पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान
- लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींना मिळणार स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे
- युपीएससी, एमपीएससीसह सरळ सेवा परीक्षांविषयी ऑनलाईन मार्गदर्शन
लातूर, दि. 09 (जिमाका) : जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान राबविण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेविषयी अचूक मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल.
केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, सरळसेवा परीक्षांविषयी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळावे, स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा टक्का वाढवा, यासाठी पालकमंत्री श्री. महाजन यांच्या संकल्पनेतून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान राबविले जात आहे. जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यावतीने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तलाठी, पोलीस, ग्रामसेवक, वनरक्षक, बँकिंग, रेल्वे, सैन्य भरती आदी सरळसेवा परीक्षांसह केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीविषयी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन केले जाणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने 75 हजार पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा केली असून अनेक पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. या पदांसाठी अर्ज केलेल्या किंवा यापुढे विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन मिळावे, यासाठी विशेष अभियान हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. महाजन यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी नावनोंदणीला सुरुवात झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांना www.spardhamission.com या वेबलिंकवर नाव नोंदणी करावी. यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा नसेल.
लातूर जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या आणि किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळणार आहे. उमेदवारांकडे आधारकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, रेशनकार्ड, अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक रहिवास पुरावा, इयत्ता बारावी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांविषयी प्रशिक्षणासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
वैशिष्ट्ये :
- जिल्ह्यातील सर्व युवक व युवतींसाठी संपूर्णपणे मोफत मार्गदर्शन
- कोणतीही प्रवेश परीक्षा नाही
- महाराष्ट्रातील सर्वाधिक तज्ज्ञ व नामांकित प्राध्यापक वर्ग
- ऑनलाईन वर्ग
आवश्यक कागदपत्रे :
- इयत्ता बारावी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
- लातूर जिल्ह्याचा रहिवास पुरावा (आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/रेशनकार्ड/ रहिवास प्रमाणपत्र)
*****