रेणापूर बाजार समितीवर भाजपाचा झेंडा
फडकविण्यासाठी जिद्दीने कामाला लागा
प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत आ. रमेशअप्पा कराड यांचे प्रतिपादन
लातूर दि.०९ – रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत भाजपाने स्वबळावर सक्षम पॅनल निवडणूकीच्या रिंगणात उभे केले असून मागील निवडणूकीत झालेल्या चुका या निवडणूकीत होणार नाहीत याची दक्षता घेवून भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रेणापूर बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी जिद्दीने जोमाने कामाला लागावे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.
लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूकीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ईच्छुक उमेदवारांसह रेणापूर तालुक्यातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी आणी लोकप्रतिनिधीची निवडणूक आढावा आणि पुढील रुपरेषा निश्चित करण्यासाठी आ. रमेशअप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी व्यासपिठावर भाजपा लातूर ग्रामीण अध्यक्ष अनिल भिसे, तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, संगायोचे अध्यक्ष वसंत करमुडे, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, माजी उपसभापती अनंत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र गोडभरले यांची प्रमुख उपस्थिती होती.

रेणापूर तालुका हा भाजपाचा बालेकिल्ला असून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायतीच्या गेल्या निवडणूकीच्या काळात भाजपाला घवघवीत यश मिळाले मात्र बाजार समितीच्या निवडणूकीत आपल्याच काही चुकामूळे पराभव पत्कारावा लागला असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, रेणापूर तालुक्यात भाजपाची भक्कम ताकद आहे. ग्रामपंचायत गटात भाजपाचे स्पष्ट बहुमत आहे, तर सोसायटी गटातील मतदार आपल्या बाजूने आहेत. योग्य नियोजन करून कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यास बाजार समितीच्या निवडणूकीत शंभर टक्के सहजपणे भाजपाच्याच पॅनलचा विजय होणार यात शंका नाही. तरीही आपले पॅनल बहुमतांनी विजयी व्हावे यासाठी आजपासूनच प्रत्येकांनी कामाला लागावे.
आपल्या सर्वांच्या मेहनतीमूळे पक्षाने मला आमदारकी दिली. या मिळालेल्या आमदारकीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात प्रत्येक गावात विविध योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी मंजूर करुन अनेक विकासाची कामे मंजूर केली. त्यातील बरीच कामे आज प्रगती पथावर आहेत. विद्यमान काँग्रेसच्या आमदारांनी किती निधी आणला, मतदार संघासाठी काय केले असा प्रश्न उपस्थित करून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, बाजार समितीच्या निवडणूकीत काहीजण वातावरण दुषीत करण्यासाठी सुपारी घेवून तत्वाची भाषा करीत आहेत. या निवडणूकीचा परिणाम येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणूकीवर होणार असल्याने प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक गांभिर्याने घेवून कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी एक दिलाने एक जिद्दीने कामाला लागावे असे आवाहन केले.
बाजार समिती निवडणूकीत शेतकर्यांना उभे राहण्याचा महत्त्वपूर्ण अधिकार शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने दिला लातूर ग्रामीणच्या काँग्रेस आमदार महोदयाने विधानभवनात भाषण ठोकून हा अधिकार मिळू नये यासाठी विरोध केला, शेतकर्यांच्या हिताला विरोध करणार्या देशमुखांच्या काँग्रेस प्रणित पॅनलला बाजार समितीच्या निवडणूकीत मतपेटीतून धडा शिकवावा असे आवाहन आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.
प्रारंभी या बैठकीत तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे यांनी बैठकीच्या आयोजनाची भूमिका विषद करुन येत्या १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता रेणापूर येथे आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रणित पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याची माहिती दिली.
या बैठकीस भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश अंबेकर, ओबीसी आघाडीचे संघटक डॉ. बाबासाहेब घुले, सिद्धेश्वर मामडगे, सुकेश भंडारे, शरद दरेकर, राजकुमार आलापुरे, श्रीकृष्ण पवार, सौ. शीला आचार्य, विजय गंभिरे, अनंत सरवदे, विठ्ठल कसपटे, हरिकृष्ण गुरले, धनराज कांबळे, गोपाळ शेंडगे, नानासाहेब कसपटे, संतोष चव्हाण, रमेश केंद्रे, पाटलोबा मुंडे, सुरेश बुड्डे, संजय डोंगरे, अजिम शेख, नरसिंग येलगटे, जलील शेख, लक्ष्मण खलंग्रे, श्रीमंत नागरगोजे यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.