बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षण व अन्वेषण कामाचा आ अभिमन्यू पवार यांच्या हस्ते शुभारंभ..
बेलकुंड उपसा जलसिंचन योजना शेतकऱ्यांच्या जीवनासाठी क्रांतिकारी – आ अभिमन्यू पवार
औसा – ( माध्यम वृत्तसेवा):–बेलकुंड उपसा जलसिंचन योजना सर्वेक्षण व अन्वेषण कामास मान्यता मिळाली असून २०० कोटी रुपयांच्या या योजनेअंतर्गत बेलकुंड भागातील १८ गावे सिंचनाखाली येणार आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनासाठी क्रांतिकारी योजना असून निम्न तेरणा धरण होवून ३५ वर्ष पूर्ण झाली मात्र अवघ्या आठ – नऊ किलोमीटरवर असलेल्या गावांना या धरणाचे पाणी मिळाले नाही. धरण उशाला असतानाही आतापर्यंतच्या नेतृत्वाला या भागाचे पाणी मिळावे असे वाटले नाही हा मला पडलेला प्रश्न आहे आणि तो तुम्ही त्यांना विचारले पाहिजे असे सांगून बेलकुंड उपसा जलसिंचन योजना व बेलकुंड एमआयडीसी या दोन योजनेअंतर्गत या भागात औद्योगिक व जलक्रांती होणार असल्याची ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.
बेलकुंड (ता.औसा) येथे (दि.७) रोजी उपसा जलसिंचन योजनेसह विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, सरपंच विष्णू कोळी, संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रा सुधीर पोतदार,भाजपचे शहराध्यक्ष सुनील उटगे, श्रीनिवास मदने, उपसरपंच सचिन पवार, युवराज पाटील आदीसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आ अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की हि योजना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर राबवली जाणार असून ५५० चे ४ पंपव्दारे २२५० एचपी चा पाणीपुरवठा केला जाणार आहे सुमारे २०० कोटी रुपयांची हि योजना या भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. बेलकुंड येथील २५० हेक्टरवर एमआयडीसी मंजूर झाली आहे या एमआयडीसी मुळे या भागातील तरुणांना रोजगाराच्या शोधात न मुंबई किंवा पुणे याठिकाणी जाण्याची वेळ लागणार नाही. लातूर शहराच्या एमआयडीसी नंतर बेलकुंड एमआयडीसी उद्योगाच्या दुष्टीने महत्वची ठरणारी आहे. बेलकुंड हे राष्ट्रीय महामार्गालगत असून तुळजापूर येथील प्रस्तावित रेल्वे स्टेशन व हरगुंळ येथील रेल्वे स्थानक जवळ असून निम्न तेरणा धरणातील ३ एमएलडी पाणी या एमआयडीसी साठी आरक्षित करण्यात येणार आहे त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या हि एमआयडीसी जमेची बाजू ठरत आहे. असे सांगून या भागाच्या सर्वागिण विकासासाठी या योजना क्रांतिकारी असल्याचे त्यांनी सांगितले.
………………..
विविध विकास कामांचा शुभारंभ
यावेळी आ अभिमन्यू पवार यांच्या हस्ते बेलकुंड उपसा जलसिंचन योजना सर्वेक्षण व अन्वेषण कामासह, बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्र संरक्षण भिंत २० लाख रुपये, अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ते महादेव मंदिर रस्ता १० लाख रुपये, मुख्य रस्ता ते यादव मंगल कार्यालय रस्ता २० लाख रुपये, हनुमान मंदिर ते जगदंबा मंदिर रस्ता ८.५० लाख रुपये,साठे नगर समाज मंदिराची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे आदी कामाचा शुभारंभ तर ४४ लाख रुपये निधी बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्याचे लोकार्पण करण्यात आले…