- रजनीश जोशी
‘मनसमझावन’ या संग्राम गायकवाड यांच्या कादंबरीवरील परिसंवाद अभ्यासपूर्ण झाला. डॉ. रणधीर शिंदे, कादंबरीकार प्रवीण बांदेकर, प्राचार्य महेंद्र कदम यांचा त्यात सहभाग होता. कादंबरीकार श्री. संग्राम यांनीही सुरूवातीला मनोगत व्यक्त केलं. प्रगतीशील लेखक संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेनं त्याचं आयोजन केलं होतं.
सुरूवातीला डॉ. रणधीर शिंदे यांनी कादंबरीचा यथायोग्य, सखोल परामर्श घेतला. तिची सगळी बलस्थानं उलगडून दाखवली. वैचारिक, भावनिक, सामाजिक, धार्मिक, मनोविश्लेषणात्मक तरीही लालित्यपूर्ण, उत्कंठावर्धक गुण तिच्यात कसे आहेत ते त्यांनी फार छान सांगितलं. मी स्वतः ही कादंबरी वाचलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मतांशी मी पूर्ण सहमत आहे. समकालिन आणि वेधक अशी ही कादंबरी आहे.

प्रवीण बांदेकर यांनी अतिशय उत्तम विवेचन केलं. कादंबरीतील गाळलेल्या जागा (गॅप्स) भरण्याबद्दलचा त्यांचा मुद्दा चांगला होता. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाबाबत बांदेकर यांनी लोकप्रिय मांडणी केली. कादंबरीचा संपूर्ण परिप्रेक्ष्य आपल्या वैचारिक मांडणीतून प्रवीण यांनी उलगडला. कथानकाचा संदर्भ देत आजचं वास्तव कादंबरीत कसं प्रकट झालं आहे, ते स्वच्छ, स्पष्टपणे त्यांनी मांडलं. स्वतः कादंबरीकार असल्यानंच ‘मनसमझावन’चं मोठेपण त्यांनी सहजतेनं विशद केलं. त्यांचंही मनोगत प्रभावी झालं.
प्राचार्य महेंद्र कदम यांनी या कादंबरीची उंची किती आहे ते सार्वकालिक संदर्भ देत पटवून दिलं. त्याचप्रमाणे डॉ. रणधीर आणि डॉ. प्रवीण यांच्या मांडणीतील वेगळेपण, लक्षणीय मुद्द्यांचा उल्लेख करून त्यांचं महत्त्व पटवून दिलं. अध्यक्षीय मनोगत कसं असावं, याचा वस्तुपाठ त्यातून उपस्थितांना मिळाला.

माझ्या मते, संत कबीर, समर्थ रामदास आणि शाह तुराब यांच्या पदावल्यांमधील साधर्म्य शोधणं हे सोपं काम नव्हतं. त्यासाठी कबीर ग्रंथावली, गुरू ग्रंथसाहिब, समर्थ रामदासांच्या दखनी-उर्दू पदावल्या आणि शाह तुराब यांचं हिंदी ‘मनसमझावन’चा लेखकानं सखोल अभ्यास केला आहे. पण ‘मनसमझावन’बाबतची उत्सुकता कायम राहते. त्यातील काही पदावली दिल्या आहेत. पण एकूणच त्या ग्रंथाबाबत तपशीलानं यायला हवं होतं. कारण कादंबरीचं शीर्षक तेच आहे.
दुसरी गोष्ट, ज्या आईचा शोध कादंबरीचा नायक घेतो, तिची भेट ती मृत्युशय्येवर असताना होते आणि दोघे बोलू शकत नाहीत हा शेवट टिपिकल, वाचकाला चुटपुट लागावी म्हणून केल्यासारखा वाटतो. उलट, मायलेकांची भेट सविस्तर झाली असती तर त्यांच्यातील संवाद भावनिक, सामाजिक, वैचारिक अशा सगळ्या स्तरावर नेता आला असता, असं मला वाटतं. असो. कादंबरीबद्दल अशी वेगवेगळी मतं प्रकट होणं हेही तिच्या यशाचेच लक्षण आहे. ‘मनसमझावन’ ही समकालिन वास्तव संयतपणे मांडणारी विलक्षण कादंबरी आहे. लेखक संग्राम गायकवाड यांच्या समग्र अभ्यासाचं दर्शन तिच्यातून घडतं. १९९० नंतर जागतिकीकरणाचं वारं जोरात वाहू लागल्यानं आर्थिक क्षेत्रात उलथापालथ सुरू झाली. पण १९९२ साली बाबरी मशीद पाडली आणि संपूर्ण भारतातच नव्हे तर जगातील हिंदू-मुस्लिमांमध्ये उघड दरी निर्माण झाली. तोच धागा पकडून संग्राम यांनी वैश्विक, सामाजिक, भावनिक, वैचारिक, भाषिक, धार्मिक, आधुनिक, पारंपरिक, प्रागतिक जगाचा फेरफटका मारला आहे. सखोल अभ्यास, चिंतन आणि वाचकाशी सलगी करणाऱ्या लेखनशैलीमुळं ‘मनसमझावन’ समृद्ध झाली आहे. फक्रुद्दीन बेन्नूर, असगर अली इंजिनियर या विचारवंतांचे कादंबरीतील उल्लेख महत्त्वपूर्ण आहेत. प्रागतिक विचारांची मांडणी करताना अनवस्था प्रसंग ओढवू शकतात. वोरोनोको प्रशालेच्या सभागृहात असगर अली इंजिनियर यांचं व्याख्यान सुरु असताना काही मुस्लिम तरुणांनी गोंधळ घालून ते बंद पाडलं, इंजिनियर यांच्या अंगावर ते धावून गेले, हा प्रसंग मी स्वतः पाहिला आहे. त्याची बातमीही दिली आहे.
१९९० नंतरच्या घटना घडामोडींचे चिंतन, दखनी भाषेसह सगळ्याच गोष्टींची अभ्यस्त मांडणी संग्राम गायकवाड यांनी कादंबरीत जपून केली आहे. कादंबरी वाचल्यानंतर वाचकाचे फीलिंग कसे असावे, याची तयारी त्यांच्या नियोजनबद्ध अभ्यासात आहे. सोलापूरातील हिंदू-मुस्लिम सौहार्द आणि तणावाचा, इथल्या परिसर-वातावरणाचा उत्तम उपयोग त्यांनी करून घेतला आहे. या कादंबरीवर उत्तम चित्रपट निघू शकेल. दखनी भाषा स्वतः बोलतानाचा किंवा अयोध्येत मंदिराच्या बांधकामासाठी निघालेली वीट बोलतानाचा संवादाचा तुकडा एकपात्री साभिनय सादर करता येण्यासारखा आहे. सूत्रधाराची जोडणी करून या कादंबरीवर नाटकही होऊ शकेल. थोडक्यात, वेगवेगळ्या माध्यमांना यशस्वीपणे सामोरं जाण्याच्या सगळ्या शक्यता असलेला हा ऐवज आहे.
अमेरिकेत होणाऱ्या गांधी-मार्टिन ल्युथर किंग परिषदेसाठी निवड झालेल्या अदनान महबूब कोथिंबिरे या अभ्यासक तरूणाचा हृद्य सत्कार आणि सन्मान यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते झाला. तो औचित्यपूर्ण आणि तमाम सोलापूरकरांना अभिमान वाटावा असा होता.
प्रा. डॉ. रवि शिंदे (बार्शी) यांचे सूत्रसंचालन नेमके, मुद्देसूद आणि परिसंवादाला पुढे नेणारे होते. डॉ. दत्ता घोलप, सरफराज अहमद, नानासाहेब गव्हाणे, रवींद्र मोकाशी यांचे परिश्रम सार्थकी लागले. परिसंवादाला उपस्थिती चांगली होती. अनेक ज्येष्ठ-कनिष्ठ लेखक, विचारवंत यावेळी उपस्थित होते. मात्र नव्यानं लिहू लागलेल्या किंवा लिहू इच्छिणाऱ्यांनी या परिसंवादाला उपस्थित राहणं अत्यावश्यक होतं. किंबहुना अनुपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ साहित्यिक-कवींनाही या परिसंवादातून खूप काही शिकायला मिळालं असतं. ज्या सामाजिक संदर्भावर कादंबरी भाष्य करते, ते पाहता सोलापूरातील सर्व ज्येष्ठ-कनिष्ठ पत्रकारांनीही ती वाचायला हवी, असे सुचवावे वाटते.

- रजनीश जोशी
०००