ज्यांचे नाव घेतले की सज्जनांना आधार वाटतो आणि गुन्हेगारांचा थरकाप होतो अशा डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना पोलीस महासंचालक पदावर बढती मिळाली असून निलंबित परमबीर सिंग यांच्या रिक्त जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएस अधिकारी असणारे डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय यांनी पहिली सेवा पंढरपूर येथे उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून केली होती. सेवेच्या पहिल्या कालखंडात त्यांनी मिळविलेला लौकिक पुढे कायम ठेवत आज ते पोलीस महासंचालक पदावर विराजमान झाले आहेत. डॉ. उपाध्याय हे प्रथम पंढरपूर येथे आले तेंव्हा देवाचे हे गाव गुन्हेगारीच्या विळख्यात गुदमरून गेले होते. दिवसा नंग्या तलवारी नाचत होत्या आणि एकमेकांचे मुडदे पाडले जात होते. सामान्य माणूस प्रचंड भीतीच्या सावटात जगत होता आणि अवैध व्यवसाय बिनबोभाट सुरु होते.
उपाध्याय हे पंढरपूर येथे येताच त्यांनी गुन्हेगारी मोडून काढली आणि सामान्य माणसांना मोकळा श्वास घेण्याची संधी मिळवून दिली. सामान्य आणि गरीब माणसांसाठी पोलीस काय करू शकतात आणि पोलिसांची किती मदत जनतेला होऊ शकते हेच त्यांनी दाखवून दिले. डॉ भूषणकुमार उपाध्याय पंढरीत येण्यापूर्वी उप विभागीय पोलीस अधिकरी हे देखील पद पंढरपूर येथे आहे याची जाणीवही स्थानिकांना नव्हती. रात्री अपरात्री साधे कपडे परिधान करून सामान्य माणसांच्या गर्दीतून चालत जात ते कायदा सुव्यवस्थेचा कानोसा घेत तर कधी साध्या कपड्यात सायकलवरून एकटे जात अवैध धंद्यावर कारवाई करीत. सामान्य माणसांसाठी अर्ध्या रात्री उठून ते जात तर त्यांचे नाव घेतले तरी गुंडाना घाम सुटत होता. पाच ते सहा तालुक्यांचा कारभार त्यांच्या अखत्यारीत होता पण कुठेही गल्लीत काही खुट्ट वाजले तरी स्थानिक पोलिसांच्या आधी डॉ. उपाध्याय याना ती माहिती मिळत होती एवढा दांडगा लोकसंपर्क त्यांचा होता. पोलिसांना शिस्त लावण्याचे आणि गुन्हेगारी वठणीवर आणण्याचे काम डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले होते. जनतेने प्रचंड प्रेम केलेला हा पहिला आणि कदाचित अखेरचा पोलीस अधिकारी असावा….
पंढरपूरची जनता कुठल्याही अधिकाऱ्याचे उगीचच कौतुक करणारी नाही उलट अनेक पोलीस अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम पंढरीच्या जनतेने केले आहे पण डॉ. उपाध्याय हे एक वेगळेच ‘रसायन’ पंढरीत आले होते. पंढरपूरकरांनी त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून ‘पंढरी भूषण’ हा पुरस्कार त्यांना बहाल केला होता. लोक त्यांच्यासाठी वेडे होत होते, रस्त्यावरून ते निघाले तर लोक मोठ्या कुतूहलाने त्यांच्याकडे पाहायचे ! उपाध्याय याना भारतीय पोलीस सेवेत यायचेही नव्हते पण एका घटनेने त्यांना पोलीस सेवेत आणले. शिक्षक असणाऱ्या त्यांच्या वडिलांना पोलिसांनी अकारण त्रास दिला आणि या एकाच घटनेने त्यांना पोलीस सेवेत आणले. पंढरपूर येथून त्यांची बदली झाली तेंव्हा अवघे पंढरपूर रस्त्यावर उतरले होते. पंढरपूर येथेच पोलीस अधीक्षकांचे कार्यालय निर्माण करा आणि तेथे पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. उपाध्याय यांची नियुक्ती करा अशी मागणी करीत नागरिकांचा अभूतपूर्व असा एक मोर्चा निघाला होता. विशेष म्हणजे ज्या गुन्हेगारांना वठणीवर आणले होते त्यातील काही गुन्हेगार या मोर्चात सहभागी झालेले दिसत होते.
पंढरपूर येथून बदली होऊन ते थेट किल्लारी भूकंपाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पुढे जाईल तेथे अशाच पद्धतीने आणि समाजाभिमुख काम केले . नागपूर येथे कारागृह विभागाकडे असतानाही त्यांची बदली झाली तेंव्हा तुरुंगातील शिक्षा भोगणारे गुन्हेगार रडत होते. उपाध्याय यांची बदली रद्द करावी यासाठी त्यांनी अन्नत्यागाची देखील तयारी केली होती. पोलीस खात्यातील अधिकाऱ्याला जनतेतून मिळणारे असे प्रेम प्रचंड दुर्मिळ असते आणि ते अशा एखाद्याच अधिकाऱ्याच्या भाग्यात असते. तेच हे डॉ भूषणकुमार उपाध्याय आता पोलीस महासंचालक पदावर विराजमान झाले असून त्यांचे खूप खूप अभिनंदन होत आहे.