आज-काल जग हे विनाशाकडे वाटचाल करते की काय? अशी शंका कधीकधी मनामध्ये निर्माण होते. कारण समाजातील अनेकांच्या समोर मानवी समूहात जीवन कसे जगावे? याचा कोणताच आदर्श मापदंड नसल्यामुळे ते विचाराने आणि मनानेही भरकटताना दिसतात. मग भरकटलेल्या मानवी मनाच्या हातून शारीरिक दुष्कृत्य घडण्यास वेळ लागत नाही. दुष्कृत्याला बळी पडलेल्यांना टीपून, त्यांच्याकडून हवी तशी कृती करवून घेण्यासाठी समाजातील अनेक समाजद्रोही, असामाजिक, तथा संधीसाधू टपून बसलेले असतात. कारण त्यांना सामाजिक अशांतता तथा उलथापालथ अपेक्षित असते. जेणेकरून आपला स्वार्थ सिद्ध करता येईल.
ऐतिहासिक आढावा घेतला असता असे लक्षात येईल की, समाजामध्ये मानवी समूहाला वेठीस धरणारे पूर्वीही होते आणि आजही आहेत याबद्दल दुमत नाही. परंतु अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी अनेक संत महापुरुषांनी आपले सर्वस्व पणाला लावलेले दिसून येते.
अडीच हजार वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतमाने जेव्हा समाजाचं सूक्ष्म अवलोकन केलं, तेव्हा संपूर्ण मानवी समूह दुःखाने लतपत असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. परंतु त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना गवसत नव्हता. आदर्श जीवन कसे जगावे याचा कोणताही मापदंड समाजासमोर अस्तित्वात नव्हता. त्यांच्या पूर्वोत्तर काळात अस्तित्वात असणारे वेद, ब्राह्मण्य, औपनिषिधे ही सर्व वैदिक सनातन धर्मग्रंथ तथा कपिलाचे सांख्य तत्वज्ञान, यांची त्यांनी झाडाझडती घेतली. परंतु पदरी निराशाच पडली. त्यामध्ये फक्त ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, कर्मकांडं, मरणोत्तर जीवन याशिवाय दुसरे काहीही दिसून आले नाही. त्यामधील कपिलाचा एक सिद्धांत मात्र त्यांनी स्वीकारला, तो म्हणजे, 'सत्याला पुराव्याचा आधार असावा लागतो'. त्याचवेळी समकालीन वैदिक (ब्राह्मणी) धर्म विरोधी बासष्ट विचारधारा अस्तित्वात होत्या. पैकी सहा अतिशय दखलपात्र असल्याचे दिसून येते, तरी त्यांच्याकडेही कोणताच आदर्श जीवन पद्धतीचा मापदंड नव्हता. शेवटी तथागत बुद्धांनीच तो चिंतनांती संशोधित केला.
आज जर काही धर्मग्रंथ किंवा काल्पनिक पात्र आदर्श जीवनाचा डांगोरा पिटताना दिसत असतील तर ते बुद्धाकडील चौर्यकर्म, नाहीतर उसनवारी तरी समजावी. कारण ते बुद्धाच्या नंतर उदयास आल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी निक्षून सांगितलेले आहे.
तथागत भगवान गौतम बुद्धांचे सारनाथ येथील पंचवर्गिय भिक्खू समोरील पहिले प्रवचन, जे त्रिपिठकातील धम्मचक्र पवत्तन सुत्तामध्ये आलेले आहे. त्याला त्यांनीं विशुद्धी मार्ग म्हणून संबोधले. त्या प्रवचनामध्ये ते म्हणतात की, "ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे (त्यासाठी जात धर्म पंथ किंवा लिंग कशाचीही अट नाही) त्याने जीवनाची तत्वे म्हणून पाच तत्वे पाळली पाहिजे. ती म्हणजे कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे अथवा त्याला इजा न करणे. दुसरे चोरी न करणे अर्थात दुसर्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे. तीसरे व्यभिचार न करणे. चौथे असत्य न बोलणे. पाचवे मादक पदार्थांचे सेवन न करणे". गौतम बुद्ध पुढे म्हणतात, "एखादा व्यक्ती सामाजिक जीवन जगताना जे-जे काही करत असेल, ते योग्य की अयोग्य? याचे परिमापन त्याच्याकडे असले पाहिजे. ज्यामुळे तो स्वतःचे अथवा दुसऱ्याचे मोजमाप करू शकेल. हीच ती पाच तत्वे आहेत जे माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहेत.
आता प्रश्न हा निर्माण होतो की, अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांना ही पाच तत्वे आदर्श मानवी जीवनाचा मापदंड म्हणून का प्रसृत करावी लागली? याची उकल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती, रिडल्स इन हिंदुइझम तथा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथांमध्ये केलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते बुद्धपूर्व काळात वैदिक (ब्राह्मणी) धर्मामध्ये यज्ञागाचे मोठे स्तोम माजलेले होते. यज्ञ हे २१ प्रकारचे असून ते तीन भागांमध्ये विभागलेले होते. पहिल्या प्रकारात दूध, दही, धान्य व तूप इत्यादीच्या आहुती दिल्या जात होत्या. तर दुसऱ्या प्रकारात 'सोम' ची (मद्य) आहुती देण्यात येत असे, त्यामुळे त्याला सोमयज्ञ म्हटल्या जाात होते. तिसऱ्या प्रकारात जिवांना बळी दिला जात असे, तो बलीयज्ञ. यज्ञाच्या कर्त्यासह पितरांचा उद्धार होतो, वैभव तथा धनसंपत्ती प्राप्त होऊन स्वर्गलाभ सुद्धा होतो. असा असत्य तर्क लावून भटा-पुरोहितांकडून यज्ञाचे समर्थन केल्या जात होते. कारण त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होत होता. यज्ञ हे अतिशय खर्चिक असायचे.
यज्ञ स्थळी, यज्ञात बळी दिलेल्या प्राण्यांचे भाजलेले मांस खायला मिळायचे. मोठ्या प्रमाणात मद्य (दारू) सेवन केल्या जात होते. दारू दोन प्रकारची असायची, सुरा आणि सोम. (आजची देशी आणि विदेशी) सोम पिण्याचा अधिकार फक्त चातुर्वर्ण्यातील वरच्या तीन वर्णांनाच (ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य) होता. तर शूद्रांना (आजचे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, डीएनटी, एसबीसी) सोम पिण्याचा अधिकार नसून, सुरा प्यावी लागत होती. सोम तयार करण्याचे तंत्रही त्यांनाच माहीत होते. त्यावेळी पुरुषच नव्हे तर महिलाही मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करत होत्या. त्यामुळे यज्ञप्रसंगी नशेमध्ये धुंद असणाऱ्या स्त्री-पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात अनाचार चालायचा. म्हणूनच कित्येक महिने, वर्षानुवर्षे चालणारे यज्ञ तात्कालीन आर्याचे अय्याशीचे साधन बनले होते. अशा मदमस्त अय्याशीत गुरफटलेल्या समाजाची सुटका होवून, तो दुःखमुक्त व आदर्श जीवन जगावा म्हणून तथागत गौतम बुद्धाने पहिला प्रयत्न केल्याची इतिहास साक्ष देतो. त्यामुळे भारतातील समाजसुधारणेचा इतिहास तथागत गौतम बुद्धापासून सुरू होतो. किंबहुना कोणताही समाजसुधारणेचा इतिहास सांगताना त्यांचा इतिहास सांगितल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही. यज्ञप्रसंगी होणारी हिंसा, खोटे बोलणे, अनाचार, लुबाडणूक आणि मद्यप्राशन या सर्वांना धार्मिक रूप देण्यात आले होते. दुराचाराला सदाचाराचे धार्मिक वेष्टन देऊन, त्याशिवाय धार्मिकता पूर्णत्वास जाऊ शकत नाही, असा गोड गैरसमज समाजामध्ये निर्माण केलेला होता. माञ त्यामधून बाहेर पडण्यासाठी सामान्य जनता आतुर होती.
गरज ही शोधाची जननी म्हणून तथागत गौतम बुद्धाने आपल्या तत्वज्ञानातून पंचशील प्रतिपादन केले. त्यापैकी पहिले शील म्हणजे अहिंसा तत्व. त्याला त्यांनी करुणा व मैत्रीची जोड दिली. अखिल जीवसृष्टीच्या विषयी जर प्रेम, करुणा आणि मैत्रीभावना निर्माण झाली तर हिंसा करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. तथागताची अहिंसा ही मूलभूत अहिंसा आहे. 'अहिंसा परमो धर्म' अशी ती केव्हाच नव्हती आणि नाही.
चोरी करणे हे नितीच्या विरुद्ध आहे. चोरांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये, जातींमध्ये सुद्धा नीती दिसून येते. परंतु तिचे स्वरूप हे वेगळेपणाची जाणीव करून ती आपल्या पुरतीच मर्यादित असते. म्हणजेच ती समाजविरोधी असते. चोरी करणारा व्यक्ती हा सदाचरणात अथवा नीतीतत्वात पूर्णता आणू शकत नाही.
व्यभीचार हा शारीरिक आणि मानसिक असा दोन प्रकारचा असू शकतो. प्राचीन धर्मग्रंथाची चाचपणी केली असता त्याला धर्माचे वेस्टन दिलेले आढळते. त्यामुळे व्याभीचाराला व्यभीचार न मानता सदाचार मानल्याचे दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात अनेक देव, ऋषी अथवा राजांनी व्यभीचार केल्याचे नमूद केले आहे. यज्ञाच्या वेळी ऋषींनी स्त्रीयांशी केलेल्या व्यभीराला 'वामदेव व्रत' असे तांत्रिक नाव दिले होते. तथागत गौतम बुद्ध व्यभीचाराविषयी म्हणतात की, "कामवासनेच्या भरती पासून सर्वांना सारखाच धोका आहे, सगळे जग या भरतीत वाहून जात आहे. जो तीच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आणि विचार हे तिचे सुकानु आहेत. धम्म तुम्हाला आदेश देतो की, या शत्रुंपासून तुम्ही आपले संरक्षण करा".
पंचशीलाचे चौथे तत्त्व, मी खोटे बोलणार नाही हे आहे. आपल्या बोलण्यातून इतरांना अपाय न होता त्यांच्या हिताचे बोलले गेले पाहिजे. 'सत्याला सत्य आणि असत्याला असत्य' म्हणून जे ओळखतात त्याच्या ठायी सम्यक दृष्टी असते. तेच सत्यापर्यंत पोहोचतात. अन्यथा दुर्बुद्धीमुळे त्यांना सत्याचा लाभ होत नाही. वाचिक दुराचरण व सदाचरणाचे चार-चार प्रकार असल्याचे बुद्ध नमूद करतात.
मी दारू पिणार नाही हे पंचशीलातील शेवटचे तत्व आहे. अनेक वेळा, अनेक ठिकाणी आपल्या प्रवचनांमध्ये तथागत गौतम बुद्धाने मादक (नशिले) पदार्थांचे सेवन व मद्यपान वर्ज्य करण्याविषयी उपदेश केलेला आहे. ते म्हणतात, "मद्यपान करू नये, इतरांना पाजू नये, मद्यपानाला संमती देऊ नये, मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो. मद्यपानाने मूर्ख पाप करतात, मित्रांना पापास प्रवृत्त करतात, तेव्हा बुद्धिनाश करणारे व्यसन, हा मूर्खपणा आणि मुर्खाचा स्वर्ग ह्यापासून परावृत्त व्हा.
अशाप्रकारे बुद्धाच्या तत्वज्ञानातील पंचशील हे मूळ गाभा असल्याचे दिसून येते. त्याचे पालन न केल्यास सहा प्रकारची संकटे उदभवतात. संपत्तीचा खराखुरा नाश, वाढती भांडणे, रोगाधिनता, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तणूक, आणि बुद्धीनाश होतो.
बुद्धाचे तत्वज्ञान हे विज्ञानाधिष्ठित असल्यामुळे ते अडीचहजार वर्षांपासून आजपावेतो कालसापेक्ष, समाजधारणेस उपयुक्त आणि योग्य असुन मानवी विकासाला चरम बिंदुपर्यंत नेणारे आहे. म्हणून सुसंस्कृत, सर्जनशील तथा आदर्श समाज निर्मितीसाठी व समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या महान मानवी तथा संविधानिक मुल्याधारीत बलशाली राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे.