आमदार धिरज देशमुख यांची मागणी; गोगलगायींमुळे झालेले प्रत्यक्ष नुकसान आणि सरकारची मदत यात तफावत
लातूर : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे यंदा सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण, राज्य सरकारकडून जाहीर झालेली मदत आणि शेतकरी बांधवांचे प्रत्यक्ष नुकसान यात मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजी पसरली असल्याने सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा व भरीव मदत द्यावी, अशी मागणी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी बुधवारी केली.
‘लातूर ग्रामीण’सह लातूर जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पिकांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. लातूर, रेणापूर, औसा तालुक्यात भेटी देऊन शेतकऱ्यांची व्यथा आमदार श्री. धिरज देशमुख यांनी समजून घेऊन त्यांना धीर दिला. तसेच, या नुकसानीकडे राज्य सरकारचे त्यांनी वेळोवेळी लक्ष वेधले. मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवून पाठपुरावाही केला. याची दखल घेऊन शेतकरी बांधवांना आज मदत जाहीर झाली.
पण, लातूर जिल्ह्यातील प्रत्यक्ष नुकसान आणि जाहीर झालेली मदत यात तफावत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. याची नोंद घेऊन सरकारने एकही नुकसानग्रस्त शेतकरी गोगलगायींच्या प्रादुर्भावाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी आमदार श्री. धिरज देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली.—-चौकट :२९० कोटींची मदत तात्काळ द्यावी
गोगलगायींच्या प्रादुर्भावाबरोबरच यंदा संततधार पावसामुळे लातूर जिल्ह्यात २ लाख १३ हजार २५१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून नुकसानीपोटी २९० कोटींची मदत मिळणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने सरकारकडे पाठवला आहे. त्यास तात्काळ मंजुरी द्यावी. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळू शकेल, असेही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.