*पद्मजा फेनानी – जोगळेकर*

0
318

पद्मजा फेनानी-जोगळेकर

रविंद्र नाट्यमंदिरात मी तिला प्रथम बघितले. म्हणजे तिचा गाण्याचा कार्यक्रम बघितला. तिचे गाणे तर सुरेल आहेच पण ती रूपानेही देखणी आहे. गोरापान वर्ण उंच, सडपातळ बांधा, कुरळ्या घनदाट केसांचा बॉबकट, धारदार नाक, सुंदर रेशमी जरीकाठाची साडी आणि चेह-यावर विलक्षण मार्दव अशी पद्मजा मला पाहताक्षणी आवडली. मी कार्यक्रम संपल्यावर तिला जाऊन भेटले. ती खूप छान बोलली. मग पुढे काही वर्षांनी आमची दाट मैत्री झाली.

संगीतप्रेमी वडिलांमुळे पद्मजाने लहानपणापासून नामवंत गायकांचे शास्त्रीय आणि सुगम संगीत एकले होते . तिच्यासाठी हा रियाझच होता. तिने मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवी घेतल्यामुळे आईवडीलांना वाटत होते पॅथालॉजिस्ट व्हावे पद्म्जाला सुद्धा हे क्षेत्र आवडत होते. पण तिचे गुरु पंडीत जसराजजी एकदा म्हणाले, “पद्मजाचा आवाज लाखात एक आहे. हि माझी मुलगी असती तर मी तिला फक्त संगीतच शिकवले असते.” मग पद्मजा पूर्णपणे गाण्याकडे वळली . तिने पंडित जसराज, पंडित रामनारायण आणि पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवणे सुरु केले आणि मुळातच सुरेल असलेल्या तिच्या आवाजाला पैलू पडले. अत्यंत मेहनती आणि शिस्तप्रिय असलेली पद्मजा कधीही आपला रियाझ सोडत नाही.

पद्मजाची अनेक गाणी गाजली. ‘केंव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली’ या गाण्याने तिला नाव मिळवून दिले. ‘तरुण आहे रात्र अजुनी’ हे कविवर्य सुरेश भटांचे गीतही तिने तिच्या स्वरांनी अजरामर केले. तिने शास्त्रीय गायनाबरोबरच गझल, भजने व भावगीतांचे अनेक कार्यक्रम देशविदेशात केले आहेत. मराठीबरोबरच ती बंगाली, हिंदी, गुजराथी, पंजाबी, उर्दू, कन्नड आणि कोकणी अशा विविध भाषेत गायली आहे. तिची ‘शुभ्र फुलांची ज्वाला’, ‘रंगबावरा श्रावण’ आणि ‘घर नाचले नाचले’ हे तीन अल्बम खूप लोकप्रिय झालेले आहेत.

पद्मजा ही अतिशय लाघवी आणि कायम आनंदी असणारी आहे. तिच्यात एक खट्याळ खोडकर बालक कायम जागे असते. ती जेंव्हा आम्हा मैत्रिणीबरोबर असते तेंव्हा ती मैफिलीची अनभिषिक्त सम्राज्ञी असते. तिच्याकडे तीव्र विनोदबुद्धी आहे. तिच्या पोतडीत कायम अनेक किस्से असतात आणि ते सांगण्याची विलक्षण हातोटीही तिच्याकडे आहे. ती नकलाही फार उत्तम करते. लता मंगेशकर, आशाताई, त्यांच्या मातोश्री यांच्या नकला ती फार बहारदारपणे करते. तिचा मला आवडणारा सर्वात मोठा गुण म्हणजे गुणग्राहकता आहे. दुस-यांच्या छोट्यामोठ्या गोष्टींचे ती नेहमीच कौतुक करते.

गाण्याबरोबर ती अध्यात्मिक लेखन खूप छान करते. एकदा तिने तिच्या एका मैत्रिणीचे खूप छान व्यक्तिचित्रण केले होते. तिने तो लेख आमच्या ग्रुपवर टाकला. त्यावर प्रतिक्रिया देताना मी लिहिले लेख झकास झालाय पण, पद्मजा एखादे तरी क्षेत्र आमच्यासाठी ठेव ना! इतके चांगले लिहू नकोस की माझ्यासारख्या गरीब लेखिकेच्या पोटावर पाय येईल. त्यावर ती उत्तरली, ‘तू आणि गरीब, कुठल्या अर्थाने?’ मी म्हटले, ‘मी गरीबच आहे.’ त्यावर ती म्हणाली, ‘अग, तू लिखाणाच्या बाबतीत प्रचंड श्रीमंत आहेस.’ मी म्हटले, ‘अग, हळू बोल, इनकम टॅक्स, इडीचे लोक ऐकतील तर पंचाईत होईल.’ त्यावर ती खळखळून हसत म्हणाली गुड सेन्स ऑफ ह्युमर! ‘.’ तिच्यात ही विनोदबुद्धी वडिलांकडून आली असे ती मोठ्या अभिमानाने सांगते.

छोट्या गोष्टीही ती मोठ्या रंगवून सांगते. तिची आई माहीमला राहते. आईला मधुमेह आहे त्यामुळे गोड खाणे टाळायला हवे पण आईला गोड आवडते. मग कधीमधी पद्मजा घरी धाड टाकते आणि फ्रीज उघडून गोडाचा माल जप्त करते हे सांगताना ती म्हणते, ‘अग, मला महापालिकेच्या गाडीसारखी धाड टाकावी लागते’.

पद्मजाच्या लग्नाचा किस्साही असाच मजेदार आहे. तिला मुंबईचा नवरा हवा होता आणि तोही दादर, प्रभादेवी, फार तर माहिमचा! सुनील जोगळेकरांचे स्थळ आले. दोघे एकमेकाना भेटले. पद्मजाला तो आवडला होता. त्याच्या बोलण्यातून ही आवड दिसत होती. हे सांगताना पद्मजा म्हणाली, ‘अग, तो काही स्पष्ट होकार देईना. मग काय, मी सरळ त्याला “तरूण आहे रात्र अजूनी….” हे गाणेच ऐकवले!

तिला गाण्याबरोबर खाण्याचीही आवड आहे. डोश्यावर सरस्वत पद्धतीने मध घालून ती खाते आणि मासे तर तिला प्राणप्रिय आहेत. नुकतेच तिच्या मुलाचे लग्न झाले. आम्ही विचारले की सुनेला काही सासुरवास करतेस की नाही? ती हसून म्हणाली, ‘अग, सून परदेशात असते फोनवर कसा काय सासुरवास करू?’ ‘पण सून फार चांगली आहे बर माझी. पद्मजा इतकी प्रेमळ आहे की ही काय सासुरवास करणार असा प्रश्न आम्हा मैत्रीणीनाच पडतो.

तिची एक माधुरी नावाची सहकारी आहे. माधुरीला ती बरोबरीच्या नात्याने वागवते. तिच्या कामाचे भरभरून कौतुक करते. दुरून बघाना-यांना वाटते कि या दोघी नातेवाईक असाव्यात. इतकी ती साधी आणि निगर्वी आहे.

संगीतसाधनेबरोबरच तिचे सामाजिक कार्यही सुरू असते. बाबा आमटेंचे ‘आनंदवन’ आणि दादरच्या ‘कमला नेहरू अंध विद्यालयाला’ नॉब बरोबर ती जोडली गेली आहे . टाटा रुग्णालयासाठी ती सातत्याने प्लेटलेट्स दान करत असते. पुण्याच्या ‘दिनानाथ मंगेशकर इस्पितळ’ आणि ‘टाटा कँसर रुग्णालयासाठी’ तिने अनेक कार्यक्रम मोफत केले आहेत. कमला मेहता अंध विध्याल्यात ती मुलीना गाणे शिकवते त्यात तिला अपार आनंद मिळतो. जे विध्यार्थी चागले गातात त्यांना पारखून घेऊन ती त्यांना शिकवते प्रंसगी विनामुल्य शिकवते.

पद्मजा फार भाग्यवान आहे तिला तिच्या गानकौशल्यामुळे अनेक नामवंत कवींचा सहवास मिळाला! ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर तसेच इंदिरा संत, ग्रेस, सुरेश भट, मंगेश पाडगावकर, शंकर रामाणींसारख्या नामवंत कवींची गाणी तिने गायली आहेत. जेष्ठ साहित्यिक दुर्गाबाई भागवत यांचाही अपार स्नेह तिला मिळाला. तिने गायलेल्या कवीचा वाढदिवस आठवणीत ठेऊन त्यादिवशी ती त्यांची गाणी समाजमाध्य्मांवर टाकून त्यांना आदरांजली वाह्हते. त्यामुळे आम्हाला सातत्याने तिची गाणी ऐकायला मिळतात. गेल्या ४१ वर्षापासून ती सातत्याने गात आहेत आतापर्यत जगभरात तिचे हजारो कार्यक्रम झाले आहेत.

गाण्याबरोबर पद्मजा विविध विषयावर लेखनही करते. महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ, तरुण भारतमध्ये तिचे लेख प्रसिद्ध होत असतात.

आजवर पद्मजाला अनेक पुरस्कार मिळाले. ‘भारत निर्माण पुरस्कार,’ ‘मिया तानसेन पुरस्कार’ अशी कितीतरी नावे सांगता येतील. तरुण वयातच तिला भारत सरकारने ‘पद्मश्री पुरस्कार’ देवून गौरवले आणि योगायोग म्हणजे त्याच वर्षी स्वरलता लता मंगेशकर यांनाही ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ‘कुसुमाग्रजांनी’ तिला उस्फुर्तपणे ‘स्वरचन्द्रिका’ म्हणून गौरविले होते. तर स्वरसम्राज्ञी लताताईंनी तिचा गौरव करताना म्हटले होते की विलक्षण बुद्धिमत्ता आणि सुरेल आवाजामुळे पद्मजा माझा वारसा चालवेल.

पद्माजाचा दिनक्रम फार शिस्तबद्ध आहे. दररोजचा रियाझ, वाचन, संगीताचे विविध प्रकार ऐकणे, लेखन आणि आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणे. खरे तर अशा दिनक्रमामुळे ती सतत नादब्रम्हातच मग्न असते. आयुष्यात येणा-या चढउताराना तिने मोठ्या समर्थपणे तोंड दिले आहे. स्पर्धा, कुचाळक्या, टिंगलटवाळी यापासून ती नेहमी चार हात दूरच असते.

लखलखत्या स्वरांची तळपती तलवार बाळगणारी, प्रसन्नवदना आणि कायम मिस्कील भाव मनात जपणारी, खट्याळ पद्मजा प्रसिद्धीची आणि यशाची एवढी शिखरे चढल्यावरही तिने यशाची हवा डोक्यात जाऊ देता दिली नाही. एखाद्या सामान्य रसिकाप्रमाणे ती जमींनीवर पाय घट्ट रोवून उभी आहे. या चमचमत्या चांदणीकडे मैत्रीण म्हणून बघताना मला नेहमीच खूप अभिमान वाटतो.

*******

श्रद्धा बेलसरे-खारकर.

9969921283

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here