24 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसांस्कृतिकबाभळगाव दसरा महोत्सवात आ.धिरज देशमुख कडाडले

बाभळगाव दसरा महोत्सवात आ.धिरज देशमुख कडाडले

महायुती सरकारची ‘अशी ही बनवाबनवी’, ‘फसवाफसवी

आमदार धिरज देशमुख कडाडले, बाभळगाव दसरा महोत्सवात सरकारवर सोडले टीकास्त्र

लातूर; ( माध्यम वृत्तसेवा):–राज्यातल्या लाडक्या बहिणीला जेवढे पैसे दिले त्यापेक्षा जास्त पैसे या महायुती सरकारने त्याच्या जाहिरातीवर खर्च केले आहेत. हे फक्त जाहिरात करणारे सरकार आहे. आमच्या बहिणींना एका हाताने १५०० रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने त्यांच्याकडून २००० रुपये काढून घेतले. महायुती सरकारची ही बनवाबनवी आहे, हे फोडाफोडीचे सरकार आहे अशा शब्दांत आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी महायुती सरकारचे वाभाडे काढले.

बाभळगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, महाराष्ट्राचे माजी वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा धिरज देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय साळुंके, काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, आबासाहेब पाटील, मोईज शेख, यशवंतराव पाटील, रवींद्र काळे, सर्जेराव मोरे, शाम भोसले, गपतराव बाजूळगे लातूरचे तहसिलदार सौदागर तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार धिरज देशमुख पुढे म्हणाले, कोरोनाच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने लोकांची काळजी घेतली. तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वैद्यकीय मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कोरोना काळामध्ये लोकांना धीर दिला. परंतु, महायुतीच्या सरकारने फोडा-फोडीचे राजकारण केले. त्यांनी अनेक कुटुंबे फोडली, पक्ष फोडले. यांचे काम फक्त टेंडर मागवणे जाहिराती करणे आहे.

सोयाबीनला भाव नाही या सरकारच्या काळामध्ये सर्वांनी आंदोलने केली. पण शेवटी आमचे बिले काढा म्हणून कॉन्ट्रॅक्टर्सनी सुद्धा आंदोलन केले आहे. हे सरकार बनवा बनवीचे, फोडाफोडीचे आहे. त्यामुळे जनतेने आता महाविकास आघाडीच्या मागे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पंजा, शिवसेनेची मशाल, शरदचंद्र पवार गटाची तुतारी हे पक्ष चिन्ह असल्याचे सांगत त्यांनी, ‘घेवुनी हातात मशाल… गाढुनिया गद्दारी, घेवुनी हाती मशाल… वाजवू या विजयाची तुतारी’… या घोषणेने आपल्या भाषणाचा समारोप केला.

महायुती सरकारला जागा दाखवण्याची गरज

सध्या लाडक्या बहिण योजनेच्या जाहिरातीवर मोठा खर्च केला जात आहे. लाडक्या बहिणीला १५०० रुपये दिले जातात. पण या सरकारने इतकी महागाई करुन ठेवली आहे की, घरातल्या जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी महिलांकडून २००० रुपये वसूल केले जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वाढले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. हे सरकार व्यापाऱ्यांची नफेखोरी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे त्यासाठी त्यांना त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे.

काकांचे बोट धरुन मोठे झालो

आमदार धिरज देशमुख म्हणाले की, या दिवशी आदरणीय साहेबांची आम्हाला आठवण येते. साहेबांच्या आणि काकांच्या बोटाला धरून आम्ही मोठे झालो. त्यांच्या समवेत आम्ही लहानपणी दसरा महोत्सवात सहभागी होत असे. बाभळगावचा दसरा महोत्सव हा विचारांचा वारसा देणारा आहे. बाभळगावचा दसरा महोत्सव सर्वधर्मीय समाज बांधवाचा आहे. बाभळगाव हे जात-पात न पाहणारे गाव आहे. या दसरा महोत्सवात महाराष्ट्राची विकासाची गुढी उभारली जाते, आणि विचाराचे सोने लुटले जाते.

महायुतीने षडयंत्र रचून सत्ता मिळवली- माजी मंत्री दिलीपराव देशमुख

अडीच वर्षांपूर्वी षडयंत्र रचून सत्ता मिळविलेल्या महायुतीचा कारभार आपण सर्वजण पाहात आहोत. नुसत्या फसव्या घोषणांचा पाऊस पाडून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महायुतीत सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे मतदारांनी डोळसपणे मतदान करुन काँग्रेस महाविकास आघाडीला प्रचंड मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी या प्रसंगी केले.

भ्रष्टाचारी महायुतीचा महापराभव करा- माजी मंत्री अमित देशमुख

काँग्रेस महाविकास आघाडीने अडीच वर्षे अतिशय उत्तम काम केले. परंतु, षडयंत्र रचून भाजपा- महायुतीने सत्ता स्थापन केली. तेव्हापासून राज्यात भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत भ्रष्टाचारी महायुतीचा महापराभव करुन काँग्रेस महाविकास आघाडीला प्रचंड बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.

तत्पूर्वी, दसरा मेळाव्याची सुरुवात देशमुख परिवाराने बाभळगाव गढीवरील कुलदैवतांचे मनोभावे दर्शन घेवून केली. गढीवरून ढोल-ताशांच्या गजरात व तुतारीच्या निनादामध्ये सर्व देशमुख परिवारांतील सदस्यांचे आगमन झाले. प्रथमतः गढीच्या पायथ्याशी असलेल्या अश्नांचे अश्र्व पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ग्रामस्थांशी संवाद साधत, शुभेच्छा देत दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख यांनी गावांतील हनुमान मंदिर, महादेव मंदिर, मुस्लिम धर्मीय बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या दर्ग्याचे दर्शन घेवून रामकथा व्यासपीठावर विराजमान प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले. त्यानंतर दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर आगमन झाले. सर्वानी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. या मिरवणुकींत सर्वधर्मीय समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित झाले होते.

याप्रसंगी सरपंच प्रिया सचिन मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, अॅड. किरण जाधव, यशवंतराव पाटील, अभय साळुंके यांची आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत सरपंच प्रिया मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, शिवराज देशमुख, उमेश मस्के, मुक्तावार पिटले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]