श्री श्री अष्टोत्तर शत(१०८) कुंडात्मक अतिरुद्ध महायाग एवं श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची जय्यत तयारी
14 फेब्रुवारीपासून लातूरमध्ये अवतरणार
मिनी कुंभमेळा
लातूर ; दि.१२ (वृत्तसेवा ) –-श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग समिती लातूरच्या वतीने मानव कल्याण एवं विश्वशांतीसाठी लातूरमध्ये आयोजित सात दिवसीय श्री श्री अष्टोत्तर शत (१०८ ) कुंडात्मक अतिरुद्र महायाग (यज्ञ ) एवं श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, कथास्थळी भव्य यज्ञशाळा व कथा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे ,अशी माहिती समिती प्रमुख हरिभाऊ मंत्री , संजय बोरा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पंचमुखी हनुमान मंदिर राजीव गांधी चौक ,रिंग रोड परिसरात होणाऱ्या या महायाग आणि श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास बुधवार दि. 14 फेब्रुवारी 2024 पासून प्रारंभ होत असून, गातेगाव येथील श्री राधाकृष्ण मंदिर अध्यात्म आश्रमाचे परमपूजनीय विद्यानंदजी सागर महाराज (बाबा ) यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने बुधवार दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी सांगता होणार आहे. श्री श्री अष्टोत्तर शत (108 ) कुंडात्मक अतिरुद्ध महायाग (यज्ञ ) दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता वेद मंत्रोच्चारात आणि यज्ञ आचार्य वेदशास्त्र संपन्न सुयश शिवपुरी (पैठण) व इतर ब्रह्मवंदांच्या उपस्थितीत होम हवानाने प्रारंभ होईल .यासाठी त्रिंबकेश्वर, पैठण, पुणे आदी प्रमुख शहरासह राजस्थान, हरिद्वार आदी प्रांतातून जवळपास 200 च्या आसपास ब्रह्मवंद येणार आहेत .14 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात 108 दाम्पत्य (जोडपे )होम हवन करतील .प.पू. विद्यानंदजी सागर महाराज आणि देशभरातून आलेल्या साधुसंतांच्या उपस्थितीत 20 फेब्रुवारी रोजी यज्ञ पूर्णाहुती होईल .
भव्य शोभायात्रेने भागवत कथेचा प्रारंभ

श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचा प्रारंभ दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता भव्य शोभा यात्रेने होणार आहे सकाळी ८ वाजता क्रीडा संकुलावरून शोभायात्रा निघून ती नंदी स्टॉप ,खर्डेकर स्टॉप, राजीव गांधी चौक या प्रमुख मार्गावरून 11 ते 12 वाजण्याच्या आसपास कथा मंडपात येईल .पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले पुरुष भावीक आणि भगव्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या माता .भगिनी सहभागी होणार आहेत. या शोभा यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अकरा हजार महिला मंगल कलश डोईवर घेऊन या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत .गोंधळी, आराधी ,भजनी मंडळ ,धनगरी ढोल ,ढोल ताशे ,झांज पथक ,लेझीम पथक आणि विविध पथकेही या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत .आणि शोभायात्रेच्या अग्रभागी गजराज देखील असणार आहे ,अशी माहिती शोभायात्रा प्रमुख माजी नगरसेवक विशाल जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली .
पाच एकर परिसरात कथा मंडप

श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते परमपूजनीय विद्यानंदजी सागर महाराज (बाबा ) यांची दि. 14 ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत दररोज एक ते चार या वेळेत श्रीमद् भागवत कथा होणार आहे. बाबाजींच्या अमोघ वाणीतून भागवत कथा श्रवण करण्यासाठी गातेगाव ,बोपला, बोरगाव काळे आदी परिसरातून दररोज हजारो भाविक भक्त येणार असल्याने पाच एकर परिसरात साडेतीनशे बाय साडे पाचशे साईजचा भव्य कथा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी भाविकांना कथेचे श्रवण व्यवस्थित करता यावे यासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.

या पत्रकार परिषदेस स्वामी ब्रह्मानंदजी (इंदौर ) ,
स्वामी गोविन्दानंद गिरिजी( हरिद्वार ),स्वामी राघवानंद गिरिजी (राजस्थान ), स्वामी सुनिल भारतीजी(राजस्थान ),स्वामी शिवांक गिरि (हरिद्वार),स्वामी कैवल्य गिरिजी( हरिद्वार ), स्वामी सोमेश्वर गिरिजी (त्र्यंबकेश्वर), स्वामी गौरक्षानंद गिरिजी
,स्वामी बालकानंद गिरिजी ( आंध्र प्रदेश ) याच्यासह समिती प्रमुख हरिप्रसाद मंत्री, तसेच संजय बोरा, चंद्रकांत बिराजदार, विशाल जाधव, राजेश्वर बुके, सिद्राम जाधव, दगडे पाटील आदी उपस्थित होते.