पिटातले सिनेमे 🌀
जुन्या हिंदी सिनेमात विनोदाची निर्मिती दोन तर्हेनं होई. नीट लिहून दिलेला नि त्याबरहुकूम अॅक्टरने केलेला. दुसरा, अभावितपणे घडलेला. या दुसऱ्या तर्हेच्या विनोदावर बेफाम हशा फुटायचा. अनेकदा, हसणं उचित नसे अशा प्रसंगालाही हसून थिएटर डोक्यावर घेत तिकिटाचे पैसे वसूल करणं पिटातल्या पब्लिकला आवडायचं. एसयू सनीनं डायरेक्ट केलेल्या १९६० सालच्या कोहीनूरमधलं दृष्य : व्हिलन जीवनचे शिपाई जीव घेण्यासाठी तलवारी घेऊन पिच्छा करताहेत. वळचणीच्या एका आडोशाला राजकन्या मीनाकुमारी अन् दुसर्या प्रांताचा, फंदफितुरीमुळे परागंदा झालेला राजपुत्र दिलीपकुमार जीव मुठीत घेऊन दडून बसले आहेत. मीनाकुमारीचे डोळे एकदम चंचल होतात. भांबावलेल्या दिलीपकुमारला ती म्हणते – जल्दी जल्दी कुछ करो ना…!! मीनाकुमारीचं हा संवाद उच्चारून होतो न होतो तोच ऑडियन्स (आम्ही ज्या गावी होतं तिथलं) छप्परफाड हसलं. तेव्हा आम्ही तालुकाही नसलेल्या गावी होतो. कालांतराने औरंगाबादला पुन्हा एकदा कोहीनूर बघण्याचा योग आला. इथंही अगदी त्याच प्रसंगावर खळ्ळकन हशा फुटला. म्हणजे पब्लिक सगळीकडे सारखंच. स्क्रिप्टरायटरने काही तो प्रसंग विनोद म्हणून लिहिलेला नव्हता. अर्थात हा सिनेमा अॅक्शन कॉमेडी होता नि एका अभावित विनोदाची भर पडली, इतकंच. बिघडलं तसं काही नाही. सनीच्या या फिल्मला रिपीट ऑडियन्स भरपूर मिळून ती हीट झाली. अभावित, अनपेक्षित, अचानक विनोदाचा हशा बोनससारखा असतो. बघणाऱ्यांना तो निखळ आनंद देतो. आनंद (१९७१) या गंभीर सिनेमात तर रायटरने संवादांना, अंदाज न लागणाऱ्या कलाटणीतून जागोजागी विनोद पेरले होते. तल्लख मुरारीलाल (जॉनी वॉकर) आनंदचीच (राजेश खन्ना) फिरकी घेण्याची स्टाईल उचलून त्याची त्याला परतफेड करतो ते विनोद तर केवळ लाजवाब होते. याच परीच्या विनोदांची पखरण करण्यात मेहमूद आणि हिंदी – मराठीतला लक्ष्मीकांत बेर्डे हे सारखेच निपुण होते. जुन्या काळचा याकूब हा निखळ, नैसर्गिक विनोदाचा हुकमी एक्का होता. गंभीर, चटका लावणारे प्रसंग साकारतानाही त्याचं वेगळेपण उठून दिसत असे. (आठवा सिनेमा – दीदार : १९५१). संवादफेक अन् मुद्राभिनयावर त्याची अशी हुकूमत होती की प्रेक्षक थक्क होत. त्याच्या अकृत्रिम अभिनयाचा उल्लेख समीक्षकही आवर्जून करीत. याकूब हा खराच हरफनमौला होता. साठ सालच्या आधीचे सिनेमे आठवतात त्या प्रेक्षकांना याकूबप्रमाणे गोपही आठवेल. एक काळ ही जोडी होती. अर्थात गोपच्या विनोदांना त्याच्या गोलगरगरीत देहाची जोड होती. पण तोसुद्धा सिनेमे बघणाऱ्यांचा लाडका होता. आता जरासा टर्न. हिंदी सिनेमात पूर्वी अनेकदा स्टॉक शॉट्स वापरत. सूर्योदय – सूर्यास्त हे सर्रास आयते वापरले जात. युध्दाची काही दृष्येही. आय. एस. जोहरच्या जोहर मेहमूद इन गोवा (१९६५) आणि फाइव्ह रायफल्स (१९७४) या सिनेमात तर स्टॉक शॉट्सने कहर केला होता. हल्ली स्टॉक शॉट्स वापरले जात नाहीत असं नव्हे, मात्र तारतम्य अन् अचूकता सांभाळून वापर होतो. पूर्वी तर (कृष्णधवल काळात) आधीच्या, आपल्याच येऊन गेलेल्या एखाद्या सिनेमातला संवाद जसाच्या तसा उपयोग करताना नामवंत सिनेलेखक बिनधास्त असत. असे संवाद आले की जाणकार प्रेक्षक त्या संवादाची री ओढत. अन् बाकीचे जोरदार हसत. तशा ब्लास्टर डायलॉग्जचे नमुने : घरात कोणी वडीलधारं वा कर्ता मुलगा अथवा उपवर मुलगी दाट ग्लानीत अंथरुणावर पडून आहे. डॉक्टरांना आणलं जातं. गंभीर दृष्याला पोषक पार्श्वसंगीत. घरातील सर्वांच्या दृष्टीत, चेहर्यावर चिंतायुक्त प्रश्नार्थक भाव. डॉक्टरांची व्हिजिट सिनेमातल्या सर्व पात्रांनी अन् ऑडियन्सनेही बघितलेली आहे. तरीही डॉक्टर एक ठराविक पोक्त संवाद उच्चारतात… मैने इंजेक्शन दे दिया है. मरीज को अगर सुबहतक होश ना आये तो मुझे इतल्ला कर देना…(डॉक्टर घराबाहेर पडताना कुटुंबातला एक जण त्यांच्या हातून मेडिसीन बॅग आपल्या हाती घेत त्यांना दारापर्यंत पोचवतो. त्याचवेळी दहाच्या दोन नोटाही तो न चुकता डॉक्टरांना देतो) हा संवाद नि असं टिपिकल दृष्य बघितलेलं असल्याचं सिनियर सिनेप्रेमींना नक्कीच आठवेल. कोर्टातला एक ठरलेला संवादही बहुतेक सिनेमातून त्याकाळी असेच असे… न्यायाधीशांनी निकालपत्राचं वाचन सुरू केलेलं. आरोपी खचलेला. कोर्टरूममध्ये हजर असणाऱ्या साऱ्यांची उत्कंठा ताणलेली. सरकारी वकील छद्मी नजरेनं विजेत्याच्या अविर्भावात न्यायासनाकडे बघतोय : वकीलोंकी दलीले पुरी हो चुकी है. पुलीस की तहकीकात में पाये गये सबूत और तमाम गवाहों के बयानात की रोशनी में ये अदालत मुल्जिम शामलाल वल्द रामलाल को दफा ३०२ के तहत सेठ धनीराम के खून के संगीन गुनाह का मुजरीम करार देते हुये बा मुशक्कत उम्रकैद की सजा फर्माती है… (मग हातोडी आपटणं) न्यायदानात ज्युरीची पध्दत होती त्याकाळी ज्युरींना उद्देशून प्रस्तुत संवादाला एका ओळीची जोड होती. ती पुढे वजा झाली. असो. सिनेमातले अनेक गंभीर, सॅड प्रसंगही विनोदी मानून हसावे कसे यात गेल्या जमान्यातले, पिटात बसून तनमनाने सिनेमा बघणारे पारंगत होते. आता मल्टिप्लेक्सचे दिवस आलेत. ऑडियन्स सॉफिस्टिकेटेड झालंय. आणि पिटातलं पब्लिक इतिहासजमा. §§
मीनाकुमारी आणि दिलीपकुमार (कोहीनूर : १९६०)
लेखन: संतोष महाजन
जेष्ठ पत्रकार