बालनाट्य कलेतून व्यक्तीमत्व घडते – प्रकाश पारखी
नाट्य संमेलनाच्या पुर्वरंगातील बोक्या सातबंडे बालनाट्यास उर्त्स्फूत प्रतिसाद
लातूर प्रतिनिधी : नाट्यकलेतून व्यक्तीमत्वाचे वेगवेगळे कांगोरे उलगडण्यास मोठी मदत होते मात्र बालनाट्य हि कला व्यक्तीमत्व घडविण्यासाठी अतिशय उत्तम माध्यम असल्याचे सांगत बाल नाट्यकला अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी अखिल भारतीय बालनाट्य परिषद कार्यरत आहे. बाल नाट्यकलेचे विविध प्रकार असून यात सर्व प्रकारांचे प्रशिक्षण व त्याची ओळख लातूर मध्ये बाल कलाकारांना करुन देत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आपण अग्रेसर राहू असा विश्वास अखिल भारतीय बाल नाट्य परिषदचे अध्यक्ष प्रकाश पारखी यांनी दिला आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदचे १०० वे विभागीय नाट्य संमेलन लातूरात होत असून त्याच्या पुर्वरंगा निमित्त ‘बोक्या सातबंडे’ या बाल नाट्याच्या प्रयोगाचा शुभारंभ करताना प्रकाश पारखी बोलत होते. येथील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहाच्या कै. रविंद्र गोवंडे रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमास अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सतिश लोटके, नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य आनंद कुलकर्णी, डॉ. बालाजी वाघमारे, शिवान शिंदे, अखिल भारतीय नाट्य परिषद लातूर महानगरचे अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, लातूर शहर शाखेचे अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर, संजय अयाचित, निलेश सराफ, दिपक वेदपाठक, सुबोध बेळंबे यांच्यासह अखिल भारतीय बाल नाट्य परिषद लातूर शाखेच्या अध्यक्षा अपर्णा गोवंडे आदींची रंगमंचावर उपस्थिती होती. प्रयोगाच्या शुभारंभा पुर्वी नटराज व कै. रविंद्र गोवंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्प अर्पण करण्यात आले.

मानवी जिवनात नाटकाला मोठे महत्व आहे. मात्र हि नाट्यकला चळवळ अधिक व्यापक व वृद्धिंगत व्हावी यासाठी बाल नाट्यकलेची जोपासने अतिशय गरजेचे असल्याचे सांगुन प्रकाश पारखी यांनी महानगरांसोबत ग्रामीण भागात ही बालनाट्य कला जिवंत ठेवण्यासाठी बाल नाट्य परिषदच्या वतीने सातत्याने वेगवेगळे उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. बाल नाट्यकला हि चार प्रकारामध्ये मोडत असल्याचे सांगत त्यामध्ये कथाकथन, नाट्यछटा, एकांकिका, नाट्यगायन यांचा समावेश होतो. प्रत्येक बालकामध्ये एक कलाकार दडलेला असुन या कलाकारावर बाल वयातच कलेचे संस्कार झाल्यास मोठे कलाकार निर्माण होतात, यासाठीच लातूर मध्येही बाल कलाकारांवर योग्य संस्कार करुन त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी अखिल भारतीय बाल नाट्य परिषद पुढाकार घेणार असल्याचे प्रकाश पारखी यांनी सांगीतले. लातूरला नाट्यकलेची मोठी परंपरा असून आगामी काळात यामध्येही लातूर पॅटर्न घडविण्यासाठी नाट्य परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी सतिश लोटके, ॲङ शैलेश गोजमगुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाल नाट्य परिषद लातूर शाखेच्या नवनिर्वाचीत अध्यक्षा अपर्णा गोवंडे यांनी प्रास्ताविकात लातूर बाल नाट्य परिषदेच्या वतीने आगामी काळात विविध उपक्रम राबवत बाल कलाकार घडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मृणाल कुलकर्णी व श्वेता आयाचित यांनी केले.
१०० व्या नाट्य संमेलनाच्या पुर्वरंगा निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या बाल नाट्याचा शुभारंभ या नाटकातील मुख्य बालकराकार आरुष बेडेकर याच्या हस्ते घंटा वाजवून करण्यात आला. या बाल नाट्यास लातूर शहरासह परिसरातील बालकांनी व रसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

बालनाट्य चर्चासत्राने बाल कलाकारांची जिज्ञासा वाढवली
‘बोक्या सातबंडे’ बालनाट्या नंतर प्रकाश पारखी यांचे बालनाट्य व नाट्यछटा या विषयी चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात अनेक बालकलाकारांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत बालनाट्य कला शिकण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे दर्शवीले. या बाल कलाकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रकाश पारखी यांनी कलेच्या माध्यमातूनच उत्तरे देऊन त्या कलाकारांचे समाधान केले. प्रकाश पारखी यांनी दाखवलेल्या बालनाट्याच्या वेगवेगळया कला व त्यांनी दिलेली उत्तरे यामुळे बाल कलाकारांची बालनाट्या बद्दल जिज्ञासा वाढली असल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. लातूर मधील बाल कलाकारांची उत्सुकता आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी या बालकांमधुनच उद्याचा मोठा नाट्य कलाकार उदयास येईल असा विश्वास प्रकाश पारखी यांनी व्यक्त केला.

आज नाट्यदिंडी
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या १०० व्या विभागीय नाट्य संमेलना निमित्त लातूर शहरात आज नाट्यदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील गंजगोलाई येथून सकाळी 10 वाजता सुरु होणाऱ्या या नाट्यदिंडी मध्ये प्रसिध्द सिनेकलाकार मोहन जोशी, भरत जाधव, संकर्षण कऱ्हाडे, स्पृहा जोशी, विजय गोखले यांच्यासह अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार आहेत. १०० व्या नाट्यसंमेलना निमित्त काढण्यात येणाऱ्या या नाट्यदिंडीत प्रत्येकी १०० सदस्य असलेल्या हलगी, ढोल-ताशे, गुगळ, धनगरी ढोल, वासूदेव, लेझीम तसेच मराठमोळ्या वेशभूषेतील महिला पथकांचा सहभाग राहणार आहे. या नाट्य दिंडीचा समारोप दयानंद महाविद्यालयाच्या मैदानात उभारण्यात आलेल्या मुख्य रंगमंच असलेल्या कै. नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगपीठ येथे होणार आहे. या नाट्यदिंडीत लातूरसह परिसरातील नाट्य रसिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या लातूर महानगर शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.