गौरविण्यात आलेले आहे.


नाशिक येथील राजमाता सन्मान पुरस्कार, कोल्हापूर, इचलकरंजी येथील एकता मित्र मंडळ व पत्रकार मित्र मंडळाच्या वतीने महिला संगीतकार म्हणून संगीत रत्न हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. २०१२ मध्ये नागपूर येथील पत्रकार संघाचा महिला भूषण पुरस्कार,तसेच २०१४ मध्ये महिला दिनाच्या निमित्ताने दिला जाणारा नांदेड येथील प्रतिष्ठित समजला जाणारा स्व. कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे.यासह त्यांच्याकडे अनेक पुरस्कारांची मांदियाळी खूप आहे.
आनंदी विकास यांच्या संगीतकार होण्याच्या प्रवासामध्ये एक दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत ते त्यांचे पती विकास देशमुख. याबरोबरच त्यांचा मुलगा आदित्य देशमुख यंत्र अभियांत्रिकी पदवी घेतलेला अभियंता असून सुद्धा ते साऊंड इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्याचा स्वतःचा मीडिया वर्क्स स्टुडिओ पुण्यामध्ये असून अनेक गाण्यांचे ध्वनी चित्रीकरण या भव्य स्टुडिओ मध्ये झालेले आहेत. स्नुषा युगा आदित्य ही कथक विशारद असून इंजिनिअर आहे. मुलगी भार्गवी देशमुख ही सुद्धा अत्यंत कमी वयामध्ये, उत्तम कथ्थक नृत्यांगना, कथ्थक संरचनाकार,(नृत्य दिग्दर्शिका) म्हणून नावारूपाला येत आहे आहे.पुण्याच्या ललित कला केंद्रामधून बी ए सर्वप्रथम तर एम ए च्या पदव्युत्तर परीक्षेमध्ये गुरू पं. रोहिणी भाटे यांच्या नावे दिले जाणारे सुवर्णपदक तिला प्राप्त झालेले आहे. तिने कथ्थक नृत्याचे प्रारंभिक शिक्षण नांदेडमध्ये रमा करजगावकर यांच्याकडे, तसेच पुढील शिक्षण नाशिकच्या कीर्ती भवाळकर व आता पुणे येथील प्रख्यात कथक नृत्य गुरु शर्वरी जमेनीस यांच्याकडे घेत आहे. नृत्य, योग व दिग्दर्शन या तिन्हींचा मिलाफ हा तिचा आवडता कलाप्रांत असून या क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची तिची इच्छा आहे व हे क्षेत्र करिअर म्हणून तिने सुरुवातीपासूनच निवडलेले आहे. हे करियर निवडत असताना भार्गवीला आनंदी विकास व वडील विकास देशमुख यांनी कोणतेही बंधन घातलेले नसून तिला तिच्या आवडत्या या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठीची मोकळीक त्यांनी दिल्यामुळेच ती नृत्यसादरीकरण,नृत्यदिग्दर्शन यात सृजनशील व नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहे. घरामध्ये गाणे जन्मापासूनच असल्याने तिला कलेचा प्रांत फार जवळून न्याहाळता आला आहे. कलेप्रति घेतलेले आईचे कष्ट, पावलोपावली संगीताविषयी दिसत आलेली आईची जिद्द तिला रोजच्या रोज अनुभवता आली आहे.आदित्य देशमुख साऊंड इंजिनिअर यांनी आजपर्यंत अनेक लघु चित्रपट व मोठ्या पडद्यावरील चित्रपटांचे ध्वनि चित्रीकरण केलेले आहे. त्याने आजपर्यंत उदाहरणार्थ, नेमाडे,फर्जंद काशिनाथ घाणेकर, बस्ता,विकेंड या डायलिमासह अनेक चित्रपटाचे ध्वनी, फॉली, एडिटिंग,मास्टर मिक्स असे कार्य लिलया हाताळले आहे. यातील दोन चित्रपटांची नोंद आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठीही झाली आहे.तसेच ड्रेनेज, वशाट, आयन,राजकुमार,लालबागची राणी, महाप्रयाण, असेही एकदा व्हावे, लग्न मुबारक यासारख्या लघुपटांची निर्मिती केलेली आहे.


आनंदी विकास मराठवाड्यातील पहिल्या महिला संगीतकार. ख्याती सिद्ध संगीतकार पं. दशरथ पुजारी,मुंबई यांच्या त्या शिष्या. दुर्दम्य इच्छाशक्ती, स्वतःबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास, सतत काहीतरी नावीन्यपूर्ण सर्जनशील करण्यासाठीची धडपड, उत्तम संगीत देण्यासाठीचा अट्टहास, अतुलनीय रचना देण्यासाठी अविरतपणे कष्ट करण्याची तयारी यामुळेच त्यांचा अचंबित करणारा प्रवास शक्य झालेला आहे. संगीतकार म्हणून करिअर करताना जी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये असायला हवीत. ती त्यांनी ग्रामीण भागात राहून सुद्धा मेहनतीच्या बळावर आत्मसात केली.त्यासाठी आवश्यक असणारी संगीत क्षेत्रातील गुरुसुद्धा त्यांनी कल्पकतेने निवडले.आजवर त्यांनी ४०० पेक्षा जास्त काव्यरचना संगीतबद्ध केले आहेत. त्यांनी आतापर्यंत चौदा सीडींची निर्मिती केलेली असून पाच थीम सॉंग ही त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. गाणी ऋतू वेल्हाळ या नावाने त्यांनी निर्मिती केलेला कार्यक्रम ज्यात गाणी,कविता,नृत्य, चित्र, संगीत व काव्य हे सर्व कला प्रकार एकाच वेळी लिलया साधत त्याचे प्रयोग अतिउच्च व्यासपीठावरून त्यांनी दमदारपणे सादर केलेले आहेत. तसेच अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनात परभणी येथे याच प्रकारातून लहान मुलांसाठी फुलपाखरांचा गाव हा नाविन्यपूर्ण संगीत कार्यक्रमही सादर केलेला आहे.महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या ठिकाणाहून तिर्थक्षेत्राच्या ठिकाणाहून त्यांनी स्वतःचे दर्जेदार कार्यक्रम सादर केलेले आहेत. साहित्यिक क्षेत्रातील ना. धो. महानोर, नाट्य नाट्यक्षेत्रातील चतुरस्त्र अभिनेते प्रभाकर पणशीकर, गायिका उत्तरा केळकर, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या सृजनात्मक संगीत निर्मितीचा गौरव केलेला आहे. झी मराठी वरून अवघा रंग एक झाला या कार्यक्रमा मधून माझी 25 गाणी जवळपास रोज लागतात
सह्याद्री वाहिनी वरून हॅलो सखी , सखी सह्याद्री ,नमस्कार मंडळी आणि आता मैत्र हे शब्द सुरांचे … याद्वारे तासाभराच्या मुलाखती प्रसारित
बालभारती शिक्षण संचालक कार्यालय येथे 11वी 12 वी साठी संगीत विषयासाठी सदस्य म्हणून नियुक्ती … महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणावर सदस्य म्हणून नियुक्ती. त्यांच्या मुलाने चित्रबोली क्रियेशन द्वारे निर्मिती केलेला डायरी ऑफ विनायक पंडित हा चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या 2 पुरस्काराचा मानकरी ठरला ..
त्याचे काही गिताचे संगीत आनंदी विकास यांचे होते .जे शंकर महादेवन यांच्या स्वराने चित्रपटाचा कळस गाठणारे ठरले .. त्यांची मुलगी भार्गवी देशमुख ही तर आंतर राष्ट्रीय कथक नृत्यांगना म्हणून नावा रुपास आली आहे ..
नीता मुकेश अंबानी यांच्या सी 2 एन या भव्य दिव्य शो चां ती एक भाग आहे ..
तसेच फेरोज अब्बास खान दिग्दर्शीत मुगल ए आझम या भव्य दिव्य शो ची पण ती एक भाग आहे या शो द्वारे तिने नुकताच 4 महिन्याचा अमेरिका दौरा पण केला आहे.

अशा या मराठवाड्यातील पहिल्या महिला संगीतकार, गायिका व सिद्धहस्त कलावंत यांच्या या क्षेत्रातील आजपर्यंतच्या योगदानासाठी मनःपूर्वक अभिनंदन तसेच आगामी काळातील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!

संपर्क
आनंदी विकास
94228 70619

शब्दांकन
गौतमी विराज बेदरकर
गौतमीची लेखणी
8419906360

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]