भाग -१ … प्रस्तावना
मी आनंद वामन कुलकर्णी, जयसिंगपूर येथे राहतो. आत्मचरित्र लिहावे एवढा मोठा मी मुळीच नाही आणि कुणी माझे आत्मचरित्र वाचावे इतके माझे आयुष्य प्रभावी असेल असे मला वाटत नाही. तरीही माझ्या काही मित्रांनी माझ्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाचे निमित्त साधले आणि मला माझ्या आयुष्यात आलेले अनेक चांगले, वाईट अनुभव शब्दबध्द करण्याची सूचना केली. यातील काही सूचना तर चक्क आज्ञाच होत्या. लिहावे की नको याचा विचार करण्यात मी आठ दिवस घालवले आणि आज त्यांनी पाठपुरावा सुरु केला. शेवटी आज मला त्यांनी लिहितं केलच…!!
आज मी वयाची ५४ वर्षे पूर्ण केली. यापैकी जवळजवळ २० वर्षाचा कालखंड बातमीदारीचा आहे. या काळात आलेले अनुभव आणि घडलेल्या घटना नक्कीच वाचनीय आहेत. पत्रकारितेसोबतच सहकारी संस्था, सामाजिक संस्था, आर्थिक संस्था, राजकीय पक्ष, विविध संघटना, सांस्कृतिक संस्था अशा विविध माध्यमातून काम करत राहिल्याने अनुभवाची एक मोठी शिदोरी माझ्याकडे आहे असे माझ्या सगळ्याच आप्त स्वकियांना वाटते. ही शिदोरी उघडावी असा त्यांचा आग्रह आहे. अर्थातच याला मान देऊन काही लिहिणे मला क्रमप्राप्त आहे. खरं तर माझा आयुष्यभराचा संघर्षच शब्द करण्याची संधी मला या सगळ्यांनी दिली आहे. यासाठी त्यांचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत.
ही वाटचाल संघर्षाची असल्याने काहीजणांबाबत कटू लिहावे लागेल. आयुष्याच्या उत्तरार्धात या कटू लिखाणातून कुणी दुखावले जाऊ नये यासाठी त्यांची खरी नावे मी लिहिणार नाही. पण, माझ्या यशात, उत्कर्षात ज्यांचा वाटा आहे आणि ज्यांनी आयुष्यभर मला निरपेक्ष भावनेने साथ दिली अशा सगळ्यांचा खऱ्या नावासह उल्लेख मी करणार आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न म्हणू हवे तर…!! अर्थात ज्यांनी माझ्या वाटेत काटे पसरले आणि सतत मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यांनाही या प्रस्तावनेत मी धन्यवाद देतो, कारण त्यांनी तसे केले नसते तर चार अक्षर माझ्या आयुष्यावर मी लिहावीत असे माझ्या मित्रांना वाटलेच नसते आणि हा लेखन प्रपंच करण्याची संधीही मला मिळाली नसती….!!
बालपण, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, पत्रकारितेतील वाटचाल, राजकारणातील क्षण, समाजकारणातील कार्य अशा विविध मार्गावरुन निसर्गोपचार सल्लागार पर्यंत झालेला हा प्रवास इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. यातील प्रत्येक टप्पा मैलाचा दगड ठरावा असं बरंच काही त्यात घडलेलं आहे. ही पानं चाळताना तुम्हाला आणि मला मजा नक्कीच येईल, असं मला वाटतय…!!
- आनंद वामन कुलकर्णी
जयसिंगपूर – ४१६१०१
भ्रमणध्वनी – ७७४४९६४५५०