प्रेरणादायी प्रवास

0
356

*आम्ही लाखखिंडकर…*           

लहानपणी हॉटेलमध्ये कपबश्या विसळणारा खेड्यातील मुलगा पुढे मंत्रालयातुन सहसचिव या पदावरून निवृत्त झाला…श्री राजाराम जाधव यांची प्रेरणादायी कथा .

यवतमाळ जिल्ह्यातील लाखखिंड हे आमचे गाव. माझे सातवी पर्यतचे प्राथमिक शिक्षण माझ्या लाख खिंड गावातच झाले . आमचे छोटेसे पण टुमदार गांव , गावाच्या तिन्ही बाजुने डोंगर, आजुबाजूला हिरवीगार वनराई, त्यामुळे निसर्गरम्य वातावरणामुळे गावात शांती सद्भावाचे वातावरण असायचे. गावात विविध देवी-देवतांची मंदिरे आहेत. त्यामुळे या सर्व मंदिरातून वर्षभर काही ना काही धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू असते. माझे गावातील सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील दहावी पर्यंतचे शिक्षण मोख येथील वसंत नाईक विद्यालयात झाले. पुढे मी बारावीची परीक्षा आर्णी येथील श्री महंत दत्तराम भारती विद्यालयातून उत्तीर्ण झालो आणि पुढील शिक्षणासाठी पुसद नगरीतील आमच्या फुलसिंग नाईक महाविद्यालयात प्रवेश घेतला. हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याच्या दिर्घकाळ मुख्यमंत्री पदावर यशस्वी कारकिर्द गाजवणारे महानायक वसंतरावजी नाईक यांच्या कल्पक आणि दूरदृष्टीतून साकारलेल्या शिक्षण संस्थेतील शैक्षणिक वातावरणातून शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रात अनेक नामवंत विद्यार्थी घडले आहेत. त्यामुळे ही शिक्षण संस्था अधिक नावारुपाला आली. अशा या संस्थेत मी सातत्याने तीनही वर्षात महाविद्यालयातील विविध स्पर्धामध्ये, सांस्कृतीक कार्यक्रम असो वा राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यात अनेक ठिकाणी झालेले विद्यापीठ –आंतरविद्यापीठीय स्तरावरील शिबीर कार्यक्रम असेल, तेथे माझा केवळ सहभागच नाही तर , तेथे आपला ठसा उमटवून आल्याशिवाय राहीलो नाही. त्यामुळेच मला राष्ट्रीय सेवा योजनेचा नागपुर विद्यापीठाचा बेस्ट कॅडेटचा पुरस्कार 1980 – 81 मध्ये मिळाला होता. त्याचबरोबर माझी निवड राष्ट्रीय एकात्मता समितीवर झाली होती. त्यामुळे मला विद्यार्थी दशेतच राज्य – राष्ट्रीय स्तरावरील अनेक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली ती केवळ प्रा, डॉ. ग, वा. करंदिकर आणि प्रा. न. चिं. अपामार्जने सरांच्या आशिर्वादाने.

या व्यतिरीक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एनएसएसच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यासाठी सरांचा पुढाकार असायचा, वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय परिसरातच “कमवा व शिका” ही योजना राबविणारे किमयागार म्हणजे करंदीकर सर , मी राजाराम जाधव या योजनेचाही एक लाभार्थी आहे. या योजने अंतर्गत वृक्ष रोपणासाठी कलम तयार करणे , त्या कलमांना पाणी देणे , विशिष्ट कालावधीनंतर पावसाळ्यात या कलमांची परिसरात लागवड करणे, आमच्या कॉलेज परिसरात बागायत शेती होती, या शेतीमध्ये ऊसाचा मळा , पपई , फुलशेती , करण्यात येत असे . या सर्व कामासाठी होतकरू व गरजु विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी संधी मिळायची व त्या माध्यमातून त्यांच्या खर्चासाठी दोन पैसे मिळायचे , अशा गरजु व आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांप्रती ” स्वयंदीप भव ” हो ची भावना मनात निर्माण करणारे व त्यांच्याही मनात सजगपणे अशी भावना ठेवणारे करंदीकर सर आजही आम्हाला पुसदच्या “गीताई मंदिरात ” ” स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा ” हे गीताई मधील, किंवा संत तुकाराम महाराज मंदीर वा मोतीनगर मधील दत्त मंदीरातील आरती वा अनेक श्लोकांचे – अभंगाचे सामुदायीक वाचनाचा – पठण करतांनाचे आवाज सुमारे 40 – 42 इतकी वर्षे होऊनही माझ्या कानात गुंजत – घुमत असतो. अशा थोर विचारांच्या करंदीकर सरांसारखे प्राध्यापक कोणत्याही महाविद्यालयाच्या – विद्यापीठाच्या परिसरात दिसतात काय याचा शोध उच्च शिक्षण विभागातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणून माझे डोळे मागोवा घेत असतात. परंतु आजच्या व्यवहारी जगात संकुचित वृत्ती ठेऊन काम करणा-या मंडळींकडून समाजहित – विद्यार्थी हिताचा विचार करणारी बोटावर मोजण्याइतकी तरी प्राध्यापक मंडळी आपल्या सभोताली दिसतात का ? याचा शोध घ्यावा लागेल असे मला वाटते. त्यामुळेच ज्यांनी आपल्या हयातभर विद्यार्थ्यांप्रती सर्वंकष व हितवर्धक विचार असणा-या करंदीकर सरांच्या विचारांना मी नतमस्तक होतो

खरं म्हणजे माझ्या शिक्षण काळात पडेल ती कामे मग ती पुसदच्या हॉटेल मध्ये कपबश्या विसळण्यापासून ते अधिका-यांच्या घरची अनेक कामे असो वा नॅडेप काकांच्या घरी अगरबत्तीची वेगवेगळ्या वजनाची व आकाराची पुडके बांधण्याची कामे असो, वा विद्यार्थ्यांची घरगुती शिकवण्या घेण्याची कामे असो !!

मला मात्र अशी मेहनत करूनच एक एक पाय-या चढत पुढे सरकत गेलो. कारण आई – वडीलांची सामान्य आर्थिक परिस्थिती, म्हणायला घरची दहा-बारा एकर जमीन होती. मात्र ती कोरडवाहू आणि कसे बसे एकच पीक यायचे, त्यातही कधी अवर्षण, तर कधी दुष्काळ असे निसर्गाचे दृष्टचक्र चालू असायचे. त्यातही आम्ही चार भाऊ, दोन बहिणी, आणि एक आमचा फकीरा मामा यांच्या पालन पोषणाची जबाबदारी सांभाळता सांभाळता वडीलांचे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक समीकरण पार कोलमडून जायचे. सर्वांचे लग्न कार्य , माझे शिक्षण, सुख-दु:ख अशा सर्व संकटांचा मुकाबला करत करत माझा उच्च शिक्षण घेण्याच्या काळात संघर्ष सुरु होता. माझ्या जीवनातील असेच चढ-उताराचे दिवसामागुन दिवस गेले. माझे पुसद्चे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले, आणि एम ए. करण्यासाठी नागपूरला गेलो.

एम ए ला असतांनाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सहाय्यक संवर्गाची परीक्षा पास होऊन मंत्रालयातील ग्राम विकास विभागात नोकरीला लागलो. काही दिवसानंतर लग्न झाले आणि मुंबईच्या धावपळीतील एक नवीन चेहरा बनून पक्का मुंबईकर केंव्हा बनून गेलो कळलेच नाही. विभागातंर्गत परीक्षा पास झाल्यावर मी सामान्य प्रशासन विभागात वर्ग दोनचा अधिकारी झालो. आता जीवनात थोडीफार स्थिरता येऊ लागली होती. पुढे विमान संचालनालयात वर्ग एकचा अधिकारी झालो, घरासमोर लाल दिव्याची गाडी आली. घरी सरकारी नोकर चाकर आले, गाडीवर पोलीसाचा ड्रायव्हर हे सर्व माझ्या स्वप्नांचा बाहेरच्या गोष्टी घडत होत्या. रोजच व्हीआयपी सोबत भेटीगाठी असायच्या आणि माझ्या एकुणच कौटुंबीक – पारिवारीक जीवनात क्रांतीच घडून आली. मात्र विमान खात्यातील ही सर्व जबाबदारीची कामे करतांना माझे पाय नेहमीच जमिनीवर राहतील अशी दक्षता आम्ही घेतली होती. ह्या वैचारिक क्रांतीचा मुलमंत्र मला माझ्या आई-वडीलांच्या शिकवणी बरोबरच मला वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या गुरुजींच्या-सरांच्या सान्निध्यातून ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यामुळेच आज माझ्या घरात आनंदाचे नंदनवन फुलले आहे असे मला वाटते. माझा हा जीवन प्रवास म्हणजे माझे यवतमाळ जिल्ह्यातील लहानसे लाख खिंड हे गाव ते पुसद , व्हाया नागपूर ते मुंबई असा थक्क करणारा प्रवास मलाच अचंबित करणारा वाटतो.

माझे गावातील प्राथमिक शिक्षण संपल्यावर मला घर आणि गाव जरी सुमारे ४५ वर्षांपूर्वी सोडावे लागले, तरी माझे व माझ्या परिवाराचे ऋणानुबंध गावाशी कायमच जोडलेले आहे. कारण, माझ्या वडीलोपार्जित शेती बरोबरच माझे मोठे भाऊ – बहिणी आणि मोठा नातेवाईक व मित्रपरिवार गावांमध्ये आहे. त्यामुळे माझ्या शासकीय सेवा काळात वर्षातून किमान दोन वेळा तरी गावाकडे जात असे आणि आता तर सेवानिवृत्त झाल्यानंतर किमान दोन -तीन महिन्यात शेतीच्या कामासाठी जाणे – येणे सुरू असते. त्यावेळी गावातील जुन्या मित्र मंडळीच्या सोबत पारिवारिक भेटी गाठी होतात. शिवाय, काही तरूण मित्रांसोबत गावातील प्राथमिक शिक्षण असेल वा आरोग्य विषयक गोष्टी बाबत विचार करण्यासाठी बैठक घेऊन आम्ही चर्चा करत असतो. जेणेकरून गावातील पांदन रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, नियमित विद्युत पुरवठ्याची किंवा अनेक छोटे-मोठे प्रश्न ग्रामसेवक व पटवा-यांच्या माध्यमातून मार्गी लावत असतो. बरोबरच लग्न कार्य – समारंभात, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असल्यामुळे एक वेगळा आनंद मिळतो. या सर्व कारणांमुळे गावकऱ्यांशी अजुनही माझे सलोख्याचे संबंध आहेत.

मी सुमारे ३३ वर्षे मंत्रालयातील शासकीय सेवा करून या सेवेतून सहसचिव या जेष्ठतम पदावरून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झालो असून एक निरामय आनंदमय पारिवारीक सहवासात तीन सुशिक्षीत मुलगे व सुना उच्च पदांवर कार्यरत आहेत. आमच्या घरात आता दोन नातवंडे आली असून अशा एकत्रीत संयुक्त कुटुंब पध्दतीने जीवन व्यतीत करतो आहे. माझ्या आई-वडीलांच्या पुण्याईचे हेच फळ असून जीवनातील खरी कमाई आहे असे मला वाटते. माझ्या जीवनात काही गमावले असेल तर जे कोणी माझे नव्हते तेच दूर गेले असतील, अन्यथा गमावण्यासारखे काहीच नव्हते आणि नाही असे मला वाटते. कारण,आज माझ्या सभोताली जीवाभावाच्या मित्रमंडळींचा जो गराडा निर्माण झाला आहे, त्यामुळेच माझे जीवन समृध्द आणि परिपूर्ण झाले आहे.

लेखन : राजाराम जाधव

-संपादन: देवेंद्र भुजबळ

9869484800

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here