24.9 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*पुरंदरे विषयीच्या पवारांच्या अरुण्यरुदनाचा अर्थ*

*पुरंदरे विषयीच्या पवारांच्या अरुण्यरुदनाचा अर्थ*


हातातून राज्यसत्ता निसटताच
‘साहेब’ पुन्हा जातीवरच ?

■ राजेंद्र शहापूरकर ■
औरंगाबाद : ‘बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय केला ‘ असा चावून चोथा झालेला आक्षेप ‘जाणते राजे’ म्हणविल्या जाणारे वयोवृद्ध नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा नोंदवल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खरे तर शरद पवार ‘कॅन्सल’ होण्यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रशंसक होते. त्यासंबंधीचे अनेक पुरावे आजही उपलब्ध आहेत मात्र गेल्या काही वर्षात अचानक त्यांना बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराजावर अन्याय केल्याचा साक्षात्कार झाला आणि त्यांचा स्वर बदलला . त्यातच जेम्स लेन प्रकरण उदभवले. त्यातील मजकुराचा संबध पुरंदरे यांच्याशी जोडण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध उचकवून देण्याचा प्रकार झाला .त्यामुळे राज्यात जाती-जातीत द्वेष वाढत गेला आणि दादोजी कोंडदेव यांच्या बरोबरच राम गणेश गडकरी या प्रतिभावान नाटककाराचा पुतळाही बळी ठरला. विशेष म्हणजे खुद्द लेम्स लेनने पुरंदरे यांचा काहीही संबंध नसल्याचे जाहीर केले आहे.


या पार्श्वभूमीवर काल पुणे मुक्कामी एका पुस्तकाच्या प्रकाशनाने निमित्त करून पवारांनी केलेले वक्तव्य त्यांच्या राजकारणाच्या मर्यादा निश्चित करणाऱ्या आहेत असे मत व्यक्त होत आहे.

राजकीय चाल

शरद पवार यांनी २०१४ ते १९ या पाच वर्षात राज्यात ब्राह्मणद्वेषाच्या राजकारणाला पद्धतशीरपणे खतपाणी घातल्याचे स्पष्ट करणारे अनेक उदाहरणे राज्यासमोर आहेत. ‘पुणेरी पगडी’, ‘पेशव्याने छत्रपतींना नियुक्ती देणे’ अशा प्रकारचे वक्तव्य केलेले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांना नामोहरम करण्यासाठीच्या मोर्चामागे कुणाचे डोके होते हे आता गुपित राहिलेले नाही . एवढे होऊनही फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्यावर पवारांनी संजय राऊत यांना हाताशी घेत राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी मोट बांधून महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग घडवून आणला. त्यानंतरच्या अडीच वर्षात शरद पवार यांच्या तोंडातून असा जातीय विखार पसरवणारा एकही शब्द घरंगळल्याचे उदाहरण नाही. मोर्चे तर स्वप्नातही दिसेनासे झाले होते. पण त्यांचा हा राज्यातील मविआचा चमत्कार महिनाभरापूर्वी उलथवून टाकण्यात फडणवीस-शिंदे जोडीला यश आले. मविआ सरकार गेले.अनिल देशमुख, नबाब मलिक तुरुंगातच राहिले आणि त्यामुळे पवारांच्या देशातील राजकीय स्थानाला हादरा बसला. राष्ट्रपती निवडणूक विरोधी पक्षाच्या एकतेचा फज्जा उडाला आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून ममता बॅनर्जी फटकून बाजूला झाल्या.त्यांचा तृणमूल काँग्रेस मतदानाही भाग घेणार नाही. राष्ट्रीय राजकारणात विरोधकांना स्थान नाही. राज्यातील राजकारणातून उखडले गेले त्यामुळे शरद पवार हातघाईवर आले असावेत असा कयास राजकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. वय हातात नाही , सत्ता मिळण्याची शक्यता नाही , मुलीला मुख्यमंत्री सोडाच केंद्रातही पाहण्याची इच्छा पूर्ण होण्याची सुतराम शक्यता दिसत नसल्याने शरद पवार पुन्हा जातीपातीच्या राजकारणात उतरले असले तरी आता त्यांना यश मिळण्याबद्दल राष्ट्रवादीतच शंका व्यक्त केली जात आहे.

  • मा. शरदराव पवार यांच्या स्वहस्ताक्षरात, स्वाक्षरीसह
    अभिप्राय-
    श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या भगीरथ प्रयत्नातून उभारलेली शिवसृष्टी आज पाहता आली. महाराजांच्या बद्दल अपूर्व आत्मीयता, अभिमान ही शिवशाहीरांची प्रेरणा असल्यांने शिवसृष्टी जीवंत वाटते. राज्याभिषेकाचे दृष्य अतिशय प्रेरणादायक व उत्कृष्ट आहे. यानिमित्ताने प्रखर राष्ट्रभक्ती अपार मातृप्रेम स्वच्छ चारित्र्य या महाराजांच्या खास गुणांची ओळख होते. शिवसृष्टीमधून या गुणांचा प्रचार नव्या पिढीत होण्याची अपेक्षा या निमित्ताने करुया. शिवशाहीरांच्या प्रयत्नास संपुर्ण सदिच्छा.
  • -शरद पवार, शिवाजी पाटील, प्रभाकर कुंटे.
    वरील अभिप्राय श्री शरदराव पवार यांनी इतिहाससंशोधक बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य व दादरची शिवसृष्टी पाहून स्वतः लिहिले आहे. या अभिप्रायास बरोबर आलेले श्री.शिवाजीराव निलंगेकर पाटील व श्री.प्रभाकर कुंटे यांनी संमती स्वाक्षर्या केल्या आहेत.
    • ४८ वर्षापूर्वीच्या अविस्मरणीय आठवणी !
      त्रिशतसांवत्सारिक महोत्सव श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या प्रतिभेंनी शिवाजी पार्क दादर-मुंबई. येथे महाराष्ट्र दिन १ मे १९७४ ते ६ जून १९७४ श्रीशिवराज्याभिषेक दिन या काळावधीत अतिभव्य “शिवसृष्टी” उभी केली होती. त्यावेळी देशविदेशातील तसेच देशातील विविध प्रांतातील मान्यवर व शिवभक्तांनी ही शिवसृष्टी बघायला यायचे. दि. १६ मे १९७४ या दिवशी श्री.शरदराव पवार आपल्या सहकाऱ्यांसह आले. योगायोग असा की, त्यावेळी सातार्याहून छत्रपती शिवाजी महाराज यांची श्रीभवानी तलवारीचे आगमन झाले.
      श्री.शरदराव पवार श्रीभवानी तलवारीचे स्वागत करण्याचा मान घेतला आणि तलवारीचे पूजन करून स्वत:च्या मस्तकी वंदन करून दोन्ही हातात घेऊन शिवसृष्टीत भव्य राजेशाही मिरवणूक काढण्यात आली. नंतर फिरून संपूर्ण बघीतली. रात्री होत असलेल्या श्री शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम पाहून श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे आभार मानले…
  • छायाचित्रे- १. श्रीभवानी तलवारीचे स्वागत करून पूजन करीत असताना उजवीकडून क्रमश: श्रध्दापूर्वक श्री तुळजाभवानींची कवड्यांची माळ धारण करून सहभागी, (फर) टोपी घालून व अनवाणी श्री.शरदराव पवार, श्रीमंत बाबासाहेब आपल्या शिवभक्त सहकार्यासह-
    २. श्रीभवानी तलवारीची भव्य मिरवणूक उजवीकडून क्रमश: श्री.शरदराव पवार, श्रीमंत बाबासाहेब आपल्या सहकार्यासह-
    ३. सर्व शिवसृष्टी पाहून झाल्यावर श्री.शरदराव पवार यांनी स्वतः लिहिला अभिप्राय व सहकारी श्री.शिवाजीराव निलंगेकर पाटील, श्री.प्रभाकरराव कुंटे यांच्या स्वाक्षरीसह…
  • -प्रत्यक्षदर्शी जगन्नाथ चव्हाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]