प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्या स्मरणार्थ आयोजित शोक सभा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, दि. १६ : प्रतापराव बोराडे यांनी अनेक दशकं विद्यार्थी घडविण्याची कामगिरी केली. नाविन्यता, कल्पकता, शिस्त या आपल्या वैशिष्ट्यांसह त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक दिशा दिली. प्रतापराव बोराडे म्हणजे दूरदृष्टि असणारी कर्तृत्ववान तरुणांची पिढी निर्माण करणारे प्राचार्य असे प्रतिपादन खासदार शरदचंद्र पवार यांनी आज येथे केले.
मराठवाड्यामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया रचणारे शिक्षण तज्ञ, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्या स्मरणार्थ महात्मा गांधी मिशनकडून आयोजित श्रद्धांजली सभा आज एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी श्री. पवार बोलत होते.

श्री. पवार म्हणाले, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाला खऱ्याअर्थाने एक आगळे वेगळे उच्च दर्जाचे स्वरूप हे प्रतापराव बोराडे यांच्या दृष्टीमुळे मिळाले. हे काम करण्यासाठी कमलकिशोर कदम आणि अंकुशराव कदम यांची त्यांना साथ लाभली. विद्यार्थी हिताच्या निर्णयाला त्यांनी कायम प्राधान्य दिले. मी आणि कमलबाबू मी विदेशात अमेरिका, इंग्लंड येथे गेलो असता तिथे मला एमजीएमचे काही विद्यार्थी कायम भेटायचे आणि ते मला प्रतापरावांच्या आठवणी सांगायचे. महाराष्ट्र आणि आणि देशात त्यांचे विद्यार्थी भेटायचे हे मी समजू शकतो मात्र, विदेशातही त्यांचे विद्यार्थी भेटायचे आणि आपल्या सरांबद्दल आपल्या आठवणी सांगायचे.

जे काही त्यांनी आपल्या कारकिर्दीत निर्माण केले ते लोकांच्या कायम लक्षात राहील, असेच केले. बारामतीला अभियांत्रिकी महविद्यालय त्यांनी उभे केले. या अभियांत्रिकी महाविद्यालयाला कोणाचे नाव द्यायचे हे जेंव्हा सुरू होते तेंव्हा प्रतापरावांनी कमलनयन बजाज या नावाची सूचना केली. आणि आज या महाविद्यालयाला बजाज यांचे नाव आहे. आपले शैक्षणिक कार्य सुरू असतानाही मराठवाड्याच्या औद्योगीकरणात त्यांचे लक्ष असायचे. उद्योजकांचे प्रश्न सोडविण्याकरिता राज्य सरकार पुढे अत्यंत पोटतिडकीने ते भूमिका मांडत प्रश्नांची सोडवणूक करीत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

श्री. पवार म्हणाले, जे घडू नये असे वाटत होते आणि ते घडले! प्रतापराव आपल्यातून निघून गेले. ते गेले पण त्यांनी दूरदृष्टि असणारी कर्तृत्ववान तरुणांची पिढी निर्माण केली. अभियंत्यांची पिढी तयार करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. प्रश्नांची सोडवणूक करण्याची दृष्टी असणारी एक कर्तृत्ववान पिढी त्यांनी उभी केली. आम्हाला अखंड साथ आणि प्रेम देणारे आणि त्याबरोबरच समाजातील नवी पिढी कर्तृत्ववान घडावी यासाठी कष्ट घेणारे, साने गुरुजींचा विचार अंत: करणामध्ये ठेवणाऱ्या प्रतापरावांप्रति मी माझी आदरांजली व्यक्त करतो.

यावेळी प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचा मुलगा शशीभूषण बोराडे यांनी आपल्या वडिलांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. या शोक सभेस कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, खासदार फौझिया खान, आमदार राजेश टोपे, मा. केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड, नंदकिशोर कागलीवाल, अंकुशराव भालेकर, डॉ.सविता पानट, सी.पी त्रिपाठी, डॉ.अरविंद गोरे, प्राचार्य कै.बोराडे यांचे माजी विद्यार्थी, आप्तस्वकीय, बोराडे कुटुंबीय, व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
