किल्लारी येथे मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघाचे अधिवेशन ;
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उदघाटन
प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव ही शासनाची योजना ; हे पाऊल ग्रंथालय चळवळीला पूरक
– वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख
ग्रंथालय चळवळीला बळ देण्यासाठी शासनस्तरावर मदत करणार
ग्रंथालय डिजिटल करण्याचे काम हाती घेऊन काळसुसंगत बदल कर
किल्लारी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी प्रयत्न
लातूर दि.29 ( जिमाका )
राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचे गाव करायचे ठरवले आहे. त्यामुळे ग्रंथालय चळवळीला पूरक काम शासनाकडून होणार असून ग्रंथालय संघाच्या प्रलंबित मागण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करु अशी ग्वाही
वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने मराठवाडा विभागीय ग्रंथालय संमेलन किल्लारी येथील व्यापारी संघ वाचनालय परिसरात आयोजित केले होते. त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, मा.आ. वैजनाथ शिंदे,श्रीशैल उटगे, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रामजी मेकले,
जिल्हा ग्रंथालयाचे कार्याध्याक्ष आणि या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. ब्रिजमोहन झंवर,ग्रंथालयाचे विभागीय ग्रंथालय सहायक संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय सुनील गजभारे, ग्रंथालय निरीक्षक सोपानराव मुंढे, किल्लारी व्यापारी संघ ग्रंथालयाचे अध्यक्ष संजय बाबुळसरे,
गावोगावी जे ग्रंथालय आहेत, तिथे अत्यंत कमी मोबल्यात काम करणारी माणसं हे ग्रंथालय चळवळीचे शिलेदार आहेत. गावातली माणसं या ग्रंथालयामुळे जगभरात काय सुरु आहे याची माहिती इथं येणाऱ्या वर्तमानपत्रातून, नियतकालिकातून माहिती घेतात. विविध ग्रंथ आणि पुस्तकातून ज्ञान घेतात, त्यामुळे ही चळवळ टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. शासन तुमच्या मागण्याकडे निश्चित सकारात्मक दृष्टीने बघेल अशी मला खात्री आहे. आपण सगळे मिळून यासाठी प्रयत्न करु असा विश्वास पालकमंत्री अमित देशमुख यांनी सर्व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांना दिला.
कथा वाचणारी माणस- व्यथा सांगतात
पुस्तक, कथा वाचणारी माणसंच व्यथा सांगतात त्यामुळे त्याचे प्रश्न अधिक संवेदनशीलपणे समजून घ्यायला पाहिजेत. या चळवळीचे मोलाचे कार्यकर्ते कै.त्र्यंबकराव झवंर यांनी या ग्रंथालय चळवळीला राजश्रय मिळवून दिला. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही वेळोवेळी या ग्रंथालय चळवळीला बळ दिलं आहे. त्यामुळे पुढे डॉ. . ब्रिजमोहन झंवर, मा. आ. वैजनाथ शिंदे आणि मी यात लक्ष घालेन अशी ग्वाही पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
स्व. त्र्यंबकराव झंवर यांच्या नावे राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार बुलढाण्याचे सुनील वायाळ यांना देण्यात आला. अकरा हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप, दुसरा पुरस्कार अहमदपूर येथील ग्रंथापाल नंदकुमार घोगरे यांना देण्यात आला. तर ग्रंथालय चळवळीत काम करणारे संतोष करमुले यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. ग्रंथालय सहायक संचालक सुनील हुसे यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ब्रिजमोहन झंवर यांनी केले. राज्य ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार यांनी ग्रंथालय संघाच्या मागण्या मांडल्या, मा. आ. वैजनाथ शिंदे, ग्रंथालय सहायक संचालक सुनील हुसे यांनी मनोगत व्यक्त केले.